प्रियंका गांधी राहुल यांच्यासाठी राजकारणाच्या केंद्रस्थानी येणं टाळत आहेत का?

फोटो स्रोत, @INCINDIA
- Author, अदिती फडणीस
- Role, बीबीसी हिंदीसाठी
2003 चं वर्ष होतं. अटलबिहारी वाजपेयी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार करत होते.
भाजपनं ही तीनही राज्यं जिंकली होती. राजस्थानच्या वाळवंटात जेव्हा त्यांनी सभा घेतली तेव्हा वातावरण बदललं होतं.
त्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन भाषणाला सुरूवात करताना म्हटलं की, "मौसम बदल रहा है" लोकांना वाजपेयींना काय म्हणायचंय हे कळायला वेळ लागला नाही. आणि त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि हास्याचे फवारे उडाले.
अहमदाबादमध्ये मंगळवारी जेव्हा 12 मार्चला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली तेव्हा वातावरण तसंच होतं. काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर पहिलं भाषण केलं.
त्या केवळ पाच ते सहा मिनिटं बोलल्या. त्यांनी राहुल गांधींप्रमाणे ना रफाल व्यवहारावर टीका केली, ना मोठ्या उद्योगपतींना दिलेल्या सवलतींवर काही बोलल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्यांनी केवळ गेल्या पाच वर्षात सरकारनं जी आश्वासनं दिली होती आणि जी अपूर्ण राहिली त्याची आठवण करून दिली. आणि हे सगळं करताना त्यांनी एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं नाही.
त्या लोकांना इतकंच म्हणाल्या की, विचार करा आणि निर्णय घ्या. जे लोक तुमच्यासमोर मोठमोठ्या घोषणा करतात, बाता मारतात त्यांना विचारा की तुम्ही वर्षाला 2 कोटी रोजगारांचं आश्वासनं दिलं होतं त्याचं काय झालं? प्रत्येक बँक खात्यात 15 लाख रूपये टाकले जाणार होते त्याचं काय झालं? महिला सुरक्षेचं काय झालं?
त्यांनी काँग्रेसनं दिलेल्या किमान उत्पन्नाच्या आश्वासनाचीही आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की या योजनेचं नाव 'न्याय' असायला हवं. अर्थात हिंदीमध्ये त्याचा उल्लेख 'न्यूनतम आय योजना' असा होतो.

फोटो स्रोत, @RAHULGANDHI
प्रियंका गांधी यांच्या भाषणातून काही महत्त्वाचा संदेश मिळू शकतो.
प्रियंका गांधी यांनी आपले पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून सुरू असलेल्या चौकशीवर काहीही भाष्य केलं नाही. रॉबर्ट वाड्रांनी हे अनेकदा स्पष्ट केलंय की लोकांचा आग्रह असेल तर ते नक्कीच राजकारणात स्वत:ला आजमावून बघतील.
मात्र रॉबर्ट वाड्रा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेसला केवळ काँग्रेस आणि काँग्रेसींना केवळ गांधी परिवारच नाही तर त्यांच्या नातेवाईकांच्या बचावाचीही चिंता आहे.
जे लोक बैठकीत उपस्थित होते त्यांना असं वाटत होतं की प्रियंका गांधी स्वत:ला मर्यादीत करतायत. कारण त्या राहुल गांधींची संधी हिरावू इच्छित नाहीत.
त्यांनी खूपच मर्यादीत आणि संयमितपणे आपलं म्हणणं मांडलं. ना कुठला ड्रामा केला ना कुठला दिखावा. हे सगळं अगदी ठरवून झालं.
याआधी प्रियंका गांधी आपल्या समर्थकांसमोर आणि हितचिंतकांसमोर बोलताना अनेकदा म्हणाल्या की त्यांना राजकारणात यायचं नाहीए. कारण काँग्रेसी नेते त्यांचं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करतील. भावाला बहिणीविरोधात आणि पत्नीला पतीविरोधात उभं करून संघर्ष तयार करतील.

फोटो स्रोत, Getty Images
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग अशा दोन ज्येष्ठांची उपस्थिती असतानाही यूपीएच्या अंतिम काळात त्याची झलक बघायला मिळाली.
पंतप्रधान असताना मनमोहन सिंग अनेकदा बिचारेपणाचा अनुभव घ्यावा लागला. कारण पंतप्रधान कार्यालयात आलेल्या अनेकांनी आपलं काम करून घेण्यासाठी "मॅडमशी बोलणं झालंय" असं म्हणत दबाव आणला.
राजकारण पोकळी सहन करू शकत नाही. आणि राजकारणात दोन सत्ताकेंद्रंही पचत नाहीत. अहमदाबादच्या भाषणात प्रियंकानी एक गोष्ट स्पष्ट केलीय की आतापासूनच त्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहू इच्छित नाहीत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काँग्रेसच्या जाहिरनामा समितीचे अध्यक्ष पी.चिदंबरम् आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणावरून दिसतंय की काँग्रेसच्या निवडणुकीची रणनीती आता स्पष्ट झालेली आहे.
रफालच्या मुद्द्यावर फक्त राहुल गांधींनी भाष्य केलं. इतर वक्त्यांनी नोकऱ्यांची कमतरता, बंद पडलेले उद्योग, नोटाबंदीचा दुष्परिणाम, शेतीच्या समस्या अशा मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केलं.
काँग्रेस जनतेच्य मदतीनं आपला जाहीरनामा बनवत आहे. चिदंबरम् यांनी म्हटलंय की अनेक लोकांचा सल्ला घेण्यात आलाय. आणि त्याला जाहीरनाम्यात जागाही दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र एकाच परिवारातले इतके लोक काँग्रेसमध्ये नेतृत्व का करतायत त्यावर पक्षानं ना कुठलं स्पष्टीकरण दिलंय ना खेद व्यक्त केला आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की कमी उत्पन्न असलेले लोकच प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहेत.
विशेष म्हणजे लोकांशी संवाद साधताना प्रियंका गांधी यांनी कुठेही निवडणूक लढण्याचे संकेत दिले नाहीत. काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आधीच जाहीर झाली आहे. ज्यात अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीतून सोनिया गांधी निवडणूक लढत आहेत. मात्र पुढे जाऊन प्रियंकांसाठी सोनिया रायबरेलीची जागा देऊ शकतात.
ही आता सुरूवात आहे. जसजसा प्रचार तापेल तसं प्रियंका गांधींचा नेमकं चरित्र समोर येईल. मात्र यामुळे काँग्रेसला काही फायदा होईल का? हे सांगणं कठीण आहे. पण गांधी कुटुंबातील सर्वात तरूण सदस्यानं आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम चांगला होवो किंवा वाईट पण त्या आता राजकीय पटलावर टिकून राहतील हे निश्चित.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








