मसूद अझहरच्या सुटकेमध्ये अजित डोभालांची नेमकी काय भूमिका होती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या मसूद अझहरला देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल स्वत: कंदाहारला सोडण्यासाठी गेले होते, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
सोमवारी दिल्लीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले की, "पुलवामात बसमध्ये कुणी स्फोट घडवून आणला? अर्थात जैश ए मोहम्मदचा मसूद अझहर. तुम्हाला आठवत असेल की 56 इंचाची छाती असणाऱ्यांच्या आधीच्या सरकारच्या काळात आज जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते अजित डोभाल स्वत: विमानात मसूद अझहरच्या शेजारी बसून त्याला कंदाहारला सोडून आले होते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ते पुढे म्हणाले, "पुलवामात जो स्फोट झाला तो नक्कीच पाकिस्तान आणि जैश ए मोहम्मदच्या लोकांनी घडवून आणला. मात्र मसूद अझहरला भाजपनं तुरूंगातून सोडून दिलं. भारताचे दोन पंतप्रधान शहीद झाले. आम्ही कुणालाही घाबरत नाही."
मात्र राहुल गांधींच्या या भाषणाला फक्त एकच भाग ज्यात राहुल 'मसूद अझहरजी' म्हणतायत तोच सोशल मीडियालर व्हायरल झाला. ॉ
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हा व्हायरल व्हीडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिलाय. मात्र दुसरीकडे रविशंकर प्रसाद यांचाही एक व्हीडिओ व्हायरल होतोय, ज्यात प्रसाद 'सईद हाफीजजी' असा उल्लेख करताना दिसतायत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मात्र ज्यांनी यू-ट्यूबवर राहुल गांधी यांचं पूर्ण भाषण ऐकलं आहे, त्यांना मात्र 'मसूद अझहरच्या सुटकेत आणि त्याला कंदाहारला पोहोचवण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची काय भूमिका होती' याची उत्सुकता आहे.
मात्र आमच्या पडताळणीत असं लक्षात आलं की 'अजित डोभाल विमानात मसूद अझहरच्या शेजारी बसून दिल्लीहून कंदाहारला गेले होते' हे खरं नाहीए.
उलट अजित डोभाल आधीपासूनच कंदाहारमध्ये उपस्थित होते आणि प्रवाशांची सुटका करण्यासाठी तालिबानशी सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होते.
मसूद अझहरच्या कंदाहारला पोहोचण्याची कहाणी
पोर्तुगालच्या पासपोर्टसह भारतात घुसलेल्या मसूद अझहरला अटक झाली. त्यानंतर 10 महिन्यांनी कट्टरवाद्यांनी दिल्लीतून काही परदेशी लोकांचं अपहरण केलं. त्यांच्या बदल्यात मसूद अझहरच्या सुटकेची मागणी केली.
मात्र उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे सहारनपूरमधून त्यांची सुटका केली. त्यामुळे ही मोहीम असफल ठरली.
एका वर्षानंतर हरकत-उल-अंसारनं पुन्हा काही विदेशी लोकांचं अपहरण केलं आणि मसूद अझहरच्या सुटकेची मागणी केली. मात्र हा प्रयत्नही सफल झाला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर 1999मध्ये जम्मूच्या कोट भलवाल तुरूंगात मसूद अझहरच्य सुटकेसाठी बोगदा खोदण्यात आला. मात्र कट्टरवाद्यांचा हा प्रयत्नही फसला.
काही महिन्यानंतर डिसेंबर 1999 मध्ये कट्टरवाद्यांनी एका भारतीय विमानाचं (इंडियन एअरलाइन्सचं IC-814 ) अपहरण केलं. आणि ते कंदाहारला घेऊन गेले. या विमानातील प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात भारतानं मसूद अझहरसह तीन कट्टरवाद्यांना सोडण्याची तयारी दाखवली.
त्यावेळी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे प्रमुख असलेल्या अमरजित सिंह दुलत यांनी बीबीसी प्रतिनिधी रेहान फजल यांना सांगितलं की, "जरगरला श्रीनगरच्या तुरूंगातून आणि मसूद अझहरला कोट भलवालच्या तुरूंगातून श्रीनगरमध्ये एकत्र आणण्यात आलं. दोघांना रॉने एका छोट्या गल्फस्ट्रीम विमानात बसवलं होतं."
"दोघांच्याही डोळ्यांना पट्टी बांधण्यात आली होती. मी विमानात येण्याआधी या दोघांना विमानाच्या मागच्या बाजूच्या भागात बसवण्यात आलं. मध्ये एक मोठा पडदा होता. पडद्याच्या या बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला जरगर आणि मसूद अझहर"
त्यांनी सांगितलं की "टेक ऑफच्या काही सेकंद आधीच लवकरात लवकर दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना आल्या होत्या. कारण विमानतळावर परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग कंदाहारला जाण्यासाठी आमची वाट पाहात होते."
