वायनाड लोकसभा निवडणूक: राहुल गांधींच्या रॅलीत पाकिस्तानी झेंड्याचे सत्य

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून अर्ज दाखल केल्यापासून अफवांचा ऊत आला आहे.

वायनाडमधील राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आले आणि केरळमधील काँग्रेस कार्यालयाला 'इस्लामी रंगात' रंगवण्यात आल्याच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.

वायनाड मतदारसंघातील मतदारांच्या संख्येवरूनदेखील बऱ्याच अफवा पसरवण्यात आल्या आहेत. लोकांनी हिंदू आणि मुस्लिम मतदारांच्या संख्येवरून वेगवेगळी माहिती टाकली. बीबीसीने याचीच पडताळणी करून गुरुवारी एक बातमी प्रसिद्ध केली होती.

आम्ही वायनाडमधील राहुल गांधींच्या प्रचार रॅलीविषयीच्या काही पोस्ट पडताळून पाहिल्या आणि त्या पोस्ट चुकीच्या असल्याचं आम्हाला आढळलं.

पहिली अफवा

2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. राहुल गांधी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले, तेव्हा लोकांनी 'पाकिस्तानी झेंडे' फडकावून त्यांचे स्वागत केलं.

बॉलिवुड अभिनेत्री कोयना मित्रा यांनीदेखील याच मजकुरासह हा फोटो ट्वीट केला आहे.

ट्विटर, फेसबुक आणि शेअरचॅटवर शेकडो वेळा शेअर करण्यात आलेला हा फोटो राहुल गांधींच्या वायनाड रॅलीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा फोटो 28 जानेवारी 2016चा आहे.

2016 सालच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन यूनियन मुस्लीम लीगने केरळमधील कोझिकोड आणि मल्लापूरम जिल्ह्यात अनेक रॅली काढल्या होत्या. हा फोटो त्यातीलच एका रॅलीचा आहे.

इंडियन युनियन मुस्लीम लीगचे सरचिटणीस पी. के. कन्यालीकुट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली या रॅली काढण्यात आल्या होत्या.

कन्यालीकुट्टी यांनी केरळ राज्य सरकारमध्ये अनेक मंत्रिपदं भूषविली आहेत तर 2017 साली मल्लापूर लोकसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक जिंकून ते खासदारही झाले होते.

वायनाडमध्ये पाकिस्तानी झेंडे?

राहुल यांच्या वायनाड रॅलीचे काही फोटो आणि व्हिडियो शेअर करत काही लोकांनी दावा केला आहे की या रॅलीत पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आले.

सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या रॅलीतील व्हीडियोजमध्ये जे हिरवे झेंडे दिसत आहेत तो पाकिस्तानचा असल्याचा सांगत व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर शेअर होत आहे.

मात्र या रॅलीमध्ये चंद्र आणि चांदणी असलेला जो हिरवा झेंडा दिसत आहे तो पाकिस्तानचा नाही तर इंडियन युनियन मुस्लीम लीगचा आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने इंडियन युनियन मुस्लीम लीगला मान्यता दिलेली आहे. याच लीगचे काही कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या रॅलीत सहभागी झाले होते आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा हातात घेतला होता.

केरळमध्ये काँग्रेसने स्थानिक पाच पक्षांना सोबत घेऊन युनायटेड डेमोक्रेटिक फ्रन्ट (UDF) ही आघाडी बनवली आहे. या आघाडीत काँग्रेसनंतर इंडियन युनियम मुस्लीम लीग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष आहे.

1948 साली मुस्लीम लीगशी फारकत घेत मोहम्मद इस्माईल यांनी इंडियन युनियन मुस्लीम लीगची (IUML) स्थापना केली होती.

राहुल गांधी यांच्या दक्षिण भारतातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचे IUMLने स्वागत केले आहे आणि या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.

इंडियन युनियम मुस्लीम लीगचा झेंडा हिरवा आहे आणि या झेंड्यात डावीकडे वरच्या भागात चंद्र आणि चांदणी आहे. मात्र हा झेंडा पाकिस्तानच्या झेंड्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

'ती' इमारत काँग्रेसची नाही

सोशल मीडियावर या इमारतीचा फोटो शेअर करून ही इमारत वायनाडमधील काँग्रेस पक्षाचे कार्यालय असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक युजर्सने तर हा दावादेखील केलाय की निवडणुकीच्या काळातच या इमारतीला हिरवा रंग देण्यात आला.

बीबीसीला व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या फोटोबाबत लोकांनी 'काँग्रेस पक्षाने खरंच आपल्या कार्यालयाला पाकिस्तानी झेंड्याचा रंग दिला आहे का?', अशी विचारणा केली आहे.

मात्र ही इमारत वायनाडमधील काँग्रेस कार्यालय नाही. हे इंडियन युनियन मुस्लीम लीगचे कार्यालय आहे.

फोटो नीट बघितला तर इमारतीवर डावीकडे वरच्या बाजूला इंडियन युनियन मुस्लीम लीगचे चिन्ह (शिडी) आहे. शिवाय इमारतीवर एका व्यक्तीचा फोटो दिसतो. हा फोटो IUMLचे नेते सईद मोहम्मद अली शिहाब यांचा आहे. 2009 साली त्यांचा मृत्यू झाला होता.

या इमारतीवर मल्याळम भाषेत मजकूर लिहिला असल्याकारणाने इतर राज्यातील जनतेला तो कळणार नाही, हे उघड आहे.

मात्र मल्यालम भाषेत लिहिलेला हा मजकूर आहे - 'इकबाल नगर, लीग हाऊस'.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)