You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निवडणूक : खासदाराचा मुलगा दुकानदार, मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक मजूर
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी पाटण्याहून
72 वर्षांचे देवनाथ सेन दररोज ऑटो रिक्षानं पूर्णिया बस स्टँडजवळ असलेल्या विकास बाजारात येतात. दुकान उघडतात आणि आपलं काम सुरू करतात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम आहे.
तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे. ही सामान्य बाब आहे. पण दुकानदार असलेले देवनाथ कुणी सामान्य व्यक्ती नाहीत. तब्बल 4 वेळा खासदार राहिलेल्या फनी गोपाल सेनगुप्ता यांचे ते चिरंजीव आहे. फनी गोपाल सेनगुप्ता 1952 ते 1967 या काळात चारवेळा पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार झाले.
देवनाथ सेन सांगतात, "वडिलांशी कधी संपत्तीबद्दल बोलणं व्हायचं तेव्हा ते म्हणायचे की तुम्ही स्वत: कमवा. तुम्हाला खूप आनंद होईल. हेच ध्यानात ठेवा की तुमच्यासाठी तुमच्या वडिलांनी काहीही मागे ठेवलं नाही. तेव्हापासून मेंदूत एक गोष्ट पक्की झाली की ईमानदारीची भाकरीच खाणार."
फनी गोपाल सेनगुप्ता यांचा पारंपरिक व्यवसाय कविराजाचा होता. ललित मोहन सेनगुप्ता यांचं कुटुंब 1890 मध्ये बांग्लादेशमधून येऊन पूर्णियामध्ये स्थायिक झालं.
ललित मोहन यांना तीन मुलं होती. सगळ्यात मोठा मुलगा शिक्षक, त्यानंतर फनी गोपाल सेनगुप्ता आणि सगळ्यात लहान कविराज. अर्थात सगळ्यात लहान असलेल्या मुलाचा अकाली मृत्यू झाला आणि पारंपरिक व्यवसाय करणारं कुणी राहिलं नाही.
पूर्णिया जिल्ह्याच्या स्थापनेला जेव्हा 250 वर्ष पूर्ण झाली तेहा प्रशासनानं 'वल्लरी' नावाची पत्रिका छापली. त्यानुसार फनी गोपाल सेनगुप्ता यांचा जन्म 1905 साली पूर्णियामध्येच झाला.
ड्रायफूटचं दुकान चालवणारे देवनाथ सांगतात की, "फनी गोपाल 1929 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या संपर्कात आले. त्यानंतर 1929, 1932, 1940 आणि 1944 मध्ये त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला. 1933 मध्ये त्यांचं लग्न झालं. मात्र त्या काळात बराचवेळ ते तुरूंगातच होते. त्यामुळे माझ्या आईची आई म्हणजे आजी म्हणायची की, "मी माझ्या मुलीच्या गळ्यात घागर बांधून तिला विहिरीत ढकलून दिलंय."
ईमानदारीचं दुसरं नाव म्हणजे फनी गोपाल सेनगुप्ता
पूर्णिया आणि भागलपूरमधून आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या फनी गोपाल सेनगुप्ता यांचं बांग्ला, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं.
कुटुंबाजवळ फनी गोपाल यांच्याबाबतची जी कागदपत्रं मिळाली त्यात 'द सर्चलाइट' दैनिकाचं एक पत्रंही आहे. ज्यात संपादक सुभाषचंद्र सरकार यांनी टागोरांच्या कवितांचा अनुवाद केल्याने फनी गोपाल सेनगुप्ता यांचे आभार मानले आहेत.
या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, या कविता ते 'प्रदीप'च्या संपादकांना पाठवत आहेत.
कुटुंबाजवळ फनी गोपाल सेनगुप्तांची एक डायरीसुद्धा आहे. ज्यात त्यांनी रोजचा दिनक्रम अत्यंत बारीक इंग्रजी अक्षरांमध्ये लिहून ठेवला आहे. याशिवाय पार्लमेंटच्या नोटपॅडची पानं आहेत, ज्यात संसद सत्रावेळी झालेला खर्च लिहून ठेवण्यात आलाय.
देवनाथ सेन सांगतात, "जेव्हा संसदेचं सत्र सुरू असायचं तेव्हा त्यांना दिवसाचे 40 रूपये मिळायचे. ते खासदारांसाठीच्या लॉजवर राहायचे. आणि दिल्लीला येण्याजाण्यासाठीही खिशातूनच पैसे खर्च करावे लागायचे."
