युवराज सिंगची निवृत्ती: वर्ल्ड कप हिरो, 'कॅन्सर सर्व्हायवर' युवी क्रिकेटला निरोप देताना भावुक

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

2011 वर्ल्डकपचा हिरो असलेल्या युवराज सिंगने आज निवृत्ती जाहीर केली आहे.

"मी रिटायरमेंट घेण्याचा विचार करत होतो तेव्हा मी सचिनशीही बोललो होतो तेव्हा त्याने मला सांगितलं होतं तुला रिटायरमेंट कधी घ्यायची हे तू ठरव.. लोकांना ठरवू देऊ नकोस. तुला मनापासून थांबावस वाटेल तेव्हा थांब आणि आज तो दिवस आला," असं युवराज सिंगने सांगितलं.

युवराज सिंगचं आयुष्य हे एखाद्या रोलरकोस्टर राईडप्रमाणे होतं. त्याच्या कारकिर्दीवर टाकलेली एक नजर.

स्टायलिश डावखुरा बॅट्समन, भन्नाट फिल्डर, उपयुक्त बॉलर असं खऱ्या अर्थाने ऑलराऊंड पॅकेज खेळाडू म्हणजे युवराज सिंग. २०११ वर्ल्डकपचा हिरो असलेल्या युवराजला पुढच्याच वर्षी कॅन्सरने ग्रासलं. पण जात्याच लढवय्या असणाऱ्या युवीने कॅन्सरला परतावून लावलं. उपचारांमुळे युवी क्रिकेटमध्ये परतणार नाही अशी चर्चा होती मात्र त्याने जिद्दीने पुनरागमन करत अनोखा मापदंड प्रस्थापित केला.

IPL स्पर्धेत एकेकाळी आयकॉन प्लेयर आणि कॅप्टन असणाऱ्या युवराजला संघात घेण्यासाठी तयार नाही अशी यावर्षी परिस्थिती ओढवली. मुंबई इंडियन्सच्या रुपात त्याला मालक मिळाले मात्र चार सामन्यांनंतर युवराजला डच्चू देण्यात आला आहे. वर्ल्ड कपसाठी युवीचं नाव चर्चेत नव्हतं, पंजाब संघासाठी तो नियमितपणे खेळत नाही आणि आयपीएलमध्ये नगण्य झालेलं अस्तित्व अशी युवराज नावाच्या सुपरस्टारची स्थिती झाल्यानंतर अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

स्टुअर्ट ब्रॉडला 6 सिक्स

पहिल्यावहिल्या IPL हंगामावेळी युवराज हॉट प्रॉपर्टी होता. वर्षभरापूर्वीच झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर एका ओव्हरमध्ये सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा विक्रम केला होता. ट्वेन्टी-20 प्रकारासाठी अशी फटकेबाजी अगदीच अनुकूल होती. टीम इंडियाचा अविभाज्य घटक असलेल्या युवराजला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आयकॉन प्लेयरचा दर्जा दिला.

आयकॉन प्लेयरला अन्य खेळाडूंच्या तुलनेत 15 टक्के अतिरिक्त मानधन मिळतं. या व्यतिरिक्त युवराजने किंग्ज इलेव्हनचं नेतृत्वही केलं. युवराजच्या टीमने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. युवराजसाठी वैयक्तिक म्हणूनही हा सीझन चांगला ठरला. त्याने 15 मॅचेसमध्ये 23.00च्या सरासरीने 299 धावा केल्या. त्याचा 162.5 हा स्ट्राईक रेटही दमदार होता.

2009- रन्स वाढल्या, विकेट्सही काढल्या मात्र स्ट्राईक रेट कमी झाला

दुसऱ्या सीझनमध्येही किंग्ज इलेव्हन पंजाब प्रशासनाने युवराजच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. टीम इंडियासाठी सातत्याने धावा करणाऱ्या युवराजने IPLच्या दुसऱ्या हंगामात बॅट परजली. त्याने 14 मॅचेसमध्ये 28.33 सरासरीने 340 धावांची मजल मारली. युवराजच्या धावा वाढल्या मात्र त्याचा स्ट्राईक रेट कमी झाला. युवराजने गोलंदाजीतही चमक दाखवत 2 हॅट्रिकही घेतल्या. या हंगामात युवराजच्या संघाला बाद फेरी गाठता आली नाही.

