प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री; गोव्याला प्रथमच 2 उपमुख्यमंत्री

प्रमोद सावंत यांचा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. रात्री उशिरा 1 वाजून 45 मिनिटांनी हा शपथविधी झाला. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यांच्यासह मनोहर आजगावकर, रोहन खवंटे, विनोद पायलेकर, गोविंद गावडे, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे आणि मिलिंद नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्र्यांसह एकूण 12 जणांनी शपथ घेतली. त्यात भाजपचे 5, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे 2, गोवा फॉरवर्ड पक्षाचे 3 आणि अपक्षांचे 2 मंत्री यांचा समावेश आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी घटक पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय झाला, अशी माहिती बीबीसी मराठीच्या स्वाती पाटील राजगोळकर यांनी दिली.

रविवार आणि संपूर्ण दिवस या घडामोडी सुरू होत्या. महत्त्वाची खाती आणि दोन उपमुख्यमंत्रिपदं सहयोगी पक्षांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकला.

गोवा विधानसभेत आता भारतीय जनता पक्षाचे आता 12 आमदार आहेत. 2017 साली भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 3, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या 3 आणि 3 अपक्षांच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केलं होतं. तर 14 आमदार असूनही काँग्रेसच्या वाट्याला विरोधी पक्षाची भूमिका आली. राष्ट्रवादी काँग्रेसचाही एक आमदार विधानसभेत आहे. गोवा विधानसभेत 4 जागा रिक्त आहेत.

राजकीय वर्तुळात भाजप नेते प्रमोद सावंत यांचं नाव सर्वांत जास्त चर्चिलं गेल. पर्रिकरांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पणजीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजप नेते दाखल झाले होते.

मगोपचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोघा आमदारांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार झाला, त्यानंतर चर्चा पुढं जाऊ शकल्या.

शनिवारी संध्याकाळी काँग्रेसचे गटनेते चंद्रकांत कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर रविवारी पर्रिकर यांच्या निधनानंतरही काँग्रेसने दुसऱ्यांदा सत्तास्थापनेचा दावा केला.

कोण आहेत प्रमोद सावंत?

प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला. त्यांनी शिवाजी विद्यापीठामधून बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसीन, सर्जरीची पदवी संपादन केली आहे. त्यांनी मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवीसुद्धा मिळवली आहे.

सावंत हे साई लाइफ केअर नावाची संस्था चालवतात. तसंच सेंट्रल काउन्सिल फॉर इंडियन मेडिसीनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत.

2012 साली प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातून निवडून येत गोवा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ते पुन्हा एकदा विजयी झाले. सध्याच्या विधानसभेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)