लोकसभा 2019 : शिवसेनेच्या परभणीत बंडू'बॉस' विरुद्ध राजेश'दादा' लढत

फोटो स्रोत, Twitter
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी मतदारसंघात शिवसेनेने संजय उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांना मैदानात उतरवलं आहे. शिवसेना बालेकिल्ला राखणार की राष्ट्रवादी झेंडा फडकवणार याकडे राज्याचं लक्ष असेल.
वास्तविक मुद्द्यांपेक्षा भावनिक मुद्द्यांभोवती फिरणारं राजकारण असा राजकीय पोत असलेल्या या मतदारसंघात यंदाची निवडणूक कशी लढली जाते, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
संजय तथा बंडू जाधव यांना कार्यकर्ते 'बंडू बॉस' असं म्हणतात. तर राजेश विटेकर यांना त्यांचे कार्यकर्ते 'दादा' म्हणतात.
परभणी मतदारसंघ पारंपरिकरीत्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पण गेल्या काही टर्ममध्ये असं दिसलं की एक टर्म संपली की खासदार शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करतात. शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झालेले तुकाराम रेंगे पाटील आणि गणेश दुधगावकर यांनी टर्म संपल्यानंतर शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.
पण, यावेळी विद्यमान खासदार संजय जाधव यांना शिवसेनेनी उमेदवारी दिली आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर शिवसेनेला ही जागा फार कठीण नाही पण राष्ट्रवादीचे तरुण उमेदवार राजेश विटेकरांचे त्यांना कडवं आव्हान राहील असं म्हटलं जात आहे.
खासदार संजय जाधव यांचे प्रतिस्पर्धी राजेश विटेकर आहेत. त्यांच्याविषयी सांगताना, परभणीतून प्रकाशित होणाऱ्या 'दैनिक समर्थ दिलासा'चे कार्यकारी संपादक संतोष धारासुरकर सांगतात, "विटेकर हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. विटेकर हे गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभेची तयारी करत होते."
"राजेश विटेकर हे सोनपेठ तालुक्यातील विटा या गावचे सरपंच होते. नंतर ते कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि मग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक देखील होते, ते शिवसेनेला चांगली लढत देतील असं राष्ट्रवादीतील नेतृत्वाला वाटल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली." धारासुरकर सांगतात.
"बहुजन वंचित आघाडीने आलमगीर खान यांना उमेदवारी दिली आहे. परभणी मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तेव्हा ते देखील दोन्ही उमेदवारांना चांगली लढत देऊ शकतील अशी शक्यता आहे," असं ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब काळे सांगतात.
परभणी मतदारसंघाची रचना
परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदार संघ आहेत तर जालना जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी हे जालना जिल्ह्यातले मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात आहेत. तर परतूर आणि घनसावंगी या जालना जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी लोकसभा मतदारसंघात होतो. या मतदारसंघात शिवसेनेचा एक, भाजपचा एक, राष्ट्रवादीचे 3 आणि एक अपक्ष आमदार आहे.
परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला का समजला जातो?
"परभणीतली लढत ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत थेट होईल. पण पारडं संजय जाधव यांच्या बाजूने थोडंसं जड आहे," असं धारासुरकर सांगतात.
"परभणीच्या मतदारांना दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी श्रद्धा आहे. त्यामुळे ते वेळोवेळी शिवसेनेलाच मतदान करत आले आहेत. नव्या पिढीला म्हणजेच 18-30 वर्षाच्या मतदाराला संजय तथा बंडू जाधव यांच्याविषयी आकर्षण आहे. "

"राजे संभाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांचं संघटन उभं केलं नंतर ते नगरसेवक बनले, मग सभापती, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख असा प्रवास करत करत ते दोनदा आमदार बनले. आता ते खासदार आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना दुसऱ्यांदा तिकीट मिळालं आहे," धारासुरकर सांगतात.
'जाधव हे अनुभवी पण...'
"जाधव हे अनुभवी उमेदवार आहेत आणि ते एक कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. युती झाल्यानंतर हिंदुत्ववादी मतं विभाजित होणार नाहीत याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत पण त्यांना कमकुवत बाजू देखील आहेत," धारासुरकर सांगतात.