2010- आयकॉन दर्जा आणि कर्णधारपद-दोन्हीही गेलं....

तिसऱ्या सीझनसाठी युवराजचा आयकॉन दर्जा काढून घेण्यात आला. याचा अर्थ त्याला करारानुसार ठरलेलं उत्पन्न मिळालं. आयकॉन खेळाडूला मिळणारे अतिरिक्त 15 टक्के मानधन त्याला मिळू शकलं नाही. याव्यतिरिक्त त्याच्याकडून कर्णधारपदही काढून घेण्यात आलं आणि कुमार संगकारा नवा कर्णधार झाला. निव्वळ फलंदाज म्हणून खेळणाऱ्या युवराजने बॅटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. 14 मॅचेसमध्ये युवराजने 21.25च्या सरासरीने 255 धावा केल्या. युवराजचा 128चा स्ट्राईक रेट प्रतिस्पर्धी संघांसाठी अडचणीचा होता. याही हंगामात युवराजने बॉलिंगमध्येही योगदान दिलं.

2011- झाला पुणेकर आणि दिला कडक परफॉर्मन्स

भविष्यात वाढून ठेवलेलं आजारपण त्रास देत असतानाच युवराजने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर दिमाखदार प्रदर्शन करत देशवासीयांचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं.

या स्पर्धेत त्याने 362 धावा, 15 विकेट, 4 मॅन ऑफ द मॅच सह प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारही पटकावला.

हाच भन्नाट फॉर्म युवराजने IPLमध्येही कायम राखला. किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजला ताफ्यात सामील केलं नाही. ही संधी हेरून पुणे वॉरियर्स संघाने युवराजला संघात घेतलं आणि त्याच्याकडे कर्णधारपदही सोपवलं. पंजाबकडून पुण्याकडे येताना युवराजच्या मानधनात 4 कोटींनी वाढ झाली. युवराजने 14 मॅचेसमध्ये 34.30च्या सरासरीने 343 धावांची चळत रचली. त्याने 9 विकेट्स घेत बॉलर म्हणून उपयुक्तता सिद्ध केली. मात्र युवराजचा फॉर्म पुण्याला प्ले ऑफ्स गाठून देऊ शकला नाही.

काळोखं पर्व आणि नवी आशा

पुणेकर शिलेदार होऊन युवराजने दमदार परफॉर्मन्स दिला मात्र काही महिन्यातच कॅन्सरने या लढवय्या क्रिकेटपटूला ग्रासलं. ट्यूमरची ही गाठ युवराजच्या क्रिकेट करिअर नव्हे तर आयुष्याला पोखरुन टाकणारी होती. अत्याधुनिक उपचारांसाठी युवराजने अमेरिका गाठलं. अवघड उपचार, खूप सारी औषधं, कडक पथ्यं या चक्रातून पार होऊन युवराजची सुटका झाली. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला त्याने दिलेला टक्कर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.

केवळ देशभरातून नव्हे तर जगभरातून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. शरीराने बेजार केलं असतानाही दुर्दम्य मानसिक कणखरतेच्या बळावर युवराजने कॅन्सरचा शरीराभोवतीचा विळखा दूर केला. आयुष्याचं कमबॅक महत्त्वाचं असल्यानं युवराज 2012 IPL खेळू शकला नाही. पुणे वॉरियर्स संघाने त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कला संघात समाविष्ट केलं. युवराजच्या अनुपस्थितीचा फटका पुणे संघाला बसला. पुण्याचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला.

