You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोपीचंद पडळकर: वंचित बहुजन आघाडीचे सांगलीचे उमेदवार संघ आणि संभाजी भिडे यांच्याविषयी काय म्हणाले?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पाहा संपूर्ण मुलाखत
"जर दोषी असतील तर संभाजी भिडेंवर कारवाई होईल," असं 'बहुजन वंचित आघाडी'चे सांगली लोकसभा मतदारसंघातले उमेदवार गोपीचंद पडळकर 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले.
याच वेळी त्यांनी वादग्रस्त 'शिवप्रतिष्ठान' आणि 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'शीही असलेल्या त्यांच्या जवळिकीचा इन्कार केला.
धनगर समाजाचे नेते असलेले पडळकर यांचं नाव चर्चेत आलं जेव्हा त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढणाऱ्या 'वंचित बहुजन आघाडी'ची सांगलीतून उमेदवारी मिळाली.
त्यानंतर त्यांचे कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या 'शिवप्रतिष्ठान संस्थाना'चे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. त्यासोबतच 'संघा'च्या गणवेशातली छायाचित्रही प्रकाशित झाली.
प्रकाश आंबेडकरांची संघाविरुद्ध आणि संभाजी भिडे यांना प्रखर विरोधाची भूमिका पाहता पडळकरांच्या या फोटोंवरून वाद निर्माण होणं साहजिक होतं.
"संभाजी भिडेंबरोबरचे जे फोटो आहेत ते माझेच फोटो आहेत. पण भिडेंसोबत सांगली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांचे संबंध आहेत. ते माझेच आहेत असं नाही. पण 'शिवप्रतिष्ठान'चा मी कार्यकर्ता नाही आहे. तिथं संपर्क असल्यामुळं आम्ही अनेक वेळा त्यांना भेटतो. आता जी प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे," असं म्हणत पडळकर यांनी आपली बाजू मांडली आहे.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगांव दंगल प्रकरण घडल्यानंतर आणि त्यामध्ये संभाजी भिडेंचं नाव आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भिडेंना या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हटलं होतं आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या कारवाईबद्दल पडळकरांची काय भूमिका आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले,"भीमा कोरेगांवबद्दल पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळं मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही. भिडेंवर मी काही बोलणार नाही. ते जर दोषी असतील तर कारवाई होईल."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका हासुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या प्रचारातला मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे संघाच्या गणवेशातले पडळकर यांचे फोटो व्हायरल होताच वाद सुरू झाला.
"मी संघाचाही कार्यकर्ता नाही. मी संघाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. तो फोटोही माझाच आहे. पुण्यात झालेल्या 'शिवशक्ती संगम' कार्यक्रमातला तो फोटो आहे. याव्यतिरिक्त माझा संघाशी काही संबंध नाही. मी शाखेवर कधी गेलो नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे तिच्यासोबत मी ठाम आहे," असं गोपीचंद पडळकर या मुलाखतीत म्हणाले.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात पडळकर हे सध्या राज्यातला सेना-भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या महादेव जानकर यांच्यासोबत आघाडीवर होते. जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातही ते होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले.
आटपाडी-खानापूर परिसरात काम करताना सांगली जिल्ह्यातला भाजपाचा चेहरा म्हणून आणि धनगर आरक्षणाचे समर्थक म्हणूनही ते पुढे आले. पण त्यानंतर सध्या भाजपचे सांगलीचे खासदार असणालेले संजयकाका पाटील यांच्यासोबतचे त्यांचे वाद जास्त गाजले.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि आश्वासनावर भाजप सरकारनं फसवणूक केली या मुद्द्यावर बाहेर पडून आता पडळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. "आम्ही जे आंदोलन उभं केलं. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार चालढकल करतंय हे लक्षात आलं. मग आम्ही बाहेर पडलो जुलैमध्ये. निवडणूक तर आता लागली. पण आमचा निर्णय अगोदरच झाला होता," पडळकर म्हणाले.
धनगर समाजाचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता आणि सांगली, माढा या मतदारसंघांमधली या समाजाच्या मतदारांची असलेली संख्या पाहता पडळकरांच्या आव्हानाकडे लक्षपूर्वक पाहिलं जात आहे.
कोण आहेत गोपीचंद पडळकर?
गोपीचंद पाडळकर हे दुष्काळी भागातल्या आटपाडीचे आहेत. या आटपाडीतलं पडळकरवाडी हे त्यांचं गाव, ज्याचं वैशिष्टय म्हणजे इथल्या एकूण 100 कुटुंबांमध्ये 40 जण डॉक्टर आहेत.
खानापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा निवडणूकही लढवली आहे. 2009 मध्ये 'रासप'चे रिपब्लिकन डावे लोकशाही आघाडीतले उमेदवार मधून आणि 2014 मध्ये भाजपतर्फे पराभूत झाले, पण त्याच वेळेस वाढत गेलेल्या धनगर आरक्षण आंदोलनात त्यांचं नेतृत्व पुढे येत गेलं.
2012पासून ते आंदोलनात जास्त सक्रीय झाले. त्यामुळेच आता धनगर समाजाची अधिक मतं असलेल्या या पट्ट्यात त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.
पाडळकरांचं राजकारणाव्यतिरिक्त नवं काम म्हणजे आता या निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात ते चित्रपटाचे लेखक, निर्माते आणि अभिनेतेही झाले आहेत. 4 एप्रिललाच त्यांचा पहिला मराठी चित्रपट 'धुमस' राज्यभर रिलीज होतोय. एकदम दक्षिण भारतीय स्टाईल ॲक्शन चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)