लोकसभा निवडणूक 2019 : नरेंद्र मोदी यांनी सत्ता परिवर्तनाचा गंध रोखण्यासाठी काय काय केलं? - दृष्टिकोन

गेल्या पाच वर्षांत हजार संकटं पेलूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना गोंधळात टाकण्यात कसं यश मिळवलंय?

फोटो स्रोत, PIB India

फोटो कॅप्शन, गेल्या पाच वर्षांत हजार संकटं पेलूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना गोंधळात टाकण्यात कसं यश मिळवलंय?
    • Author, राजेश जोशी
    • Role, संपादक, बीबीसी हिंदी रेडिओ

सत्ता परिवर्तनाचा एक खास गंध असतो. हा राजकीय गंध अनेक महिने आधीपासून हवेत मिसळायला लागतो. गल्ल्यांमधील कोपऱ्यांवर, चहाची दुकानं, पानाच्या टपऱ्या, रस्त्यावरील बसथांबे, असं कुठंही थांबल्यावर तुम्हाला परिवर्तन होणार, हे समजतं. आणि काही काळानंतर भलेभले शक्तिशाली सत्ताधीश पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं कोसळताना दिसतात.

जे लोक 1976 साली भानावर आले होते, ते हा बेधुंद करणारा गंध विसरले नसतील. देशाला 19 महिन्यांच्या आणीबाणीमध्ये ढकलणाऱ्या इंदिरा गांधी यांना लोकांनी सत्तेतून बाहेर जायला भाग पाडलं होतं.

पण जे 1976 साली जे भानावर आले नव्हते, त्यांनी 1987-88मध्ये या बदलाच्या हवेचा आनंद नक्कीच घेतला असेल. वयाच्या 42व्या वर्षी 400 पेक्षा जास्त जागा जिंकून राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. मात्र 1989 साली ते असे घसरले की काँग्रेस पक्ष आजवर स्वतःच्या पायावर उभा राहू शकलेला नाही.

जे लोक 1989 मध्ये लहान होते किंवा ज्यांच्या तेव्हा जन्म झाला नव्हता, त्यांना सत्ता परिवर्तनाचा गंध 2013 पासून पुन्हा वाहायला लागल्याचं माहिती असेल. दूरदूरपर्यंत मोदींशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. काँग्रेसनं आपल्या बोटीला पडलेलं एक छिद्र बुजवायचा प्रयत्न करेपर्यंत बोटीला दुसरं छिद्र पडलेलं असायचं.

मतदार

फोटो स्रोत, Getty Images

पण इतकी वर्षं विरोधी पक्षात काढल्यावरही काँग्रेस अजूनही ही छिद्रंच बुजवताना का दिसत आहे? नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकारणामुळे आपलं अस्तित्व धोक्यात आल्याचं विरोधी पक्षांच्या लक्षात येऊनही रफालच्या मुद्द्यावर राहुल गांधी इतके एकटे पडलेले का दिसतात?

कधी 'दाल में कुछ काला है' असं ममता बॅनर्जी म्हणतात तर कधी सीताराम येचुरी संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी करतात. पण तेवढ्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता चौकशीची गरज नाही, असं अखिलेश यादव सांगून टाकतात.

राजकारणाच्या जंगलात राहुल गांधी एकटेच जोरजोरात 'चौकीदार चोर है' असं ओरडत आहेत आणि त्यांच्या सुरात कुणीही सूर मिसळक नसल्याने त्यांचाच प्रतिध्वनी त्यांनाच ऐकू येतोय. असं का होत आहे?

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या मायावती आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव मतभेद विसरून एकत्र आले आहेत. कधी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, शरद यादव, लालू यादव यांची मुलं, विरोधीपक्षातील दुसरे नेते एकमेकांचे हात उंचावताना दिसून येतात.

परंतु 1987-88 साली राजीव गांधी यांच्याविरोधात रान उठवून देणाऱ्या विद्यार्थी-तरुणांच्या त्या टोळ्या, लोकांच्या संघटना, लहान-लहान ट्रेड युनियन आता कुठे आहेत?

मतदार

फोटो स्रोत, Getty Images

टीव्ही पाहिला तर 2013चं दृश्य पुन्हा दिसत असल्याचं लक्षात येतं. प्रत्येक स्क्रीनवर नरेंद्र मोदी यांचं भाषण चालू असतं किंवा त्यांचे सेनापती अमित शाह टीव्हीवर दिसतात... तेही दररोज. एखाद्या टीव्ही वाहिनीनं राहुल गांधी यांना दाखवलं तरी सर्व कार्यक्रम एखाद्या संथगतीने चाललेल्या बातम्यांच्या कार्यक्रमात रूपांतरित होतात.

सक्रीय राजकारणात आल्याआल्या प्रियंका गांधी लगेचच अदृश्य झाल्या आहेत. काँग्रेसच्या संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशचा कार्यभार सोपवण्यात आला आहे, हे लोक विसरून जावेत इतक्या त्या नाहीशा झाल्या आहेत.

2019च्या मार्च महिन्यात परिवर्तनाऐवजी दारूगोळ्याचा वास येऊ लागला आहे. आताच काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भरपूर प्रयत्न करूनही राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव झाला. तेव्हा नरेंद्र मोदी यांचा अस्त सुरू झालाय, मतदारांना दाखवण्यासाठी त्यांच्याकडे कोणतंही स्वप्न शिल्लक राहिलं नाही, असं वाटू लागलं होतं.

