You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UPSC 2018 List : युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्यांदाच परीक्षा देणारा कनिष्क कटारिया देशात प्रथम
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2018 या वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांची यादी जाहीर केली आहे.
कनिष्क कटारिया देशात प्रथम आला आहे तर भोपाळची सृष्टी देशमुख ही देशात पाचवी आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने एकूण 759 जणांची शिफारस केंद्राकडे केली आहे. ही यादी लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.
या यादीकडे पाहिल्यावर पहिल्या शंभर उमेदवारांपैकी काही नावं ही महाराष्ट्रियन वाटतात. धोडमिसे तृप्ती, आव्हाळे मनिषा, वैभव गोंदणे, हेमंत पाटील आणि अक्षय अग्रवाल हे उमेदवार या यादीत झळकले आहेत. ही संपूर्ण यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.
कनिष्क कटारियाने देशात प्रथम
कनिष्क कटारियाने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कनिष्क आयआयटी मुंबईचा विद्यार्थी आहे आणि तो राजस्थानचा रहिवासी आहे. बीबीसी हिंदीने त्याची मुलाखत घेतली त्यात त्याने सांगितलं की, हा त्याचा पहिला प्रयत्न होता आणि त्यात त्याने यश मिळवलं.
सात-आठ महिने दिल्लीत राहून त्याने परीक्षेची तयारी केली होती. परीक्षा देण्यापूर्वी साडेतीन वर्षं त्याने नोकरी केली होती. "कोचिंगच्या मदतीने माझी बेसिक तयारी झाली मग मी सेल्फ स्टडीच केली," असं त्याने बीबीसी हिंदीला सांगितलं.
कनिष्क सांगतो की तो रोज 8-10 तास अभ्यास करत असे आणि परीक्षा जवळ आल्यावर दिवसाला 15 तास अभ्यास करत असे. कनिष्कने दक्षिण कोरियात दीड वर्षं काम केलं होतं. तिथलं प्रशासन पाहून आपल्या देशातही प्रशासकीय सेवेत काम करावं असं त्याला वाटू लागलं.
"मी दीड वर्षं दक्षिण कोरियात होतो आणि 1 वर्षं बंगळुरूमध्ये काम केलं. तेव्हा मी दोन्ही देशांचा तुलनात्मक विचार करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथली सिस्टम बदलायला हवी आणि त्यासाठी सिस्टममध्ये शिरकाव करायला हवा. माझ्या वडिलांमुळे मला प्रशासकीय काम कसं असतं याची कल्पना होती," असं कनिष्क सांगतो.
तृप्ती धोडमिसे ही देशात 16 वी आली आहे. मनिषा आव्हाळे 33 वी, वैभव गोंदणे 25 वा, हेमंत पाटील 39 तर अक्षय अग्रवाल देशात 43वा आला आहे.
या यादीत झळकलेले विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा, पोलीस सेवा आणि इतर केंद्रीय सेवेत अधिकारी म्हणून काम करतात.
759 विद्यार्थ्यांपैकी 361 उमेदवार हे सर्वसामान्य वर्गवारीत आहेत, 209 उमेदवार हे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत, 128 जण अनुसूचित जातीतील तर 61 उमेदवार हे अनुसूचित जमातीतील आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) साठी 91, परराष्ट्र सेवा IFS साठी 15, पोलीस सेवा (IPS) साठी 75, आणि सेंट्रल सर्व्हिसेस 'अ' समूहासाठी 198 आणि 'ब' समूहासाठी 35 जणांची शिफारस करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)