पुणे लोकसभा मतदारसंघ: जोशी विरुद्ध बापट सामना रंगणार की मैत्रीपूर्ण लढत होणार?

    • Author, हलिमाबी कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पुणे लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला पुण्यात मतदान होणार असून भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात यावेळी थेट लढत रंगणार आहे.

गिरीश बापट आणि मोहन जोशी या दोन उमेदवारांची बलस्थानं आणि त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत याचा वेध बीबीसी मराठीने घेतला आहे.

गिरीश बापट आणि मोहन जोशी यांची मैत्री चर्चेचा विषय आहे. मोहन जोशींना काँग्रेसने उमेदवारी दिल्याबद्दल गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी काँग्रेसचे फेसबुकवरून आभार मानले होते असं वृत्त सरकारनामाने दिलं होतं.

असं असलं तरी राजकारणात मैत्री पेक्षा कारकीर्द महत्त्वाची असते, त्यामुळे दोन्ही उमेदवार सर्व ताकदीनिशी लढतील असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे मोहन जोशी हे गिरीश बापट यांना कडवं आव्हान देतील असं मत व्यक्त केलं जात आहे.

"मैत्री असली तरी राजकारणात लढत महत्वाची असून मोहन जोशी आव्हान निर्माण करतील," असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी म्हटलं आहे.

संघ स्वयंसेवक ते मंत्री

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

१९९६साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती, पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले.

काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना देखील लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव असून १९९९ साली त्यांचा भाजपच्या प्रदीप रावत यांनी पराभव केला होता.

"दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू आहे. त्याचबरोबर पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी संयमित भूमिका पार पाडत शहरी आणि ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न हाताळला आहे. पुणे मेट्रोचा प्रश्न, PMRDA ( पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण महामंडळ) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसंच चांदणी चौकातील उड्डाणपूल अशा कामांचा सपाटा लावला आहे," असं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी सांगितलं.

बापट यांच्यासमोरील आव्हानं

पुलवामा आणि बालाकोट प्रकरणानंतर मोदींनी देशात राष्ट्रवादाची एक लाट आणली आहे त्याचा फायदा गिरीश बापटांना होईल असं अनंत दीक्षित यांना वाटतं. मात्र भारतीय लोकशाहीत मतदारांनी अनेकदा तख्त उलटले आहेत. त्यामुळे चमत्कार देखील घडू शकतो, असं मत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. 

तर पुणे शहराचा मतदार बदलत आहेत. मूळ पुणेकर मतदारांबरोबर शहरात झालेलं स्थलांतर, नव्याने समाविष्ट झालेली अकरा गावं, आयटी क्षेत्रातील नोकरदार, उपनगरातल्या मतदारांचा कौल महत्वाचा ठरेल, अस मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केलं आहे.

असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची जोशींना मिळू शकते साथ

मोहन जोशी हे विधानपरिषदेचे आमदार, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीचा अनुभव असलेले उमेदवार असून युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केलेली आहे.

मोहन जोशींचा जनसंपर्क चांगला आहे. दलित ,मुस्लिम ,ख्रिश्चन असंघटित कामगार व्यापारी काँग्रेसची साथ देईल. पुण्यातील काँग्रेसचा पारंपारिक मतदार हा ३ लाख ५० हजारावर असून राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम साथ असल्याने मोहन जोशी यांना निवडणूक सोपी जाईल. असं कुमार सप्तर्षी यांना वाटतं.

गिरीश बापट यांचा कसबा, पर्वती, कोथरुड या ठिकाणी तुलनेने मोठा मतदार असला तरी उर्वरित मतदार संघामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर असलेला मतदार आहे.

बापट यांचं काम चांगलं असलं तरी मुस्लिम, ख्रिश्चन ,दलित समाज, व्यापाऱ्यांमध्ये भाजप विषयी नाराजी आहे. जीएसटी, नोटाबंदी यांमुळे छोटे व्यापारी बुडाले, २००४ साली इंडिया शायनिंग नारा दिला तरी पुण्यात काँग्रेस विजयी झाला होता. याची पुनरावृत्ती होईल असा अंदाज कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केला.

जोशी यांच्यासमोरील आव्हानं

"सुरेश कलमाडी गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय नाहीत. त्यामुळे कलमाडी यांच्या नंतर पुणे काँग्रेसमधील खंबीर नेतृत्वाची कमतरता मोहन जोशी यांना भरून काढता आली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत अनेक नेतृत्व तयार होऊन गटतट निर्माण झाले. काँग्रेसमधील नेतेच काँग्रेसचा पराभव करतात," असं मेहता यांना वाटतं.

"भाजप सुसंघटित आहे. तर काँग्रेसचं तसं नाही. तिकीट जाहीर करायला उशीर झाला त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर परिणाम करणारं ठरतं. त्यातच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेस प्रवेश आणि त्यांच्या उमेदवारीची चर्चा याचाही परिणाम कार्यकर्त्यांवर झाला असेल," असं मेहता सांगतात. जोशी यांच्या उमेदवारीला गायकवाड यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जोशींना निवडून आणू असं गायकवाड म्हणाले.

एकेकाळी पुण्याच्या काँग्रेसमध्ये जे घडायचं त्याचं महाराष्ट्र आणि केंद्रात अनुकरण केलं जायचं. आता तशी परिस्थिती नसल्याचं अनंत दीक्षित सांगतात.

पुणे महापालिकेत ९० पेक्षा जास्त नगरसेवक भाजपाचे असून काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या दहावर आहे.

दोन्ही पक्षांचा आणि उमेदवारांचा विचार केला तर ही लढत तुल्यबळ होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

"मोहन जोशी शेवटच्या क्षणापर्यंत गिरीश बापट यांच्याविरोधात तुल्यबळ लढत देतील," असं कुमार सप्तर्षी यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)