लोकसभा निवडणूक 2019 : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात या ठिकाणी होणार मतदान

फोटो स्रोत, MANJUNATH KIRAN
लोकसभा निवडणूक 2019साठी देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. आज निवडणुकीचा पहिला टप्पा आहे.
देशात आज एकूण 91 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. 23 मे रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे.
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालॅंड, सिक्कीम, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, तेलंगणा, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, मणीपूर, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात आज मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण सात मतदारसंघात आज निवडणूक होणार आहे. या मतदारसंघात कुणाकुणाची लढत होणार आहे हे आपण पाहू.
वर्धा मतदारसंघ
वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या चारुलता टोकस विरुद्ध भाजपचे रामदास तडस हे दोन प्रमुख उमेदवार आहेत. प्रचारादरम्यान या मतदारसंघात बेरोजगारी, सिंचनाचा प्रश्न, पायाभूत सुविधा हे मुद्दे गाजले. चारुलता टोकस या काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांच्या कन्या आहेत.
रामटेक मतदारसंघ
रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने विरुद्ध काँग्रेसचे किशोर गजभिये असा सामना रंगणार आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे 1984 आणि 1989 ला याच मतदारसंघातून लोकसभेत गेले होते. या मतदारसंघात प्रचाराच्या काळात बेरोजगारी, पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे मुद्दे गाजले.
नागपूर
नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात लढत होणार आहे. नितीन गडकरी हे सध्या केंद्रात मंत्री आहेत.

फोटो स्रोत, facebook
नाना पटोले याआधी भाजपमध्येच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची धोरणं पटत नाहीत असं म्हणत त्यांनी भाजप सोडली. पायाभूत सुविधा, विकास, मेट्रो हे मुद्दे निवडणुकीच्या काळात गाजले.
भंडारा-गोंदिया
भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे अशी लढत या ठिकाणी होणार आहे. सुनील मेंढे हे भंडाऱ्याचे नगराध्यक्ष आहेत. तर नाना पंचबुद्धे हे माजी आमदार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पंचबुद्धेंसाठी प्रचार केला आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे.
धान उत्पादकांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, मॅंगनीज खाणीतील कामगारांचे प्रश्न अशा मुद्द्यांवर प्रचारादरम्यान चर्चा झाली.
गडचिरोली-चिमूर
भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव मुसंडी अशी लढत आपल्याला गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.
हा मतदारसंघ संवेदनशील समजला जातो. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चिमूर आणि आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश यात आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे.
चंद्रपूर
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

फोटो स्रोत, facebook/getty
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर शिवसेनेचे एकमेव आमदार धानोरकर काँग्रेसमध्ये आले आहेत.
यवतमाळ-वाशिम
यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांच्याविरोधात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे निवडणूक लढवत आहेत. भावना गवळी सलग चारवेळा खासदार बनल्या आहेत. यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न या मतदारसंघात महत्त्वाचे आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








