You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019: प्रकाश जावडेकर बीबीसीच्या मुलाखतीदरम्यान का संतापले?
राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष टिकणारच नाही. लोकांना आता फक्त भाजपमध्ये आशा दिसत आहे, म्हणून भाजपमध्ये इतके नेते प्रवेश करत आहेत, असं केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
बीबीसी मराठीचे मयुरेश कोण्णूर यांच्याशी बोलताना जावडेकर यांनी भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांचं राजकारण, 'मैं भी चौकीदार' मोहीम आणि नेत्यांच्या पक्षांतराबद्दल बोलले. मात्र पुलवामा हल्ला आणि स्ट्राइक्सवरील काही प्रश्नांची उत्तरं देताना ते आपला संताप लपवू शकले नाहीत.
तुम्ही आपला प्रश्न एका विशिष्ट अजेंड्याने विचारत आहात, असा प्रतिहल्ला त्यांनी बीबीसी प्रतिनिधीवर बोलताना केला. अखेर त्यांनीच या मुलाखतीचा आवाका मर्यादित केला आणि 'शेवटचा प्रश्न' म्हणत संवादही थोडक्यात संपवला.
पाहा संपूर्ण मुलाखत
या मुलाखतीचा संपादित आणि संक्षिप्त भाग -
प्रश्न: आधी अडवाणी यांच्या गांधीनगरच्या मतदारसंघातून भाजप अध्यक्ष अमित शाह यांना तिकीट देण्यात आलं. नंतर मुरली मनोहर यांनीही आपल्या मतदारांना सांगितलं की ते यंदाची निवडणूक लढवणार नाहीयेत?
यात बाजूला सारण्याचा मुद्दा मुळीच नाही. साधारणतः आमच्या विचार परिवाराची अशी एक मान्यता आहे की वयाच्या 75 वर्षांनंतर राजकारणात काम करावं, पण निवडणुकीच्या राजकारणात काम करू नये. त्यामुळे कलराज मिश्र, नजमा हेपतुल्ला यांनीही हे ते स्वीकारलं आणि आपापले राजीनामे दिले.
हा एक पायंडा आहे, जो सर्वांनी स्वीकारला आहे.
त्यामुळे वाजपेयी-अडवाणींचा काळ मागे चालून नवा काळ येत आहे, असं म्हणता येईल का?
पक्ष हा एक प्रवाह असतो आणि प्रवाह नेहमी पुढे जात असतो. पक्षात नवे तरुण येत राहणं, नवीन नेतृत्व तयार होणं, यातून हा पक्ष आज इतका वाढला आहे. नाहीतर तुम्ही कम्युनिस्टांकडे पाहा - 70-70 वर्षांखाली कुणीच नाहीये त्यांच्याकडे.
टीकेच्या भाषेत बोलायचं झालं तर जुने जे-जे अडथळे होते, ते ते बाजूला निघतायत?
मला वाटतं तुम्ही एका अजेंड्याने प्रश्न विचारत आहात, म्हणून मी याला उत्तर देणार नाही. तुम्ही तुमची कमेंट करायला मोकळे आहात.
या निवडणुकीत मुद्दा आहे की देशाला सुरक्षित कोण बनवेल? देशाची प्रगती कोण करेल? आणि देशाचं समर्थ नेतृत्व कोण करेल? आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आहेत नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी.
मग जावडेकर यांनी 2008 साली मुंबई दहशतवादी हल्ल्यांनंतर UPA सरकारने दिलेल्या प्रतिक्रियेची तुलना मोदी सरकारच्या सर्जिकल स्ट्राईक्सबरोबर केली.
पुलवामाचा हल्ला आणि त्यानंतर बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक्सचा भाजप राजकीय वापर करतंय, अशी टीका होतेय?