2013- तो परतला, त्याने मनं जिंकली

टीम इंडियाचा पहिलावहिला स्वॅगस्टार युवराजला डोक्यावरच्या केसांविना पाहणं चाहत्यांसाठी धक्का देणारा अनुभव होता. औषधांचा मारा झालेलं शरीर आणि जीवनशैलीत झालेला बदल यामुळे युवराज पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतेल याची खात्री नव्हती.

मात्र हितचिंतकांचा पुरेपूर पाठिंबा, भक्कमपणे पाठिशी उभा असलेला मित्रपरिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचाट इच्छाशक्तीच्या बळावर युवराज पुन्हा क्रिकेट खेळू लागला. त्याने रन्स किती केल्या, विकेट्स किती काढल्या यापेक्षाही तो पुन्हा जिद्दीने उभा राहिला हे जगभरातल्या चाहत्यांसाठी महत्त्वाचं होतं. युवराजने याही हंगामात पुण्याचं प्रतिनिधित्व करताना 13 मॅचेसमध्ये 19.83च्या सरासरीने 238 धावा केल्या. त्याने 6 विकेट्स घेतल्या. मात्र पुणे वॉरियर्सची कामगिरी सुमारच राहिली.

2014- नवा संघ, नवी उमेद आणि कोटींची उड्डाणं

कॅन्सरने युवराजच्या खेळण्यावर कोणतीही मर्यादा आलेली नाही हे सिद्ध झाल्यामुळे या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने युवराजला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. त्यासाठी त्यांनी तब्बल 14 कोटी रुपये खर्च केले. युवराजच्या मानधनात सहा कोटींनी वाढ झाली. या सकारात्मक अप्रायझलमुळे मूठभर मांस चढलेल्या युवराजने 14 मॅचेसमध्ये 34.18 सरासरीसह 376 धावा केल्या. त्याने 5 विकेट्सही घेतल्या. मात्र नावात रॉयल्स असलेल्या बेंगळुरूची कामगिरी मात्र सर्वसाधारण झाली.

2015- गंगाजळीत शिखरावर मात्र परफॉर्मन्स घसरणीला

गेल्या वर्षीची कामगिरी लक्षात घेऊन दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने लिलावात तब्बल 16 कोटी रुपये खर्चून युवराजला ताफ्यात समाविष्ट केलं. विशेष म्हणजे त्या काळात युवराज भारतीय संघाचा भागही नव्हता. युवराजने स्वत:ची बेस प्राइज 2 कोटी एवढी निश्चित केली होती. त्या तुलनेत त्याला मिळालेला भाव थक्क करणारा होता. दिल्लीचे तख्त युवराजसाठी लाभदायी ठरले नाही कारण 13 मॅचेसमध्ये त्याला 19.07च्या सरासरीने 248 धावाच करता आल्या. गोलंदाजीतही त्याला कमाल दाखवता आली नाही. दिल्लीचा संघ नेहमीप्रमाणे गुणतालिकेत तळाच्या संघांमध्येच राहिला.

2016- पगार निम्म्यावर पण नावावर जेतेपद

टॉम मूडी या डावपेचात प्रवीण अशा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने युवराजसाठी 7 कोटी मोजले. आधीच्या हंगामातला त्याचा खेळ बघता पैशापेक्षा संधी मिळणं युवराजसाठी महत्त्वाचं होतं. खणखणीत सांघिक प्रदर्शनाच्या बळावर सनरायझर्सने जेतेपदाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये 8 वर्ष व्यतीत केल्यानंतर युवराजला जेतेपद नशिबी आले. 10 मॅचेसमध्ये युवराजने 26.22च्या सरासरीने आणि 131च्या स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या.

