नागपूर लोकसभा 2019: नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले या लढतीत काय मुद्दे असणार? - विश्लेषण

नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी, अशी थेट लढत नागपुरात पाहायला मिळणार आहे.

फोटो स्रोत, Facebook / Getty Images

फोटो कॅप्शन, नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी, अशी थेट लढत नागपुरात पाहायला मिळणार आहे.
    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अनेक वर्षं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नागपूर लोकसभा मतदारसंघ 2014च्या 'मोदी लाटेत' भाजपकडे आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा गड माजी भाजप अध्यक्ष आणि संघाचे लाडके नेते नितीन गडकरींनी स्वबळावर जिंकला. पण आता त्यावर काँग्रेस पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यंदा धुरा आहे, नाना पटोलेंच्या हाती.

पटोले आधी काँग्रेसमध्येच होते, नंतर ते भाजपमध्ये गेले आणि गेल्या वर्षी "भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही" म्हणत त्यांनी पक्षातून तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा दिला. देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले.

पण "शेतकऱ्यांचे प्रश्न रेटून धरणारा नेता" अशी ओळख मिरवणारे पटोले विरुद्ध "शहरी विकासाचं स्वप्न साकारणारे" गडकरी, हा सामना रंगणार तरी कसा, हा उत्सुकतेचा विषय ठरतोय.

गडकरी विरुद्ध पटोले

सध्यातरी गडकरी विरुद्ध पटोले या थेट लढतीत गडकरींचं पारडं जड दिसतंय, असं लोकमत नागपूरचे निवासी संपादक गजानन जानभोर सांगतात.

"गडकरी हे आपल्या मतदारसंघाशी घट्ट नाळ जोडलेले नेते आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. दर शनिवारी-रविवारी त्यांच्या घरी भेटायला, शैक्षणिक किंवा वैद्यकीय मदत मागायला लोकांची रीघ लागते, मग ते कुठल्याही जातीचे, धर्माचे किंवा पक्षाचे असो. त्यामुळे ते लोकांचे नेते म्हणून प्रस्थापित आहेत. तसंच विकासकामांमुळे राष्ट्रीय पातळीवरही त्यांची उंची वाढली आहेत, म्हणून त्यांच्याविरोधात लढायला मोठे मुद्दे लागतील," असं जानभोर सांगतात.

माझा नागपूरच्या जनतेवर विश्वास आहे, असं पटोले यांनी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यावर ट्वीट केलं.

फोटो स्रोत, TWITTER / NANA_PATOLE

फोटो कॅप्शन, माझा नागपूरच्या जनतेवर विश्वास आहे, असं पटोले यांनी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यावर ट्वीट केलं.

ते पुढे सांगतात, "पटोले नागपूरचे नेते नाहीत, हा सर्वांत मोठा फॅक्टर आहे. त्यांना नागपूरची माहिती नाही, इथले मुद्दे माहिती नाहीत. त्यामुळे ते या मतदारसंघासाठी वेगळं काय ऑफर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण इतिहास पाहिल्यास बाहेरचा नेता येतो, लढतो आणि हरला की तो त्यानंतर इकडे फिरकतही नाही."

पण काँग्रेसला पटोलेंद्वारे गडकरींविरोधात चांगली फाईट देण्याची चांगली संधी आहे, असं महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात. तसा प्रयत्नही नाना त्यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या काही दिवसांआधीपासूनच करत असल्याचं त्यांच्या ट्विटरवरून दिसून येतं. प्रत्येक ट्वीटमध्ये कुठे ना कुठे सरकारवर किंवा थेट गडकरींवर हल्ला चढवताना ते दिसतात.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

"कुठल्याही पक्षात असो वा स्वतंत्र लढलेले असो, पटोले कधीच हरले नाहीत. म्हणून निवडणूक जिंकायची कशी, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. मोदींविरोधात देशभरातल्या 282 खासदारांपैकी कुणीच आवाज उठवला नाही, पण पटोले ते केलं आणि मोदींचा एक चॅलेंजर म्हणून ते वर आले. त्यामुळे ही लढत एकतर्फी ठरणार नाही आणि नाना पटोले विजयासाठी कुठलीही कसर सोडणार नाही. ही लढत गडकरींची लोकप्रियता विरुद्ध नानांच्या संघर्षाची ताकद, अशी होईल," असं चावके सांगतात.

काँग्रेसमध्ये धुसफूस

दुसरीकडे, नागपूर काँग्रेसचेच अनेक नेते बाशिंग बांधून तयार असताना भंडारा-गोंदियाच्या नेत्याला इथून का तिकीट द्यावं, असाही प्रश्न विचारला जातोय.