जवळपास हताश झालेल्या संघ परिवाराच्या रणनीती ठरवणाऱ्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर हिंदूंना एकजूट करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण या मुद्द्यावर लोकांनी दिलेल्या जांभया स्पष्ट ऐकू आल्या. तसंच सर्वोच्च न्यायालयाचा कलही मदतीस येत नव्हता.

मतदार

फोटो स्रोत, AFP

अमित शाह यामुळे बेचैन झाले. घाबरून ते सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू लागले. विश्व हिंदू परिषदही आपल्या साधू-साध्वींसह आंदोलनासाठी तयार झाली. पण भाजपला निवडणुकीच्या आधीच का राम मंदिर आठवतं, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. अखेर संघ परिवाराला तो मुद्दा मागे घ्यावा लागला.

देशाच्या विचारांचा कल बदलल्याशिवाय परिवर्तनाचा गंध रोखता येणार नाही, हे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नागपूरच्या संघ मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात, ते सर्व घटक यानंतरच्या घडामोडींमध्ये समाविष्ट होते.

पुलवामामध्ये भारतीय सुरक्षा दलांवर आत्मघातकी हल्ला झाल्याने संपूर्ण देश हादरून गेला. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असं म्हणत सत्तेत आलेले नरेंद्र मोदी अशा वेळेस शांत कसे बसू शकतात?

आता पडद्यावर हिरोची एन्ट्री होईल आणि व्हीलनला पळण्यासाठी जागा मिळणार नाही असं पाहाण्याच्या आशेनं सगळा देश श्वास रोखून बसला होता.

अखेर हिरोची पडद्यावर एन्ट्री झाली. त्यानं व्हीलनला एक जोरदार ठोसा मारला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. आश्चर्यानं आ वासलेले लोक आनंदानं नाचू लागले. पूर्ण हॉल टाळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणून सोडला.

आणि "मार त्याला!" असा हॉलच्या कोपऱ्यातून आवाज आला. मार खाणाऱ्या व्हिलनला "बघ, आता तुझा बाप आलाय..!!" असं सुनावणारा आवाज आला.

सगळा सिनेमा एका जबरदस्त वळणावर आला होता. बातम्या देणारे बहुतांश निवदेक मोदींचे चीअरलिडर्स झाले होते. पहिल्यांदा भारतीय वायुदलाने बालाकोटमध्ये 300 ते 400 दहशतवादी ठार मारले, असं टीव्हीवर सांगण्यात आलं. नंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बालाकोटमध्ये 250 दहशतवादी मारल्याचं सांगितलं. पुरावे मागताना "राहुल गांधी यांना लाज वाटायला हवी," असंही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

नोटाबंदी, GST, वाढती बेकारी, शेतकऱ्यांची दयनीय स्थिती, संस्थांचं भगवीकरण आणि रफाल खरेदीत घोटाळ्याचा आरोप, सोशल मीडियावर तुटून पडणाऱ्या राष्ट्रवादाने सर्वांना प्रभावहीन करून टाकलं आहे.

पहिल्यांदा मत देणारे तरुण असोत किंवा ज्यांनी राजीव गांधी यांना सत्ताशिखरावरून घसरताना पाहिलं आहे, अशा लोकांसाठी हे अचानक आलेलं वळण एकदम नवीन आहे. राजीव गांधी मिस्टर क्लीन म्हणवले जायचे, परंतु बोफोर्स घोटाळ्यानं त्यांच्यावर असा डाग लावला की त्यांना सत्तेतून बाहेर काढूनच तो गेला.

तोफा खरेदीमध्ये दलालीचा आरोप होताच राजीव गांधी यांच्या विरोधात तात्काळ 'राष्ट्रीय संघर्ष मोर्चा'ची स्थापना झाली. दिल्लीमध्ये झालेल्या त्याच्या स्थापना संमेलनात एका बाजूला नक्षलवादी आंदोलनातील लोक होते तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे के. एन. गोविंदाचार्यांसारखे नेते होते. मध्ये समाजवाद, लोहियावादी, गांधीवादी, काँग्रेसविरोधी असे सगळ्या रंगाचे लोक एकत्र आले होते.

काही दिवसांमध्येच 'गली गली मे शोर है, राजीव गांधी चोर है' अशा घोषणा पाटण्यापासून पतियाळापर्यंत देण्यात येऊ लागल्या. राजीव गांधी यांच्या कॅबिनेटमधून बाहेर पडलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी आंदोलनाची धुरा हाती घेतली आणि उजव्या-डाव्यांना एकत्र आणलं.

मतदान यंत्र

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या पाच वर्षांमध्ये 'अच्छे दिन'चं स्वप्न दाखवणारे, बेरोजगारी आटोक्यात न आणणारे, अर्थव्यवस्थेत प्रगती न करणारे (उलट नोटाबंदीसरख्या तुघलकी निर्णयानं कारखाने बंद पडल्या, नोकऱ्या गेल्या, शेतकरी अडचणीत सापडले), शेवटी रफाल विमानांच्या खरेदीमध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याचा आरोप झालेले नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्या समोर आहेत.

2013च्या तुलनेमध्ये नरेंद्र मोदी यांची उंची कमी झाली आहे, हे स्पष्ट आहे. तेव्हा त्यांची पारख झाली नव्हती. या पाच वर्षांमध्ये लोकांनी मोदी यांचं वागणं, त्यांचा चेहरा, चरित्र ओळखलं आहे.

असं सगळं असूनही नरेंद्र मोदी यांनी देशाचा राजकीय कथासूत्र विरोधी पक्षांच्या हातामध्ये जाऊ दिलेलं नाही. आज ते आपल्या भात्यातून एकेक ब्रह्मास्त्र काढून वापरत आहेत आणि विरोधी पक्ष गोंधळून गेला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)