"वडील थर्ड क्लासमधून प्रवास करायचे. लोकसभा क्षेत्रात सायकलने फिरायचे. कारण त्यावेळी पैसे नसायचे."
पैशांच्या तंगीमुळे खुद्द देवनाथ यांचं शिक्षणही अर्धवट राहिलं.
देवनाथ सेन सांगतात, "आम्ही तीन भाऊ आणि 2 बहिणी. वडील खासदार होते, पण प्रचंड आर्थिक तंगी होती. मी पूर्णिया कॉलेजात अडमिशन घेतलं होतं, पण बीए पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे मी 1971ला दुकान सुरू केलं. पण बहीण धाकटी बहीण मृदुला सेन यांचं पोस्ट ग्रॅज्युएट करवून घेतलं."
1980 साली फनी गोपाल सेनगुप्ता यांचं निधन झालं आणि त्यानंतर 2012 मध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं.
देवनाथ सांगतात की, "आमच्या वडिलांनी अतिशय इमानदारीनं आयुष्य घालवलं. ते चारवेळा खासदार झाले. पण कधीही आम्हाला दिल्लीला नेलं नाही. फक्त एकदा पूर्ण कुटुंबाला दिल्ली दाखवायला नेलं होतं."
मुख्यमंत्र्यांची नातवंडं करतायत मजुरी
पूर्णिया शहरातील या दुकानापासून काही अंतरावरच मजुरांचा बाजार भरतो. काम मिळेल या प्रतिक्षेत असलेल्या मजुरांमध्ये बसंत आणि कपिल पासवानही आहेत.
हे दोघेही बिहारचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि पहिले दलित मुख्यमंत्री झालेल्या भोला पासवान शास्त्रींचे नातू आहेत.
दररोज पूर्णियाच्या केनगर प्रखंड भागातील भैरगाछीतून 14 किलोमीटरचा प्रवास करून ते कामासाठी इथं येतात. मजुरी करतात आणि परत जातात. भोला पासवान यांना मूलबाळ नव्हतं. त्यामुळे भावांच्या मुलांच्या आधारावरच त्यांनी आयुष्य काढलं.
भोला पासवान यांना अग्नी देणारे पुतणे विरंची पासवान यांचं वय झालंय.
ते सांगतात की, "माझं आणि माझ्या मुलांचं पूर्ण आयुष्य मजुरी करण्यात गेलं. मोठ्या मुश्किलीनं रेशन कार्ड मिळालं. पण तीन मुलं असतानाही रेशन कार्ड मात्र एकच आहे. आम्हाला तीन रेशन कार्ड मिळाली तर आयुष्य थोडं सोपं होईल."
या कुटुंबाजवळ स्वत:ची अशी जमीन नाहीए. मात्र भोला पासवान यांचं स्मारक बनवण्यासाठी तीन गुंठे जमीन सरकारला दिल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे.
विरंची सांगतात की, "जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या काकांचं स्मारक बनेल, म्हणून आम्ही जमीन दिली. काय करणार?"
विरंची यांची नातवंडं शेजारच्याच भोला पासवान प्राथमिक विद्यालयात शिकतात. विरंची यांचे चिरंजीव बसंत संतापून म्हणतात की, "21 सप्टेबरला भोलाबाबूंची जयंती असते तेव्हाच प्रशासनाला आमची आठवण येते."
पूर्णियात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. भारतीय राजकारणावर नजर ठेवणारी संस्था अर्थात एडीआरच्या रिपोर्टनुसार 2004 पासून आतापर्यंत बिहारच्या खासदार आणि आमदारांची सरासरी संपत्ती 2.46 कोटी इतकी आहे. यात पुरूष लोकप्रतिनिधींची संपत्ती सरासरी 2.57 कोटी तर महिला आमदार-खासदारांची संपत्ती 1.61 कोटी रूपये आहे.
पण बाहुबली आणि पैशानं मजबूत असलेल्या नेत्यांमध्ये साधं, सरळ आणि ईमानदार आयुष्य जगणारे फनी गोपाल सेनगुप्ता आणि भोला पासवान शास्त्रींसारखे लोकही होते.
देवनाथ सेन म्हणतात, "लोक खूप सन्मान करतात, किमान कुणी असं म्हणत नाही की, बघा चोराचा मुलगा चाललाय. आता नवी पिढी आलीय. ज्यांना माझ्या वडिलांबद्दल काहीच माहिती नाही. त्यांच्यासारखी मूल्यं असणाऱ्यांना ते विसरून गेले."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)