लोकसभा 2019: अजित पवार - 'पार्थ पवार चुकला म्हणून फासावर लटकवता का?' #5मोठ्यााबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. पार्थ चुकला म्हणून फासावर लटकवता का?- अजित पवार

वारंवार विविध कारणाने पार्थ पवारला सोशल मीडियावर ट्रोल केल्यामुळे त्यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार संतप्त झाले आहेत. "पार्थ राजकारणात नवखा आहे. नवख्याकडून चुका होत असतात म्हणून त्याला फासावर लटकवता का?" अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिल्याची बातमी लोकमतने दिली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत. पार्थ पवार यांनी केलेल्या पहिल्या भाषणावरही सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर मागच्या शनिवारी दापोडीतील विनियार्ड चचेर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांची पार्थ पवारांनी भेट घेतली. दापोडीतील विनियार्ड चर्चेमध्ये पार्थ पवार प्रचारासाठी पोहोचले होते.

"सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावं लागतं. ही गोष्ट अजित पवारांनी केली असती तर ती चूक ठरली असती. पण पार्थकडून ते नकळत झालं," अशी कबुली अजित पवारांनी दिली.

2. भाजप, शिवसेना खासदारांच्या मालमत्तेत 60 टक्क्यांनी वाढ

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवत असलेल्या भाजप शिवसेना खासदारांची मालमत्ता सरासरी 3.20 कोटी रुपयांनी म्हणजेच 60 टक्क्यांनी वाढली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) यांनी सात मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या 116 पैकी 115 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण करून हे निष्कर्ष जाहीर केले आहेत.

त्यानुसार पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी 33 उमेदवार कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता दोन कोटी 35 लाख इतकी आहे. 19 उमेदवांरांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 10 गंभीर स्वरूपाचे असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

3.कट्टरवाद्यांनी काश्मिरी जवानाची केली हत्या

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागात घरी सुटीवर आलेल्या एका जवानाची शनिवारी काही कट्टरतावाद्यांनी हत्या केल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात मोहम्मद रफी यातू यांना त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या. सोपोरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जावेद इक्बाल यांनी सांगितलं की हा मोहम्मद यांना अनेक गोळ्या लागल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

गेल्यावर्षी जून पासून आतापर्यंत जवानाची हत्या होण्याची ही तिसरी घटना आहे.

4. केंद्रात सरकार स्थापन करण्यात तृणमूलची महत्त्वाची भूमिका - ममता बॅनर्जी

केंद्रात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी तृणमूल काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे आहेत. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि नागरी सुधारणा कायद्याच्या नावाखाली देशातील नागरिकांना परदेशी ठरवण्यात येत आहे,

जो माणूस आपल्या बायकोची काळजी घेऊ शकत नाही, तो देशाच्या नागरिकांची काय काळजी घेणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. "2014 पासून मोदी फक्त बोलत आहेत. त्यांनी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही," असंही ते म्हणाले.

5. क्षेपणास्त्र चाचणीचा कचरा 45 दिवसांत नष्ट होईल- DRDO प्रमुख

भारताने 27 मार्चला उपग्रह नष्ट करू शकणाऱ्या (ASAT) 'मिशन शक्ती'च्या घोषणेनंतर नासाने भारतीय अंतराळ मोहिमेवर टीका केली होती. त्यावर बोलताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) अध्यक्ष जी.सतीश रेड्डी यांनी दावा केला आहे की ASATच्या चाचण्यानंतर अंतराळातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला बाधा पोचवणारा कोणताही कचरा असण्याची शक्यता नाही. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

अंतराळातील कचरा जमा होऊ शकतो. मात्र आता चाचण्या होऊन दहा दिवस झाले आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला धोका होण्याची कोणतीही शक्यता नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त सॉफ्टवेअरनेही स्पेस स्टेशनला धोका नसल्याचं सिद्ध झालं आहे. तसंच हा कचरा 45 दिवसांत नष्ट होतो असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)