You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
VK Singh BBC Interview: भारतीय सेनेला ‘मोदींची सेना’ म्हणणारेच देशद्रोही
पाहा संपूर्ण मुलाखत -
"जर कुणी म्हणत असेल की देशाची सेना मोदींची सेना आहे तर तसं म्हणणारी व्यक्ती फक्त चुकीचीच नाही तर देशद्रोहीसुद्धा आहे," असं विधान माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी बीबीसीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलं.
1 एप्रिलला गाझियाबादमध्ये व्ही. के. सिंह यांच्यासाठी प्रचार करताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं की, "काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालतात आणि मोदींचं सैन्य दहशतवाद्यांना गोळी आणि गोळा (बाँब) देतात." यावेळी भारतीय सैन्याचा उल्लेख 'मोदीजी की सेना' असा केल्यावरून विरोधी पक्षांनी तर आक्षेप घेतलाच, शिवाय अनेक माजी सैन्य अधिकाऱ्यांनीही त्यावर हरकत घेतली.
पण देशाच्या सैन्याला मोदींचं सैन्य म्हणणं योग्य आहे, हाच प्रश्न बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी व्ही. के. सिंह यांना विचारला होता. त्याचं उत्तर देताना "सैन्य देशाचं असतं, कुण्या एका नेत्याचं नाही," असं त्यांचं म्हणणं होतं.
पण ही मुलाखत प्रसिद्ध केल्यानंतर सिंह यांनी मात्र ट्वीट करून आपलं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं, असा आरोप ठेवत BBCच्या पत्रकाराला 'प्रेस्टिट्यूट' म्हटलं.
पण प्रत्यक्षात काय झालं, त्या प्रश्नाचं त्यांचं उत्तर तुम्ही इथे अनकट पाहू शकता -
या व्हीडिओत दिसतंय की बीबीसी प्रतिनिधीच्या त्या प्रश्नाचं उत्तर देताना सिंह म्हणाले, "भाजपचा प्रचार करणारेही स्वतःला सैन्य म्हणवून घेतात. पण आपण कोणत्या सैन्याची गोष्ट करतो आहोत? देशाच्या सैन्याची की राजकीय कार्यकर्त्यांची? मला संदर्भच कळत नाही. जर कुणी म्हणत असेल की भारताचं सैन्य मोदींचं सैन्य आहे तर ते चुकीचे तर आहेतच, शिवाय देशद्रोहीसुद्धा आहेत."
सिंह पुढे म्हणाले, "आपल्या देशाचं सैन्य तटस्थ आहे. राजकारणापासून अलिप्त कसं राहायचं, हे त्यांना चांगलंच जमतं. आता देशाचं सैन्य आणि कार्यकर्त्यांची फौजा यांना एकाच तराजूत तोलण्याचं काम कोण करतंय काय माहीत. काही ठराविक लोकच असतील ज्यांच्या मनात अशा गोष्टी येतात, कारण त्यांच्याकडे करण्यासारखं दुसरं काही नाहीये."
भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल रामदास आणि नॉर्दर्न कमांडचे माजी प्रमुख जनरल डी. एस. हुड्डा या दोघांचंही म्हणणं आहे की सैन्याचं राजकारण केलं जातंय. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता व्ही. के. सिंह म्हणाले, "ते सैन्याचं राजकारण केलं जातंय, असं नाही म्हणाले. ते म्हणाले की सैन्याच्या यशस्वी कामगिरीचा उपयोग राजकीय हित साधण्यासाठी केला जात आहे. डी. एस. हुड्डा पण हेच म्हणाले. पण सैन्याचं राजकारण होतंय, असं कुणी म्हणालं नाही."
मग सर्जिकल स्ट्राईकवर सिनेमा का बनवला गेला, असं विचारल्यावर ते म्हणाले, "सिनेमा तर काय सगळ्याच गोष्टींवर बनतात. एक चित्रपट आला होता, 'प्रहार' नावाचा, दहशतवाद्यांच्या विरोधात. तो तर 90च्या दशकात आला होता."
राजकीय सभांमध्ये CRPFच्या मृत जवानांचे फोटो का लावले जात आहेत? या प्रश्नाचं उत्तर देताना सिंह म्हणाले, "मला सांगा, मी जर इथे एखादा बॅनर लावला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली दिली तर ते राजकारण ठरेल का? ज्यांना वाटतं की हे राजकीय फायद्यासाठी केलं जात आहे, त्यांना पहिलीच्या वर्गात पाठवलं पाहिजे, हे शिकायला की राजकारण म्हणजे नक्की काय."