2014मध्ये काँग्रेसकडून विलास मुत्तेमवार लढले होते, तेव्हा त्यांना गडकरींपेक्षा जवळजवळ अर्धी मतं मिळाली होती. त्यामुळे की काय, यंदा मुत्तेमवारांनी स्वतःच न लढण्याचं ठरवून पटोलेंचं नाव दिल्लीला सुचवल्याचं जानभोर सांगतात.

नागपुरातले प्रफुल्ल गुडधे-पाटील, आशिष देशमुख, सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद, नितीन राऊत आणि विकास ठाकरे सारखे नेते असताना पटोले यांना नागपुरात आयात करण्यात आल्याने काँग्रेसचीच मतं फुटू शकतात, असंही निरीक्षण जानभोर नोंदवतात.

दलितांचा पटोलेंना विरोध

पटोलेंच्या नावाची चर्चा होत असतानाच नागपूरच्या काही आंबेडकरवादी संघटनांनी त्यांना तिकीट न देण्याची मागणी राहुल गांधींकडे केली.

2006 साली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीमध्ये भोतमांगे कुटुंबातील चार लोकांची कुणबी समाजातील काही लोकांनी हत्या केली होती. त्यावेळी कुणबी समाजाच्या नाना पटोलेंनी आरोपींच्या समर्थनात जाहीर भूमिका घेतली होती, त्यावरून त्यांना विरोध होतो आहे.

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही स्पष्ट केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत ते पटोलेंना पाठिंबा देणार नाही. "त्यांची खैरलांजी प्रकरणातली भूमिका संशयास्पद होती. ते आरोपींच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून पटोलेंना तिकीट देणं काँग्रेससाठी धोक्याचं ठरेल," असंही ते म्हणाले.

यावर पटोले यांनी 'हफिंगटन पोस्ट'शी बोलताना प्रतिक्रिया दिली होती, "मी जातीयवादी नाही. मी त्यावेळी आरोपींना संरक्षण दिलं असतं तर लोकांनी तेव्हाच माझी राजकारणातून सुटी केली असती. नागपुरातून मला तिकीट मिळतंय म्हणून विरोधकांनीच शिजवलेला हा कट आहे."

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

जानभोर सांगतात की ही आंबेडकरी मतं भाजपची नव्हती, ती काँग्रेसचीच होती. पण आता पटोलेंना तिकीट दिल्यावरून ती मतं फुटू शकतात.

पण खैरलांजीचा मुद्दा ना 2009 मध्ये वर आला, ना 2014 मध्ये, मग आताच हा मुद्दा का वर आला? "यामागे काँग्रेसमधले रुसलेले नेते आणि भाजप यांच्यात काही संयुक्त उपक्रम चाललाय का, पाहायला हवं," अशी शंका सुनील चावके उपस्थित करतात.

पण जानभोर यांच्यानुसार "नागपूरचे मतदार जात पाहून मत देणारे नाहीत, नाहीतर माधव श्रीहरी अणे, जांबुवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित, मुत्तेमवार आणि आता गडकरी, असे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे नेते लोकसभेवर निवडून गेले नसते. त्यामुळे ही लढत कुणबी विरुद्ध ब्राह्मण अशी करण्याचा जर पटोले यांचा प्रयत्न असेल तरी त्यांना फारसा फायदा होणार नाही," ते सांगतात.

यावर 'ABP माझा'च्या स्थानिक पत्रकार सरिता कौशिक सांगतात, "जातीच्याच दृष्टीने पाहिलं तर पटोलेंकडे नक्कीच जास्त आकडे आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की नितीन गडकरी हे कुठल्याही एका जातीचे नेते नाहीत. ते बहुजनांचे नेते आहेत आणि ही नेहमीच्या जातीच्या फॉर्म्युल्यात बसणारी गोष्ट नाही. अनेक नेते हे विशिष्ट प्रदेश, सामाजिक गट किंवा जातीचे नेते म्हणून वर येतात, पण गडकरींचं तसं नाही."

मग पटोलेंकडे गडकरींविरोधात मुद्दा कोणता?

गेल्या पाच वर्षांत देशभरात गडकरींची 'विकास घडवून आणणरा नेता' म्हणून एक शक्तिशाली प्रतिमा तयार झाली आहे. विरोधकांनीही त्यांच्या कामाचं प्रमाणपत्र संसदेतली बाकं वाजवून दिलंय. नागपुरात त्यांनी अनेक प्रकल्प स्वतः लक्ष घालून पूर्णत्वास नेले आहेत आणि ते कुठल्याही नको त्या वादात सापडलेले नाहीत.

