लोकसभा 2019 : राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर.. मावळमधून पार्थ पवार, नाशिकमधून समीर भुजबळ आखाड्यात

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आधीपासून चर्चा सुरू असल्याप्रमाणे पार्थ पवार यांना मावळमधून तिकीट देण्यात आले आहे. त्याबरोबरच समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

आज जाहीर झालेल्या यादीमध्ये मावळ आणि नाशिकसह दिंडोरी, शिरुर आणि बीड मतदारसंघांसाठी उमेदवारही घोषित करण्यात आले.

दिंडोरीमधून धनराज हरिभाऊ महाले, शिरुरमधून शिवसेनेतून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले डॉ. अमोल कोल्हे आणि बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

बीडमध्ये काय होणार?

बीड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे प्रमुख आव्हान असेल. 2009 आणि 2014 साली लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा विजय झाला होता. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांचा विजय झाला होता. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांना 6 लाख 35 हजार 995 मते मिळाली होती तर पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना 9 लाख 16 हजार 923 मते मिळाली होती.

बजरंग सोनवणे कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये उमेदवारी दिलेले बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. सोनवणे आणि त्यांची पत्नी जिल्हापरिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हयाच्या राजकारणात त्यांचे सर्वत्र नाव आहे. अशी माहिती स्थानिक पत्रकार संजय मालानी यांनी बीबीसी मराठीला दिली.

मालानी म्हणाले, सोनवणे यांना पक्षांतर्गत विरोधक नाहीत. लोकसभेसाठी ते नवखे असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते नवखे नाहीत. येडेश्वरी हा साखर कारखाना ते चालवतात. या कारखान्यामुळे केज आणि परळी दोन तालुक्यांवर त्यांचा प्रभाव आहे. प्रस्थापित नेत्यांविरोधात लोकांमध्ये असंतोष असत. सोनवणे यांचा चेहरा त्या अर्थाने प्रस्थापित नाही. ही निवडणूक अटीतटीची होईल असं वाटतं."

पार्थ पवारांच्या उमेदवारीमुळे पवार कुटुंबात संघर्ष

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाल्यावर शरद पवार यांना रोहित राजेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.

"साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदराच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाचं हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा," असं रोहित यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.

त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवार कुटुंबीयांतल्या राजकीय सत्तासंघर्षाला सुरुवात झाली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल बीबीसी मराठीनं विविध तज्ज्ञांची मतं जाणून घेतली.

'पवारांच्या घरात राजकीय सत्तासंघर्ष सुरू'

विजय चोरमारे यांच्या मते, "आतापर्यंत राजकीय घराण्यांचा गृहकलह आपण वेळोवेळी समोर आलेला पाहिला आहे. ठाकरे, मुंडे, साताऱ्याच्या राजघराण्यातील सत्तासंघर्ष बघितला. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर पवारांच्या कुटुंबात एक वेगळेपणा जाणवत होता. म्हणजे या कुटुंबात राजकीय सत्तासंघर्षासाठी कुणी वेगळा काही प्रयत्न करणार नाही, असं वाटत होतं. पण यानिमित्तानं पहिल्यांदाच पवारांच्या घरात गृहकलह सुरू होणार आहे."

"अजित पवार आतापर्यंत प्रत्येक गोष्ट आज्ञाधारपणे ऐकत आले. म्हणजे जसं ठेवलं तसं राहिले. पण अजित पवारांच्या मुलाच्या इच्छेपुढे शेवटी शरद पवारांना माघार घ्यावी लागली, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी," ते पुढे सांगतात.

पार्थ पवारांच्या उमेदवारीला कौटुंबिक पदर असल्याचं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात.

त्या सांगतात, "पार्थ पवारांच्या उमेदवारीला कौटुंबिक पदर नक्कीच आहे. अजित पवारांना आता मुलाला पुढे करायचं आहे. त्यामुळे त्याची एन्ट्री शरद पवारांच्याच उपस्थितीत झालं पाहिजे, असं घरातलं प्रेशर असावं, असं मला वाटतं. कारण पार्थ महत्त्वाकांक्षी आहे. त्यालाही राजकारणात स्वत:ला सिद्ध करायचं आहे. त्यामुळे त्यानं तो हट्ट धरलेला दिसतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून त्यानं कार्यकर्त्यांबरोबर संपर्क ठेवलेला आहे."

"पवारांनी घरातल्या प्रेशरमुळेसुद्धा पार्थला पुढे केलेलं दिसंतय. कारण शरद पवारांनीच आधी पार्थला उमेदवारी नाकारली होती. पण शेवटी शरद पवारांना माढ्याची जागा सोडून पार्थला उमेदवारी द्यावी लागली, यातच सगळं आलं ना. म्हणजे घरातून त्यांना किती प्रेशर आहे," त्या पुढे सांगतात.

"याशिवाय अजित दादांचे जे निकटवर्तीय आहेत म्हणजे सुनील तटकरे वगैरे यांनी पार्थची बाजू लावून धरलेली आहे. हा सुद्धा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की, तटकरे वगैरे कंपनीला म्हणजे स्वत: अजित दादांनाच पार्थला पुढे करायचं आहे," राही भिडे सांगतात.

रोहित आणि पार्थ यांच्यात स्पर्धा?

स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, "पवारांच्या कुटुंबातील तरुण पिढीत राजकीय आकांक्षा वाढल्या आहेत. आणि त्याला कौटुंबिक पदरही आहेत. त्यामुळेच पार्थनं राजकारणात येऊ नये असं अजित पवारांनी म्हटल्यानंतरही आणि शरद पवारांनी आमच्या कुटुंबातून नवीन कुणी लोकसभा लढणार नाही, असं जाहीर केल्यानंतरही पार्थचं नाव पुढे आलं."

तर मग हा रोहित आणि पार्थ यांच्यातील राजकीय स्पर्धेचा भाग आहे का?

तर या प्रश्नाचं उत्तर स्थानिक पत्रकार 'नाही' असं देतात. ते म्हणतात की, "पवार कुटुंबाचं बाँडिंग चांगलं आहे. आणि पवारांच्या शब्दाबाहेर कुणी जात नाही. त्यामुळे जागा जिंकून येण्याची शक्यता असल्यानेच पवारांनी ही खेळी केली असावी. त्यामुळेच एका कुटुंबातील किती उमेदवार राजकारणात असणार? लोकांमध्ये त्याचं काय इम्प्रेशन जाईल याचा विचार करूनच पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)