शिवसेना-भाजप युती झाल्यानंतरही जे पटणार नाही, त्याला विरोधच: आदित्य ठाकरे #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया:

1. युती झाल्यानंतरही जे पटणार नाही त्याला विरोधच - आदित्य ठाकरे

कर्जमाफी, नाणार प्रकल्प या संदर्भात उत्तरं मिळाल्यामुळे भाजपशी पुन्हा युती करण्यात आली. परंतू युती झाल्यानंतरही जे पटणार नाही त्याला विरोध करण्यात येईल, असं युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघातील युवकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आदित्य संवाद नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकमेकांशी कायम भांडत राहिलात तरीही युती का केली असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

देशाची सध्याची परिस्थिती पाहता सध्या युती करणं गरजेचं होतं. पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे कुणाचाच फायदा झाला नाही, असंही ते म्हणाले.

2. काश्मीर कोंडीमुळे असंतोषाचं वातावरण

काश्मीरला देशाशी जोडणाऱ्या आणि सर्व ऋतूंमध्ये सुरू असणाऱ्या जम्मू श्रीनगर महामार्गावरील नागरी वाहनांच्या वाहतुकीवर रविवारपासून आठवड्यातले दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे.

मात्र त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोर्चे काढले आहेत. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी या निर्णयाला विरोध करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.

हे निर्बंध तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही केली आहे.

3. निवडणूकपूर्व छाप्यांमध्ये निष्पक्षता हवी- निवडणूक आयोगाचे आदेश

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर 52 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राजकीयदृष्ट्या निष्पक्ष कारवाईची सूचना सर्व सरकारी संस्थांना दिल्याची बातमी नेटवर्क 18ने दिली आहे. तसंच अशा छाप्यांबाबत निवडणूक आयोगाला सूचना देण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने सरकारी संस्थांना दिले आहेत.

निवडणुकीच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठीची कारवाई करताना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असं निवडणूक आयोगाने तपास संस्थांना जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. आचारसंहिता अंमलात आल्यापासून प्राप्तिकर विभागाने अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर छापे मारले आहेत.

4. 'मतमोजणीला उशीर झाला तरी चालेल, VVPATच्या पावत्या तपासा'

लोकसभा निवडणुकीत 13.5 लाख EVM वापरल्या जाणार आहेत. या मशीनला जोडून असलेल्या VVPATच्या निदान 50 टक्के पावत्यांची पडताळणी करावी. त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेला उशीर झाला तरी चालेल, अशा आशयाची मागणी विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात केल्याची बातमी NDTVने दिली आहे.

VVPATची पडताळणी केली तर निकालाला सहा दिवस उशीर होईल, असं निवडणूक आयोगाने याआधी कोर्टात सांगितलं होतं. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्षांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी EVM आणि VVPATची पडताळणी करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिवादींनी ते ठरवतील त्या मतदानयंत्रावर एक हजार वेळा आणि मतदान सुरू होण्याच्या दीड तासांपूर्वी 50 वेळा चाचणी करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

5. मतदानानंतर सपा-बसपाशी आघाडीचा पर्याय खुला - ज्योतिरादित्य सिंधिया

कपोकल्पित गोष्टींबाबत बोलण्यात अर्थ नाही. सपा-बसपाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कारणं काहीही असोत, पण काँग्रेस आणि सपा-बसपा एकत्र येऊ शकले नाहीत. मात्र याचा अर्थ भविष्यात ते एकत्र येणार नाहीत, असं नाही. एकत्र येण्याचा पर्याय कायमच खुला आहे. मतदानानंतर कदाचित आघाडी होऊ शकते, असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

ते पुढे म्हणतात, "दीड महिन्यापूर्वी पश्चिम उत्तर प्रदेशची धुरा माझ्याकडे सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही प्रचाराची आखणी केली आहे. मी निवडणुकीला उभा आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचं नवं सरकार सत्तेत आहे आणि पश्चिम उत्तर प्रदेश अशी माझ्याकडे तिहेरी जबाबदारी आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)