नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशा शुभेच्छा मुलायम यांनी का दिल्या?

मुलायम सिंह यादव, मनमोहन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुलायम सिंह यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना शुभेच्छा दिल्या होत्या का?

बुधवारी सोळाव्या लोकसभेचा शेवटचा दिवस होता. सदनात अनेक ज्येष्ठ नेत्यांची भाषणं झाली. मात्र मैफलीचा केंद्रबिंदू ठरलं मुलायम सिंह यादवांचं भाषण. त्यांनी केलेलं वक्तव्य दिवसभर आणि पुढचे अनेक दिवस चर्चेत राहणार आहे.

युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या बाजूला समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव बसले होते. भाषणादरम्यान मुलायम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलायम यांच्या समाजवादी पक्षासह अनेक पक्ष काँग्रेससह मोदींविरुद्ध उभे ठाकले आहेत. अशा परिस्थितीत मुलायम यांनी केलेल्या वक्तव्याने विरोधी पक्ष अवाक झाले.

आपल्या भाषणादरम्यान मुलायम म्हणाले, ''माझी इच्छा आहे की सदनातील सदस्यांनी पुन्हा निवडून यावं. मलाही हेच वाटतं. आम्हाला बहुमत मिळू शकत नाही. मोदीजी, तुम्ही पुन्हा पंतप्रधान व्हावं. मला वाटतं सदनातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि सगळ्यांनी मिळून सभागृहाचं कामकाज चालवावं''.

मुलायम सिंह यादव, मनमोहन सिंग
फोटो कॅप्शन, मुलायम यांचे उद्गार

मुलायम यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी मुलायम सिंह यादव यांचे आभार मानले. मुलायम बोलत असताना सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावरील विस्यमचकित झाल्याचे भाव पुरेसे बोलके होते.

विरोधी पक्षाचे नेते गोंधळात

सोनिया गांधी यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बसल्या होत्या. या वक्तव्यात काहीच वावगं नाही असं सुप्रिया यांनी सांगितलं. 2014 मध्ये मुलायम यांनी मनमोहन सिंह यांनाही पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या, असं आम्ही ऐकलं आहे.

मुलायम सिंह यादव, मनमोहन सिंग

फोटो स्रोत, lstv

फोटो कॅप्शन, मुलायम सिंह यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

खरंच असं घडलं होतं? मुलायम सिंह यांनी पाच वर्षांपूर्वी खरोखरंच असं भाषण केलं होतं? त्यांनी सर्व सदस्यांच्या समक्ष मनमोहन सिंह यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या?-नाही. त्यांनी असं केलं नव्हतं.

2014 मध्ये मुलायम यांनी केलेलं भाषण ऐकलं तर सत्य काय हे समजू शकतं.

मुलायम त्यावेळी म्हणाले होते, ''अध्यक्ष महोदया (मीरा कुमार) विषण्ण करणाऱ्या परिस्थितीत तुम्ही धैर्याने सभागृहाच्या कामकाजाचं नेतृत्व केलं आहे. यासाठी आम्ही सगळे तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवादही देतो. आपापसात कितीही मतभेद असले तरी आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता''.

ते पुढे म्हणाले होते, ''यांनाही धन्यवाद देतो. विरोधी पक्षांनाही धन्यवाद देतो. पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनियाजी गांधी यांना विशेषकरून धन्यवाद देतो. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण वाटचाल करतो आहोत. म्हणून त्यांची भूमिका महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा आम्ही काही सूचना केल्या तेव्हा त्यांनी त्याप्रकरणात लक्ष घातलं. म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद.

मुलायम यांनी त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांचे आभार मानले होते.

मुलायम सिंह यादव, मनमोहन सिंग

फोटो स्रोत, Pti

फोटो कॅप्शन, मुलायम सिंह यांचं भाषण चर्चेत आहे.

अडवाणीजी, तुम्ही सभागृहातील ज्येष्ठ नेते आहात. 1972 पासून तुम्ही लोकसभेचा भाग आहात. तुम्ही वय, अनुभव आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ आहात. अवघड परिस्थितीत तुम्ही पक्षाला बळकटी प्राप्त करून दिली आहे. एकच खंत आहे- वाईट वाटून घेऊ नका. आता तुमचा पक्ष मजबूत स्थितीत येतो आहे, त्यात तुमची महत्वपूर्ण भूमिका आहे.

