लोकसभा निवडणूक : सुशीलकुमार शिंदेच्या विरोधात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी

सुशीलकुमार शिंदे आणि जयसिद्धेश्वर स्वामी अशी लक्षवेधी लढत सोलापुरात होणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images, Sagar Surwase

    • Author, हलिमा कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या जागी जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने यापूर्वीच सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देऊ केली आहे. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर इथल्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत. त्यांना भाजपमधून काही गटांचा पाठिंबा होता. शिवाय विद्यमान खासदार बनसोडे यांच्या विरोधात नाराजी असल्याची चर्चा होती, त्यातून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी मिळाली आहे. सोलापुरात लिंगायत समाजाची मतं, हाही मुद्दा महत्त्वाचा ठरला.

सुशीलकुमार शिंदे सोलापूर पुन्हा काबीज करतील?

काही आठवड्यांपूर्वी सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून सुशीलकुमार शिंदे यांचं नाव घोषित झालं. 77व्या वर्षी शिंदे यांना निवडणुकीत का उभं करण्यात येत आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला गेला. काँग्रेसकडे पर्यायच नाही का अशीही चर्चा आहे. तर सुशील कुमार शिंदे यांचा अनुभव आणि कामगिरी पाहता ते पुन्हा निवडून येतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.

"काँग्रेसची परिस्थिती भीषण आहे, सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे निदान काँग्रेसचं डिपॉजिट वाचू शकतं," असं पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना वाटत असावं इतकी असं मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी व्यक्त केलं.

"शिंदे यांची एकेकाळी मतदारसंघावर जी पकड होती ती आता ढिली झाली आहे. त्यांचं वय पाहता सोलापूर सारख्या मोठ्या मतदारसंघाचा प्रचार ते करू शकतील का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे," असंही मत जोशी यांनी व्यक्त केलं.

"2014मध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव शरद बनसोडे यांनी केला होता. त्या पराभवानंतर शिंदे त्यांच्या मतदारसंघात फारसे फिरलेले दिसत नाहीत. एखाद्या नवोदित लेखकाचं पुस्तक ते प्रकाशित करताना दिसतात. त्या पलीकडे त्यांचा मतदारसंघात संपर्क असल्याचे दिसत नाही," असं जोशी सांगतात.

सध्याची सोलापूर मतदारसंघातील परिस्थिती

सोलापूर लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदासंघात विभागला गेला आहे. सोलापूर शहर-मध्य, सोलापूर शहर-उत्तर, सोलापूर शहर-दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा हे ते मतदारसंघ आहेत.

यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य- प्रणिती शिंदे- काँग्रेस, सोलापूर उत्तर- विजय देशमुख, भाजपा, सोलापूर दक्षिण -सुभाष देशमुख भाजपा, मोहोळ-रमेश कदम, राष्ट्रवादी, पंढरपूर मंगळवेढा - भारत भालके, काँग्रेस, अक्कलकोट- सिद्धराम म्हेत्रे, काँग्रेस यांचा विजय झाला आहे.

म्हणजेच 3 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी तर भाजपाचे दोन आमदार या लोकसभा मतदारसंघात आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने सोलापूरमध्ये आपलं बळ वाढवलं आहे.

प्रणिती शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा होती.

एकेकाळी जिल्ह्याच्या सत्तेचं केंद्र असलेले सुशीलकुमार शिंदे पराभूत कसे झाले असं विचारलं असता स्थानिक पत्रकार सागर सुरवसे सांगतात, "गेल्या २५ वर्षांपासून सोलापूर महापालिका काँग्रेसच्या हातात होती मात्र यावेळी महापालिकेवर भाजपाची सत्ता आली."

"काँग्रेसचे केवळ 14 नगरसेवक निवडून येऊ शकले आहेत. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळल्यामुळे तसेच काँग्रेसमधील निष्ठावान कार्यकर्त्यांची कमतरता याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला आणि ते 2014मध्ये पराभूत झाले," सुरवसे सांगतात.