मला हे पटत नाही. भारत माता की जय आम्ही पूर्वीही म्हणायचो, आताही म्हणतो. गेले 40 वर्षं जनसंघापासून आजपर्यंत आमच्या सर्व सभांमध्ये 'भारत माता की जय'चा नारा होतो. काँग्रेसला कुणी बंद केलंय?
पण काँग्रेसचं हे दुर्दैव आहे की त्यांनी न 'भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाल्लाह इन्शाल्लाह' म्हणणाऱ्यांची साथ दिली आणि 'भारत माता की जय' म्हणणं टाळलं. त्यांनी का नाही म्हटलं 'भारत माता की जय'? सेनेला सलाम करण्यात कुठलं आलं राजकारण?
राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवाद ही आमची ओळख आहे. काँग्रेसनी दुर्दैवाने त्यांची पहचान संकीर्ण ताकदींबरोबर जाण्यामध्ये केली. पण ते भारत माता की जय म्हणतच नाहीत.
बालाकोटच्या स्ट्राईकबद्दल भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी 250 अतिरेकी मारले गेले, असा दावा केला. पण कुठल्याही लष्करी अधिकाऱ्यांनी किंवा सरकारने असा दावा केला नाही.
वायुदलाने सांगितलं की 80 टक्के नुकसान झालं. ते काही दिवाळीचे फटाके पाठवले नव्हते. तिथे जे होते, तितके सगळे गेले.
पण त्याचे पुरावे देण्याची जबाबदारी सरकारवर नाही येत का?
काही चॅनल्सनी हे आकडे सांगितले. आपल्याकडे मीडियाला जाऊ देतात तिथे, पण पाकिस्तानने घटनास्थळी जाऊ दिलं नाही.
(यानंतर त्यांनी संवाद गरिबी आणि सरकारी योजनांकडे वळवला.)
या निवडणुकीतला सर्वांत मोठा मुद्दा आहे गरिबांसाठी. 'गरिबी हटाव'चा नारा 50-70 वर्षं काँग्रेसने दिला आणि गरिबी हटली नाही.
राष्ट्रीयीकरण होऊन 45 वर्षं झाली आणि 34 कोटी लोकांचे अकाऊंटच उघडली नव्हती. आम्ही 34 महिन्यात करून दाखवलं जे त्यांना 45 वर्षांत करता आलं नाही. त्यामुळे आता डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरमुळे लोकांपर्यंत 100 पैकी 100 रुपये पोहोचतात.
एवढं सर्व यश सरकारचं जर आहे तर मग काँग्रेसच्या 'चौकीदार चौर है' टीकेला प्रत्युत्तर म्हणून 'मैं भी चौकीदार' ही मोहीम का काढावी लागली?
काँग्रेसच्या नेत्यांनी स्वाभिमानानी कष्टाने काम करणाऱ्या लोकांना हिणवलं आहे. आधी त्यांनी मोदींना चहावाला म्हटलं, नंतर त्यांनी पकोडेवाल्याची टीका केली आणि आता चौकीदार म्हणून त्यांनी हल्ला केला.
काँग्रेसमध्ये जे मेहनत न करता दलालीवर जगतात, त्यांचीच चलती आहे. म्हणून काँग्रेस वेगळी आहे आणि भाजप वेगळी आहे. म्हणून आम्ही सर्वांनी म्हटलं की 'हो, मैं भी चौकीदार' आणि दोन तासांत दीड कोटी लोकांनी आपले बॅनर लावले (ट्विटर अकाउंटची नावं बदलली) 'मैं भी चौकीदार'. हे लोकशाही मार्गाने दिलेलं अतिशय प्रभावी उत्तर आहे, असं मला वाटतं."
महाराष्ट्रातले मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, त्याविषयी काय म्हणाल?
आता लोकांनाच भाजपमध्ये यायचं असेल तर त्यात आम्ही काय करावं? लोकांना आता फक्त एकच आशा दिसत आहे, ती म्हणजे भारतीय जनता पक्ष. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष टिकणारच नाही.
संपूर्ण मुलाखत इथेपाहा
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)