लोकसभा निवडणूक 2019 : हंसराज अहिर की धानोरकर; चंद्रपुरात थेट लढतीचं शिवधनुष्य कोण पेलणार?

धानोरकर, आहिर

फोटो स्रोत, Facebook, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरेश धानोरकर आणि हंसराज अहिर यांच्या थेट लढत होणार आहे.
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी, अमरावती

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. आतापर्यंत बहुरंगी लढतीत होणारी मतविभागणी हंसराज आहिर यांच्या पथ्यावर पडत होती. यावेळी दुहेरी लढतीचं आव्हान ते कसं पेलतात, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

चंद्रपूर मतदारसंघात धर्म आणि जात हे मुद्दे गौण ठरतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत राजकीय आडाख्यांना चकवा देणारी ठरते.

हा मतदारसंघ चर्चेत आला तो काँग्रेसने बदललेल्या उमेदवारांमुळे. काँग्रेसने इथून माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल यांना तिकीट दिलं. पण बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवाराला तिकीट का, यावरून वादाला सुरुवात झाल्याने विशाल यांनी माघार घेतली. इथं माजी खासदार नरेश पुगलिया आणि विजय वडेट्टिवार अशा दोन प्रबळ गटांत रस्सीखेच सुरू होती.

धानोरकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसची उमेदवारी जवळपास निश्चित केली. मात्र माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली.

यावरून जे राजकीय रणकंदन माजलं ते साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. धानोरकर यांच्या उमेदवारीवरून माझ्या हाती काही नाही, माझं कुणी ऐकत नाही, असं वक्तव्य करणारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लिप महाराष्ट्रभर गाजली. पण काही दिवसांतच काँग्रेसने इथं धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनोरकरांसाठी प्रयत्न केल्याचं बोललं जातं.

"गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसच्या पदरी यश येत नव्हतं. काँग्रेसमधील नैराश्य दूर करण्यात तरुण आणि तडफदार स्वभावाचे धानोरकरांना यशस्वी ठरले आहेत," असं मत पत्रकार प्रमोद काकडे यांच आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ कुणबी-बहुल आहेत. 2014च्या निवडणुकीत आपचे उमेदवार वामनराव चटप आणि काँग्रेसचे संजय देवतळे यांनी प्रत्येकी 2 लाखांवर मतं मिळवली आहेत. मोदी लाटेतही काँग्रेस आणि आपने मिळवलेली मतं लक्षणीय होती. काँग्रेस आणि आपची एकत्रित मतं आणि अहिर यांना मिळालेली मतं यात फक्त 3 टक्क्यांचं अंतर आहे. "याला अहिरांच्या विरोधातील अँटी इनकंबन्सी म्हणता येईल," असं काकडे म्हणतात.

धानोरकर भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. "गेली चार वर्षांत त्यांनी शिवसेना पलीकडे जात स्वतःची ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे ते भाजपला ते प्रबळ उमेदवार ठरू शकतात," असं मत जेष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांनी व्यक्त केलं.

सध्या पुगलिया गट वगळता बरीचशी काँग्रेस धानोरकर यांच्या पाठीशी आहे. पुगलिया गटही सोबत येईल, यासाठी धानोरकर प्रयत्नशील आहेत, असं ते म्हणाले.

अहिर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अहिर गेली 20 वर्षं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.

काकडे म्हणाले, "गेली 20 वर्षं खासदार असलेल्या अहिरांना यावेळी कडव्या लढतीला तोडं दयावं लागेल, असं चित्र आहे. मंत्री असताना त्यांनी विकास काम केली नाहीत, असा त्यांच्यावर आरोप होतो. 2014ची निवडणूक सोडली तर सर्वच निवडणुकांत बहुरंगी लढतींमुळे होणारी मतविभागणी त्यांच्या पथ्यावर पडत होती. यंदा ही लढत दुरंगी होईल. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे माळी समाजाचे आहेत, त्याचा भाजपला फटका बसेल. वंचित बहुजन आघाडी इथं मोठी मजल मारेल, अशा स्थितीत नाही."

चंद्रपूरमध्ये जातीचं कार्ड निवडणुकांत चालेलं नाही. उदाहरण म्हणजे माजी खासदार पुगलिया जैन समाजाचे आहेत, तर अहिर यांचा समाज ही छोटा आहे.

देशपांडे म्हणतात, "धानोरकर जातीच राजकारण करतील असं वाटत नाही. वरोरा, वणी आणि आर्णी या तालुक्यांत कुणबी समाज बहुसंख्य आहे. पण धानोरकरांना निवडणुकीत टिकण्यासाठी सर्वांना बरोबर घ्यावं लागेल."

काँग्रेसचं कमकुवत संघटन

पण 20 वर्षांपासून काँग्रेस संघटना चंद्रपूरमध्ये कमकुवत झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री आहेत. वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मतदारसंघावर पकड आहे, त्यांनी बरीच विकासकामं केली आहेत. भाजपमधील अहिर आणि मुनगंटीवर हे गट निवडणुकीत एकत्र येतात, असा आजवरचा अनुभव आहे.

धानोरकर

फोटो स्रोत, Facebook

काँग्रेसमधील गटबाजी संपत नसल्यानेच पक्षाबाहेरील धानोरकर यांना उमेदवारी दिली असावी, असं देशपांडे यांना वाटतं. काँग्रेसमधून पुगलिया, मनोहर पाऊनकर यांची नावं ही इच्छुकांच्या यादीत होती.

पत्रकार पंकज मोहरीर म्हणतात, "यावेळी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मते घेऊ शकतो यालाही महत्त्व आहे. वामनराव चटप निवडणूक लढवणार नाहीत, ते महाआघाडीसोबत राहतील. 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे स्थानिक मुद्दे प्रभावी ठरले नाहीत. यावेळीही नाराजीचा सूर आहे असला तर विरोधक किती प्रभावीपणे नाराजीचा लाभ उठवतात, हे महत्त्वाचं ठरणार आहे."

धानोरकर प्रत्येक बुथवर पोहोचतील?

चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर शिवसेनेचे एकमेव आमदार धानोरकर काँग्रेसमध्ये आले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक बुथपर्यंत पोहोचणं हे धानोरकरांसाठी आवाहन ठरणार आहे, असं देशपांडे म्हणाले.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)