भाजपला चुकून मतदान केलं म्हणून तरूणानं स्वत:चं बोट छाटलं?

अगदी चुकून भारतीय जनता पक्षाला मतदान केल्याने उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरच्या एका तरूणानं स्वत:चं बोट छाटल्याचा दावा केला आहे.

पवन कुमार असं या तरूणाचं नाव आहे. त्यानं भाजपला मतदान केल्यामुळे बोट कापल्याचा व्हीडिओ सध्या सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

त्याला स्थानिक पक्षाला मतदान करायचं होतं. मात्र मतदान यंत्रांवर बरीच चिन्हं होती. त्यामुळे तो गोंधळून गेला.

"मला खरंतर हत्तीच्या चिन्हाला म्हणजे बसपाला मत द्यायचं होतं. पण मी चुकून कमळाच्या चिन्हावर बोट दाबलं." असं सांगतानाचा त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

काल दुसऱ्या टप्प्यातल्या 95 जागांसाठी मतदान झालं. मतदानानंतर प्रत्येक मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते. जी लगेच पुसून टाकणं शक्य नसतं.

बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीनं उत्तर प्रदेशात आघाडी केली आहे. गेल्या वेळी 80 पैकी 71 जागा जिंकणाऱ्या भाजपसमोर त्यांनी आव्हान उभं केलं आहे.

पवन कुमार हे दलित समाजातील आहेत. आणि मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीसाठी ही मतं महत्त्वाची आहेत.

लोकसभेसाठी तब्बल 7 टप्प्यात मतदान होत आहे. ज्यात 90 कोटी लोक मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)