फोटो स्रोत, Twitter
"गेली तीस वर्षं फक्त एक अपवाद वगळता जिल्ह्यात शिवसेनेचीच सत्ता आहे. मतदारांनी शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं पण शिवसेनेनं मतदारांना काय दिलं हा प्रश्न मतदारांच्या मनात येतो. पण परभणीत विकास हा कधीच मुद्दा नसतो. अद्यापही राजकारणावर भावनिक मुद्द्यांचीच छाप आपल्याला दिसते. कोणताच पक्ष नीट काम करत नाहीत तर नेते कसा विकासाचा मुद्दा काढतील?" असं धारासुरकर विचारतात.
'ताज्या दमाचे उमेदवार'
"जाधव यांच्या तुलनेत विटेकर नवीन आहेत. त्यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे. गणेश दुधगावकर हे देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण ते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसैनिक थेट दंड थोपटून उभे राहतील त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाने विटेकर यांना उमेदवारी दिली," असं धारासुरकर सांगतात.

फोटो स्रोत, Twitter@Rajesh Vitekar
"विटेकर ताज्या दमाचे आहेत. अॅंटिइनकंबसीचा फायदा त्यांना मिळू शकतो तसेच मतदारसंघात राष्ट्रवादीचे विधानसभेतले तीन आणि विधानपरिषदेचा एक आमदार असे एकूण 4 आमदार आहेत. ते जर पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले तर त्याचा निश्चितच फायदा विटेकरांना होऊ शकतो," असं धारासुरकर यांना वाटतं.
'खान की बाण?'
आलमगीर खान हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे आहेत. ते असदुद्दीन ओवेसीचे निकटवर्तीय मानले जातात. अद्याप त्यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात नाही. ते नेमका कसा प्रचार करतात आणि किती मतदारापर्यंत पोहोचतात यावर त्यांची कामगिरी अवलंबून आहे.
"आलमगीर खान यांचा मतदारसंघात फारसा कुणाला परिचय नाही. त्यांचा हैदराबाद येथे व्यवसाय आहे. जर मुस्लीम उमेदवार उभा राहिला तर खान की बाण असा प्रचार होता. पण आलमगीर खान हे थेट बंडू जाधव यांना थेट आव्हान देणार नाहीत," असं ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब काळे सांगतात.
दोन्ही पक्षातील गटातटाचे राजकारण?
परभणीच्या राजकारणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा पक्षामधल्या अंतर्गत वादाची चर्चा होतेच. परभणीत शिवसेनेचे आमदार राहुल पाटील आणि खासदार संजय जाधव यांच्यातला वाद हा चर्चेचा विषय आहे. दोघांनी एकत्र येऊन काम करावं असं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं असं 'सरकारनामा'ने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Rahul patil twitter
सरकारनामाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्यातला हा संघर्ष मातोश्रीवर देखील पोहोचला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मनोमीलन घडवत संघटनेनेसाठी काम करण्याचा सल्ला दिला होता.
राहुल पाटील आणि बंडू जाधव यांच्यातल्या वादाचा मतदारांवर काही परिणाम होऊ शकतो का असं विचारलं असता 'आज परभणी' या वेबपोर्टलचे संपादक हनुमंत चिटणीस सांगतात की "शिवसेनेचे मतदार हा पक्का मतदार असतो. गटबाजीचा परिणाम शिवसेनेच्या मतदारांवर होत नाही. 1989 ते आतापर्यंत केवळ एक अपवाद वगळता शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी जिंकून आला आहे. दोघांमध्ये वाद जरी असला तरी ते निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार एकत्र येऊन काम करतील."
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मोहन फड यांनी 2017मध्ये शिवसेना सोडल्याचं 'सरकारनामा'ने म्हटलं आहे. मानवत पंचायत समितीच्या सभापती पदावरून त्यांच्यात आणि खा. जाधव यांच्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर फड यांनी शिवसेना सोडली.
"राष्ट्रवादीमध्ये सध्या तरी गटतटाचे चित्र नसल्याचे जाणकार सांगतात. पक्षाच्या बैठकीत बहुतेक नेत्यांची पसंती ही विटेकरांच्या नावालाच होती. सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी जोमाने झटतील तर पाथरीचे बाबाजानी दुर्रानी आणि जिंतूरचे आमदार विजय भांबळे त्यांच्या पाठीशी असतील. तसेच घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांची त्यांना मदत होऊ शकते," असं काळे सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