म्हणून ज्या विकासासाठी गडकरी ओळखले जातात, त्याच विकासाचा पटोले मुद्दा बनवू शकतात, असं पत्रकार सरिता कौशिक यांना वाटतं. "म्हणजे नागपुरात मेट्रोची गरज काय, त्यापेक्षा शेतकरी प्रश्नांवर लक्ष द्या, असा युक्तिवाद करत 'गडकरींनी नागपूरवर विकास लादला' असं पटोले म्हणू शकतात. पण त्याशिवाय त्यांच्याकडे कोणता वेगळा मुद्दा असेल, याबद्दल उत्सुकता आहे. त्यांनी एक निश्चित धोरण ठरवलं नाही तर ही लढत त्यांना अवघड जाईल," असं कौशिक सांगतात.

पण गडकरींविरोधात पटोले कोणत्या मुद्द्यावरून लढतील, असा प्रश्न उपस्थित होतो. आम्ही या प्रश्नाचं उत्तर थेट पटोले यांच्याकडूनही जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी फोनवरून संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, गडकरींविरोधात पटोले स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा वर करू पाहत आहेत, असं त्यांच्या एका ट्वीटवरून दिसतं. "स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा खुळखुळा तुम्हीच तर वाजवला होता... तुमच्या सभेत त्याची आठवण करून देणाऱ्या कार्यकर्त्यांना थपडं मारण्याची भाषा करता? सत्तेत एवढा माज बरा नाही," असं ते म्हणतात.

त्याला निमित्त ठरलं 6 मार्चला नागपुरात झालेली एक सभा. इथे काही लोकांनी स्वतंत्र विदर्भातची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्यावर गडकरींनी "आता आवाज कराल तर तुम्हाला ठोकून काढू इथून. बस खाली!" असं लोकांना खडसावून सांगितलं.

पटोलेंचं एक ट्वीट

फोटो स्रोत, Twitter / Nana_Patole

फोटो कॅप्शन, पटोलेंचं एक ट्वीट

पण वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निवडणुकीत किती मोठा फॅक्टर ठरेल, हे विचारल्यावर सरिता कौशिक सांगतात, "फडणवीस-गडकरी या जोडगोळीमुळे नागपूरचा आणि पर्यायाने विदर्भाचा बराच विकास झाला आहे, असं दिसतं. त्यामुळे विदर्भ वेगळा झाला तरच विकास होईल, असा काही मुद्दा राहिला नाहीये. त्यामुळे आता जे लोक स्वतंत्र विदर्भाची मागणी करत आहेत, किंवा त्याच मुद्द्यावर निवडणूक लढत आहेत, ते वेगळं काय ऑफर करतील, हेही अद्याप स्पष्ट नाही."

सुनील चावके यांनाही असंच वाटतं. "विदर्भात नसेल तरी नागपुरात त्यांनी विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे, तेही महाराष्ट्रात राहून. म्हणून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा गौण ठरला तर आश्चर्य वाटायला नको," ते सांगतात.

'...पण गडकरींनी सावध असावं'

पण या सगळ्यात जाणकारांनी गडकरींसाठी दोन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

लोकमतचे संपादक गजानन जानभोर सांगतात, "गडकरींच्या विरोधात जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे, त्यांना बोलताना भान राहत नाही आणि संयम सोडून देतात. त्यांच्या मनात काही नसतं, ते स्वतःच जोक मारतात, हसतात आणि लोक त्याचे अर्थ काढत बसतात. म्हणून आवश्यक आहे की त्यांनी तोंडावर नियंत्रण ठेवावं, कारण गंमत त्यांच्या अंगावर येते."

गडकरींवरचं एक कार्टून

"त्यांनी मध्यंतरी केलेली वक्तव्यं मोदींविरोधात होती, असं सगळीकडे आलं होतं. ते दिवसातून असं अनेकदा करत असतात, आणि त्याचे सगळीकडे अर्थ काढले जातात. म्हणून त्यांनी प्रचार करताना आवर्जून जपून बोलावं, हे महत्त्वाचं आहे."

तारखा

'महाराष्ट्र टाइम्स'चे सुनील चावके आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतात - "गडकरी हे मोदी-शहांना भविष्यात आव्हानवीर ठरू शकतात. त्यांनी नव्या वर्षांत कळत-नकळत जी काही विधानं केली आहेत, विशेषतः मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निकालांनंतर, ती सर्व मोदींसाठी बोचणारी ठरली आहेत. त्यावर नंतर गडकरींनी स्पष्टीकरणही दिलं आहे. पण लोक सूज्ञ आहेत, मतदार सूज्ञ आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"आणि मोदींची भूमिका खोडून काढण्याची क्षमता असलेला एकमेव नेता म्हणून गडकरींकडे पाहिलं जातं. अशा परिस्थितीत गडकरींना आपल्या लोकांपासूनच थोडंसं सावध राहावं लागणार आहे," असंही ते सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)