सुषमा स्वराज-पाकिस्तानी मंत्र्यात ट्विटरयुद्ध #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूयात:

1. सुषमा स्वराज-पाकिस्तानी मंत्र्यात ट्विटरयुद्ध

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून दोन अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण, सक्तीचं धर्मांतर आणि बालविवाहाच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ मंत्र्यामध्ये ट्विटरवर खडाजंगी उडाली. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

दोन हिंदू मुलींचं अपहरण, सक्तीच्या धर्मांतरणाबाबतचा तपशील याविषयी पाकिस्तानातील भारतीय राजदूतांकडून सुषमा स्वराज यांनी अहवाल मागवला. तसं त्यांनी ट्विटरवर जाहीर केलं. मात्र हे सगळं देशांतर्गत प्रकरण असल्याचं पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी यांनी प्रतिसाद देताना सांगितलं. फक्त अहवाल मागितला तर तुमची चिडचिड झाली यावरून तुमचा अपराधभाव दिसतो असं प्रत्युत्तर स्वराज यांनी दिलं. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश इम्रान खान यांनी दिले आहेत.

2. काँग्रेसने बदलला चंद्रपूरचा उमेदवार, सुरेश धानोरकरांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. हिंगोलीतून विद्यमान खासदार राजीव सातव यांच्याऐवजी सुभाष वानखेडे यांना पक्षाने मैदानात उतरवलं आहे. लोकमतने यासंदर्भात बातमी दिली आहे.

भंडारा-गोंदियामधून भाजपाने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीने माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम व मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाचे चित्र अस्पष्ट आहे.

3. पुलवामा हल्ल्यात व्हर्च्युअल सिमचा वापर

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या 'जैश-ए-महंमद'च्या आत्मघाती हल्लेखोराने 'व्हर्चुअल सिम' वापरल्याचे समोर आले असून या सिम कार्डची सविस्तर माहिती देण्याची विनंती भारत अमेरिकेला करणार आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. द हिंदूने ही बातमी दिली आहे.

केंद्रीय तपास पथक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळावर; तसेच इतर ठिकाणी केलेल्या तपासात ही बाब समोर आली आहे. 'जैश'च्या सीमेपलीकडील दहशतवाद्यांशी आत्मघाती हल्लेखोर आदिल दार हा सातत्याने संपर्कात होता. हल्ल्याचा सूत्रधार मुदासिर खान याचा त्रालमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे.

4. 56 इंच छातीवाले कुलभूषण जाधवांना का सोडवून आणत नाहीत?-शरद पवार

सातारा जिल्ह्यातील कराडमधून काल महाआघाडीने प्रचाराची सुरुवात केली. 56 इंचाची छाती असलेले मोदी कुलभूषण जाधवांना का सोडून आणू शकले नाहीत असा शरद पवार यांनी केल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवर शरद पवारांनी टीका केली. सत्तेत असताना आम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यावेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही अशी टीकाही पवारांनी केली.

5. जे.जे. रुग्णालयात ड्रेसकोड

सर जे.जे. रुग्णालयात होळीदरम्यान विद्यार्थ्यांनी तोकडे कपडे घालून ते फाडल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे वैद्यकीय कॉलेजच्या परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तोकडे कपडे घालू नयेत, असे निर्देश रुग्णालय प्रशासनाने जारी केले आहेत. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी या निर्णयास विरोध दर्शवला आहे. मात्र, त्याबाबत लगेच कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यासंदर्भातील भूमिका अधिष्ठात्यांकडे मांडण्यात येईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान तोकडे कपडे घालू नयेत, मुलींनी दहा वाजता वसतीगृहात परत यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)