नितीन गडकरी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काय भूमिका बजावतील?

फोटो स्रोत, Getty Images
नितीन गडकरी हे भाजपचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं की नितीन गडकरी यांची काळजी वाटते कारण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पर्याय समजला जात आहे.
गडकरी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी समोर केलं जात असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. पवार यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणूक 2019मध्ये गडकरींची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी येत्या निवडणुकीत काय भूमिका बजावतील याचा वेध बीबीसी मराठीनं घेतला आहे.
गडकरी यांची लोकप्रियता पाहता सध्या भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर प्रचारसभेसाठी नेता म्हणून गडकरी यांना जास्त मागणी येऊ शकते असं नागपूरस्थित ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांना वाटतं.
गडकरींचा प्रवास
गडकरी यांचा प्रवास हा सामान्य कार्यकर्ता ते भाजप सरकारमधील एक महत्त्वपूर्ण मंत्री असा झाला आहे, त्यांच्या या प्रवासाविषयी जोशी सांगतात, "त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी संघटनेपासून केली. त्यांच्या मार्गदर्शनात नागपूर महाविद्यालयातल्या अनेक निवडणुका झाल्या आहेत. त्यांच्यातली नेतृत्वक्षमता पाहून पक्षानं त्यांना संधी दिली."
"एकदा ते विधानसभेची निवडणूक हरले होते. पुढे ते विधान परिषदेवर निवडून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे विधान परिषदेचे आमदार होते. त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या जागी गडकरी उभे राहिले. पुढे ते अनेक वर्षं पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर ते युतीच्या काळात मंत्री झाले," जोशी सांगतात.
2009मध्ये नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. गडकरी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ दुसऱ्यांदा गळ्यात पडणार होती पण पूर्ती घोटाळ्याच्या वृत्तामुळे ते दुसऱ्यांदा अध्यक्ष बनू शकले नाही, असं ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी बीबीसी हिंदीसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
गडकरींचं संघटन कौशल्य
बहुजन समाजाला आणि ब्राह्मणेतर समाजाला भाजपशी जोडण्यात गडकरींचा मोठा वाटा आहे. बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांना त्यांनी सोबत घेतलं. विदर्भातले अनेक नेते त्यांनी तयार केलेले आहेत. ते एक कुशल संघटक आहेत, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
गडकरी यांची ओळख विकासपुरुष किंवा विकासाला महत्त्व देणारा नेता अशी आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातले सर्वांत यशस्वी मंत्री असा देखील त्यांचा उल्लेख केला जातो असं यदू जोशी सांगतात. त्यांच्या या प्रतिमेचा फायदा भाजपला होऊ शकतो. भाजपच्या प्रचारसभांसाठी पंतप्रधान मोदीनंतर सर्वाधिक मागणी ही गडकरी यांना येऊ शकते, असं जोशी यांना वाटतं.
नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक लोकसभेत देखील झालं. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी देखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं. पण त्यांची मंत्री म्हणून कामगिरी ही मिश्र स्वरूपाची आहे असं पी. चिदंबरम यांनी इंडियन एक्सप्रेससाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. ते म्हणतात, "राज्य मार्गांच्या निर्मितीमध्ये त्यांची कामगिरी उत्तम आहे, गंगा शुद्धीकरणाच्या नावावर ते प्रचार करतात, जल संधारणात अपेक्षेहून कमी तर सिंचन क्षेत्रात त्यांची कामगिरी निराशाजनक आहे."
मोदींना पर्याय ठरू शकतात का?
नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींना पर्याय ठरू शकतात का? अशी चर्चा नेहमी होताना दिसत आहे. जर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर गडकरींचं नाव पुढं येऊ शकतं असं विश्लेषकांचं मत आहे.
"निवडणुका तोंडावर असल्याने अशा प्रकारच्या पर्यायी 'गेम प्लॅन'चा हा भाग असू शकतो. समजा जर मोदींचा पराभव झाला तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांचं नाव पुढं येऊ शकतं." असं राजकीय विश्लेषक सबा नक्वी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"गडकरी संघाच्या जवळचे मानले जातात. शिवाय ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि सध्या मंत्री म्हणून काम करताना कुशल प्रशासक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. सर्वच पक्षांतील नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत." नक्वी सांगतात.
इंडिया टुडे काँक्लेवमध्ये हाच प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता. पण, "आपल्याला पंतप्रधान पदाची अपेक्षा नाही किंवा महत्त्वाकांक्षादेखील नाही," असं गडकरींनी स्पष्ट केलं होतं.
राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं होतं गडकरी यांच्यात हिंमत आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना गडकरी म्हणाले होते मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. पुढे गडकरी म्हणाले, "आमच्या आणि काँग्रेसच्या DNAमध्ये हाच फरक आहे की आमचा लोकशाहीवर आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास आहे. तुमचे डावपेच आता चालणार नाहीत. मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी देशाला पुढं नेऊ." असं म्हणत आपण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








