You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: 'काँग्रेसला दोन पंतप्रधान हवेत, एक भारतात तर दुसरा काश्मीरमध्ये'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता नांदेडमध्ये युतीचा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. त्यासभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. "नव्या भारताचं आमचं व्हिजन स्पष्ट आहे. पण काँग्रेस कुठे घेऊन जाणार आहे हे देखील आम्हाला कळलं आहे. त्यांना दोन पंतप्रधान पाहिजे आहेत. एक भारतात आणि दुसरा काश्मीरमध्ये. ओमर अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला उघडपणे म्हणत आहेत की देशात दोन पंतप्रधान हवेत, आणि काँग्रेस त्यांचं समर्थन करतं." अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
"काँग्रेसला AFSPA नकोय. काँग्रेसला फुटीरतावाद्यांशी चर्चा करावीशी वाटत आहे," असंही ते पुढे बोलताना म्हणाले.
ज्या दिवशी काँग्रेसने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उचललं तेव्हाच स्पष्ट झालं की काँग्रेसची दिशा काय आहे असं मोदी म्हणाले.
ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणाचा उल्लेख त्यांनी केला. काँग्रेसचा वारसा फक्त भ्रष्टाचाराचा आहे. आज नामदार परिवार जामीनावर बाहेर आहे असं ते म्हणाले. गांधी घराण्याचा उल्लेख न करता त्यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला.
राहुल गांधी वायनाडमधून उभे राहिले आहेत. त्यावरही त्यांनी टीका केली. राहुल गांधी यांनी सीट देखील अशी शोधली की जिथं बहुसंख्य लोक हे अल्पसंख्य आहेत. असं ते म्हणाले. सोशल मीडियावर तुम्ही राहुल गांधी यांच्या रॅलीचे चित्र पाहिले असतील. काँग्रेसचा झेंडा तिथं दिसत नव्हता. त्या रॅलीत मुस्लीम लीगचे झेंडे फडकवले गेले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि झेंडा दिसत देखील नव्हता.
काँग्रेसची स्थिती टायटनिकसारखी आहे. रोज ती बुडत चालली आहे. जे-जे लोक त्यांच्यासोबत आहेत ते देखील बुडत आहेत, असं ते म्हणाले. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची स्थिती नीट नाही. हिंगोलीचे खासदार राजीव सातव निवडणुकीला उभे राहिले नाहीत, शरद पवार देखील निवडणुकीला देखील उभे राहिले नाहीत इतकंच काय पवारांचे सेनापती प्रफुल पटेल देखील निवडणुकीला सामोरे गेले नाही असं मोदी म्हणाले.
महाराष्ट्रात काँग्रेसइतकी अशक्त झाली आहे की त्यांच्याकडे जितके आमदार आहेत तितकेच गटतट झाले आहे. ते काय काम करणार. ते फक्त स्वतःच्या विकासावरच लक्ष ठेवतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)