तुमच्याशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. ते देशासाठीचे मुद्दे होते, लहानसहान मुद्दे नाहीत. मात्र तुम्हाला तिथून इथे बसवण्यात आलं आहे. तसं घडायला नको होतं. हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणूनच तुम्ही कमकुवत होत आहात. आम्ही तुमच्या भल्याचं बोलत आहोत. ते कमकुवत झाल्याने तुम्ही कमकुवत झाला आहात. अडवाणीजींशी अनेक मुद्यांवरून संघर्ष झाला आहे.

धन्यवाद पण...

मला असं वाटतं की सभागृहातील सदस्यांनी पुन्हा निवडून यावं. त्याने आनंद होईल. स्पीकर महोदया तर नक्की जिंकून येतील. माझ्या तसंच सभागृहातील सदस्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आवश्यकता असेल तर आम्ही आमचा उमेदवार तुमच्यावतीने उभा करू.

तुम्ही सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचा विचार मांडलात. त्यानुसार तुमचं आचरणही होतं. त्यासाठी तुम्हाला विशेष शुभेच्छा. याबरोबरंच पंतप्रधानजी, सोनियाजी तसंच तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा. विरोधी पक्ष सदस्यांनाही मनापासून शुभेच्छा. सगळ्यांना चांगलं आयुआरोग्य लाभो ही प्रार्थना. सगळ्यांनी पुन्हा निवडून यावं.

2014 मध्ये सुषमा स्वराज यांनी केलेलं भाषणही महत्वाचं होतं.

मुलायम सिंह यादव, मनमोहन सिंग

फोटो स्रोत, lstv

फोटो कॅप्शन, सुषमा स्वराज

सुषमा म्हणाल्या होत्या,''सदनात अनेक गोष्टींवरून वादविवाद झाले. मतभेद झाले. मात्र त्यात अडकून न पडता कामही झालं. मी प्रेमाने म्हणू शकते की, माझे बंधू कमलनाथ आपल्या हरकतींनी सदनाच्या कामकाजात बाधा आणत असत. आदरणीय शिंदेजी त्यातून दरवेळी मार्ग काढत असत. हलक्याफुलक्या आणि सभ्यतापूर्ण वातावरणात सोनियाजी असत. आदरणीय पंतप्रधानांचं शालीन भाषण, सहनशीलता तसंच अडवाणीजींची न्यायप्रियता यामुळेच सदनाचं कामकाज सुरू राहिलं.

सुषमा यांच्या भाषणातील मुद्दे

सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, " सभागृहाचे माजी नेते आदरणीय प्रणव मुखर्जी यांची मला आठवण येते. लोकशाही संस्थांमध्ये असलेल्या विश्वासामुळे सभागृह चालवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे सगळं एका भारतीय लोकशाहीतील एका भावनेमुळं झालं. आपण एकमेकांचे विरोधक आहोत मात्र शत्रू नाही. आम्ही वितारधारेवर आधारित विरोध करतो, धोरणांचा, कार्यक्रमांचा विरोध करतो."

त्या पुढे म्हणाल्या, " अध्यक्षाजी, आता आपण निवडणुकांना सामोरे जात आहोत. निवडणूक लढविण्यासाठी जाताना विजयी भव असा आशीर्वाद देण्याची आवश्यकता आहे. पण तसं केलं तर ते असत्य होईल. म्हणून मी विजयी भव असा आशीर्वाद देऊ शकत नसले तरी यशस्वी भव असा आशीर्वाद देते. आपण सर्वांनी यशस्वितेसह निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे."

"लोकशाहीमध्ये सर्वात मोठे न्यायालय लोकच असतात. विजय आणि पराजयाचा निर्णय तेच घेतात. ते कोणालाही विजयी करून 16 व्या विधानसभेत पाठवोत, जी भूमिका जनता आपल्याला देईल ती सौहार्दाने आपण पार पाडू."

ज्या सौहार्दपूर्ण भावनेने आपण या अंतिम सत्राच्या अंतिम दिवशी निरोप घेत आहोत त्याच भावनेसह आपण परत येऊ शकू आणि सद्भावना व सौहार्दासह 16 वी लोकसभा चालवू. याच शुभेच्छा देऊन मी माझं भाषण समाप्त करते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)