2017- पगार आणि परफॉर्मन्स स्थिरता

सनरायझर्स हैदराबादने वाढत्या वयाचा विचार न करता त्याच्या गुणकौशल्यांवर विश्वास ठेवला. युवराजने 12 मॅचेसमध्ये 28च्या संयमी सरासरीने 252 धावा केल्या. त्याचा स्ट्राईकरेटही चांगला होता. युवराजने या हंगामात फारशी गोलंदाजीही केली नाही. हैदराबादने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं. मात्र जेतेपद कायम राखता न आल्याने हैदराबादने संघात बदल करण्याचा निर्णय घेतला. यातूनच युवराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

2018- घरवापसी पण पगार अगदीच मामुली

आठ वर्षांनंतर युवराजची किंग्ज इलेव्हन पंजाब संघात घरवापसी झाली. एकेकाळी युवराज या संघाचा आयकॉन प्लेयर होता, कर्णधारही होता. मात्र आठ वर्षांनंतर युवराजची पूर्वीची रया राहिली नाही. अवघ्या 2 कोटीत पंजाबने युवराजला संघात घेतलं. मुख्य प्रवाहातील क्रिकेटपासून नाळ तुटलेल्या युवराजला 8 मॅचेसमध्ये खेळवण्यात आलं. 10च्या सरासरीने त्याला अवघ्या 65 धावा करता आल्या. जेतेपदापासून वंचित राहण्याची पंजाबची परंपरा या हंगामातही कायम राहिली. गुणतालिकेत पंजाब शेवटून दुसऱ्या स्थानी होता. लौकिकानुसार खेळ करता न आल्याने पंजाब प्रशासनाने युवराजला डच्चू दिला.

2019- हुश्श्..... मालक मिळाला

आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी 18 डिसेंबरला लिलाव झाला. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्याही संघाने युवराजला खरेदी करण्यात स्वारस्य दाखवलं नाही. चार वर्षांपूर्वी कोटीच्या कोटी भरारी घेणाऱ्या युवराजची अस्तित्वासाठी धडपड सुरू होती. लिलावाच्या अंतिम टप्प्यात अनसोल्ड खेळाडूंसाठी पुकार झाला. मुंबई इंडियन्सने बेस प्राईजलाच युवराजला विकत घेतलं. मुंबईसाठी हा सौदा अगदीच फायदेशीर ठरला. लौकिकाला साजेशी कामगिरी होत नसली तरी युवराज हा आजही लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नावावर असलेली आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

त्याचा अनुभव संघासाठी मोलाचा आहे. त्याला सूर गवसला तर मुंबई संघासाठी बोनसच. कारण युवराजसारखा वलयांकित खेळाडू अवघ्या एक कोटीत हाती लागल्याने मुंबई इंडियन्ससाठी हा किफायतशीर सौदा आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या चार सामन्यात त्याला खेळवलं मात्र त्यानंतर युवराज डगआऊटमध्ये बसून असतो. युवराजऐवजी इशान किशनला संधी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित दुखापतग्रस्त झाल्यावर पाच वर्ष राखीव खेळाडू म्हणून वावरणाऱ्या सिद्धेश लाडला संघात संधी देण्यात आली. मात्र युवराजचा संघनिवडीसाठी विचार झाला नाही.

''यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेली तयारी आयपीएलसाठीच्या सर्वोत्तम तयारी म्हणू शकतो. दोन ते तीन महिने मुंबईत मी सराव करतो आहे. डी.वाय. पाटील स्पर्धेतही खेळलो. फिट राहण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. बॅटच्या स्पीडमध्ये मी बदल केला आहे. खेळताना चपळता असावी यासाठी मेहनत घेतो आहे. अशी वेळ होती जेव्हा मला आयपीएलमध्ये चांगला पैसा मिळायचा. तेव्हा माझ्यावर दबाव असायचा. आता तेवढं दडपण नाही. यंदा मला मुंबईसाठी खेळण्याची संधी मिळते आहे याचा आनंद आहे'', असं युवराजने सांगितलं आहे.

2019मध्ये निवृत्ती

10 जून 2019मध्ये युवराजने आपली निवृत्ती घोषित केली. 40 कसोटी मालिका, 304 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने 58 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने इतका समृद्ध खेळलेल्या युवराजने आपली निवृत्ती घोषित केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)