सोलापूर मतदारसंघाचा इतिहास :

1952 ते 1957पर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शेकाप चे उमेदवार निवडून आले. तर 1962 ते 1991पर्यंत सलग काँग्रेसचे खासदार निवडून आले. त्यानंतर कोणत्याही पक्षाला सातत्य ठेवता आलेले नाही. 2014मध्ये भाजपच्या शरद बनसोडे यांना 2 लाख 72 हजार 872 मते मिळाली होती. तर सुशीलकुमार शिंदे यांना 1 लाख 89 हजार 357 मते मिळाली आहे.

सुशीलकुमार शिंदे 1998 साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर 1999 मध्ये देखील दुसऱ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले.

2003 मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले. तर 2004 मध्ये सुभाष देशमुख यांना निसटता विजय मिळाला.

2004च्या लोकसभेला सुशीलकुमार शिंदेंच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं आणि त्या 5 हजार मतांच्या फरकाने पराभूत झाल्या.

"2004 मध्ये काँग्रेसला पद्मशाली समाजातून उभा राहिलेल्या उमेदवाराचा फटका बसला. कारण पद्मशाली समाजानं त्या उमेदवाराला मतदान केलं आणि त्याचा फटका उज्ज्वला शिंदेंना बसला. काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी शह दिला," असं सुरवसे सांगतात.

2009 मध्ये सुशीलकुमार शिंदे खासदार म्हणून निवडून आले देशाचे गृहमंत्री झाले. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेचा त्यांना फटका बसला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आव्हानं :

"भाजपामध्ये उमेदवार म्हणून लिंगायत समाजाचे धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी या मठाधिपती यांना तिकीट देण्याची चर्चा आधापासून सुरू होती. सोलापूर लोकसभा मतदासंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. मठाधिपती हे दलित प्रवर्गातील आहेत. शरद बनसोडे यांच्या उमेदवारीला भाजपाच्या इतर गटातून विरोध होता," असं ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी सांगतात.

डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. सोलापूर उत्तर आणि दक्षिण या विधानसभेच्य़ा मतदारसंघांत भाजप मजबूत आहे. हे आव्हान शिंदेच्या समोर आहे. "भाजपाने डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली तर लिंगायत समाजाची एकगठ्ठा मतं महाराजांना मिळतील, असा विचारही भाजपने केला असेल," असं जोशी सांगतात.

"राज्यमंत्री विजय देशमुख यांचा डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांना पाठिंबा आहे तर दुसरा गट राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या नावाची शिफारस करत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार शरद बनसोडे यांनी मात्र या दोन्ही संभाव्य उमेदवारांना विरोध करत पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते," आहे असं ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर सांगतात.

"लिंगायत समाज पहिल्यापासून भाजपच्या बाजूने उभा असल्याचं चित्र आहे. तर पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा पट्टा असून, सोलापुरातील दलित आणि मुस्लीम, धनगर काही प्रमाणात मराठा आणि ओबीसी मतांचा सुशीलकुमार शिंदे यांना फायदा होईल," असंही मुजावर म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

सुशील कुमार शिंदे यांचा अनुभव आणि कामगिरी पाहता ते पुन्हा निवडून येतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.

"सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय कारकीर्द समृद्ध आहे. सहावेळा ते आमदार म्हणून निवडले गेले, त्यानंतर खासदार, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, गृहमंत्री, राज्यपाल अशा अनेक पदांवर त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली असल्याने सुशीलकुमार शिंदे यांच्या मागे सोलापूरचा मतदार उभा राहील", असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळं मतविभागणीची शक्यता

सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर फक्त भाजपचेच आव्हान आहे असं नाही. प्रकाश आंबेडकर जर या ठिकाणाहून उभे राहिले तर लढत आणखी अटीतटीची होऊ शकते असंही बोललं जात आहे.

"सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली तर शिंदेंना मोठा फटका बसू शकतो," असं मुजावर सांगतात.

"त्यामुळे मुस्लीम-दलित मतांची विभागणी हे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी निवडणुकीत अडथळे आणणारी ठरेल," असं मत मुजावर यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)