पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा खोटा - अमेरिकन नियतकालिक

भारताने पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं असा दावा केला होता, तो दावा खोटा असल्याचं अमेरिकेच्या नियतकालिकाचं म्हणणं आहे.

फॉरेन पॉलिसी या अमेरिकन नियतकालिकाने म्हटलं आहे की पाकिस्तानने आपल्या लढाऊ विमानांची मोजणी केली आणि त्यांची संख्या बरोबर भरली आहे.

आपलं नेमकं किती नुकसान झालं आहे हे भारताने स्पष्ट करावं, असं आवाहन पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी केलं आहे.

नियतकालिकाने सांगितलं की दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचं निरीक्षण केलं. त्यात असं आढळलं की ती सुरक्षित आहेत.

भारताने असा दावा केला होता की विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या ताब्यात जाण्याआधी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं. नियतकालिकाने दिलेल्या बातमीनंतर भारताच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

पाकिस्तानने अभिनंदन यांचं लढाऊ विमान हल्ल्यात नष्ट केलं होतं. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की दोन्ही देशात तणावाचं वातावरण होतं त्यामुळे विमानांच्या मोजणीची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे मोजणीसाठी काही आठवड्यांचा कालावधी लागला.

भारताने आमचं कोणतंही विमान पाडलं नाही, असा दावा पाकिस्तानने वारंवार केला आहे. पाकिस्तानची हीच भूमिका आहे आणि हेच सत्य आहे, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.

फॉरेन पॉलिसी नियतकालिकाचं म्हणणं आहे की असंही असू शकतं की विंग कमांडर अभिनंदन यांनी F-16 वर निशाणा साधला असेल आणि त्यांनी शस्त्र फायरदेखील केलं असेल. त्यामुळे त्यांना वाटू शकतं की त्यांनी ते विमान पाडलं पण पाकिस्तानमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी जे निरीक्षण केलं त्यामुळे भारताच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. असं वाटतं की भारतीय अधिकाऱ्यांनी त्या दिवशी आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल केली होती.

घटनेनंतर विमानांच परीक्षण करण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकन अधिकाऱ्यांना निमंत्रित केलं होतं. F-16 ही विमानं पाकिस्तानने अमेरिकेकडून विकत घेतली आहे. त्यांच्या देखभालीसाठी वेळोवेळी अमेरिकन अधिकारी पाकिस्तानमध्ये येत असतात. हे त्यांच्या करारातच लिहिलेलं आहे, अशी माहिती फॉरेन पॉलिसीने दिली.

असं असलं तरी F-16 च्या वापराबाबत नेमकी काय नियमावली आहे हे स्पष्ट नसल्याचं एका अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

भारताबरोबर झालेल्या चकमकीत F-16 चा वापर करण्यात आला होता असं फॉरेन पॉलिसीचं म्हणणं आहे. घटनास्थळावर हवेतून हवेत मारा करण्यात आलेल्या अमेरिकन शस्त्रास्त्रांचे अवशेष आढळले आहेत. ते अवशेष फक्त F-16मधून मारा केलेल्या शस्त्रांचे असू शकतात, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतात निवडणुकांचं वातावरण तापलं आहे आणि भारतीय विरोधी पक्ष या मुद्द्याचं राजकारण करू शकतं अशी शक्यता आहे.

या नव्या खुलाशामुळे भारताच्या मतदारांवर परिणाम होणार नाही, असं अमेरिकेतल्या एमआयटीचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक विपिन नारंग यांचं म्हणणं आहे.

एक एक गोष्टीचा उलगडा होत आहे आणि असं दिसत आहे की भारताने पाकिस्तानचं फार काही नुकसान केलं नाही. उलट भारतानेच आपलं एक विमान आणि हेलिकॉप्टर गमवलं. पाकिस्तानवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत जी पावलं उचलत आहे त्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो, असं नारंग यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)