दुलत सांगतात की,"दिल्लीत उतरल्या उतरल्या या दोन कट्टरवाद्यांना जसवंत सिंग यांच्या विमानात बसवण्यात आलं. जिथं तिसरा कट्टरवादी ओमर शेख पहिल्यापासून उपस्थित होता. आमचं काम फक्त जरगर आणि मसूदला दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं होतं."
'निर्णय घेणारी व्यक्ती'
माज रॉ प्रमुख अमरजीत सिंह दुलत सांगतात की त्यावेळी सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला होता की या कट्टरवाद्यांसोबत कंदाहारला कोण जाणार?
अधिकृत कागदपत्रांमध्ये ही बाब स्पष्ट आहे की इंटेलिजन्स ब्युरोचे अजित डोभाल दिल्लीहून विमानानं टेकऑफ करण्याआधीच कंदाहारमध्ये उपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्यासोबत परराष्ट्र खात्याचे संयुक्त सचिव विवेक काटजू आणि रॉचे सी.डी.सहाय आधीपासून कंदाहारमध्ये होते. हे तिन्ही अधिकारी तालिबानशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते.
या तीनही अधिकाऱ्यांनी एका आवाजात एकच गोष्ट सांगितली होती की कंदाहारला अशा व्यक्तीला पाठवायला हवं, जो गरज पडली तर मोठे निर्णय घेऊ शकेल. कारण तिथून प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीकडे पाहाणं व्यावहारीक होणार नव्हतं.
डोभाल यांना 'बायनाक्युलर' गिफ्ट मिळालं
जेव्हा तीनही कट्टरवाद्यांना घेऊन भारतीय विमान दिल्लीहून कंदाहारला पोहोचलं तेव्हा पाच वाजता अजित डोभाल अपह्रत प्रवाशांना भेटण्यासाठी विमानात गेले.
जेव्हा ते विमानातून उतरत होते तेव्हा दोन अपहरणकर्त्यांनी बर्गर आणि सँडीने (तालिबान अपहरणकर्त्यांची नावं बदलली आहेत) अजित डोभाल यांना एक छोटी बायनाक्युलर गिफ्ट म्हणून दिली.
डोभाल यांच्या हवाल्याने जसवंत सिंग यांनी आपली आत्मकथा 'अ कॉल टू ऑनर - इन सर्विस ऑफ एमर्जिंग इंडिया'मध्ये लिहिलंय की, "त्यांनी मला सांगितलं की ते या दुर्बिणीच्या मदतीनं बाहेरच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. जेव्हा आम्ही कंदाहारहून दिल्लीला यायला निघालो तेव्हा डोभाल यांनी ती दुर्बिण जसवंत सिंग यांना दाखवली. आम्ही म्हटलं की ही दुर्बिण आपल्याला कंदाहारच्या वाईट दिवसांच्या अनुभवांची आठवण करून देत राहील."
फारूख अब्दुल्ला नाराज झाले

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी आपल्या आत्मकथेत लिहिलंय, "जसे हे तीनही कट्टरवादी विमानातून खाली उतरले तसं त्यांचं अतिशय आनंदानं स्वागत करण्यात आलं. ते तिघे उतरताच आमच्या विमानाच्या शिड्या काढून घेण्यात आल्या. ज्यामुळे आम्ही खाली उतरू शकत नव्हतो. खाली उभे असलेले लोक आनंदाने ओरडत होते. तीनही कट्टरवाद्यांच्या कुटुंबांना पाकिस्तानातून कंदाहारला आणण्यात आलं होतं. म्हणजे योग्य लोकांनाच आपण सोडवून आणलंय हे कळावं हा हेतू होता."
या कट्टरवाद्यांच्या सुटकेआधी अमरजीत सिंह दुलत यांना नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना समजावण्यासाठी श्रीनगरला पाठवण्यात आलं.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला मुश्ताक अहमद जरगर आणि मसूद अझहरला सोडण्यासाठी अजिबात तयार नव्हते. दुलत सांगतात की अब्दुल्लांना समजावण्यासाठी त्यांना मोठी ताकद खर्च करावी लागली.
जमात ए इस्लामीवर बंदी घातल्याने नाराज झालेल्या फारुख अब्दुल्लांनी याच आठवड्यात पीटीआयशी बोलताना म्हटलं की "जे आता आम्हाला देशद्रोही म्हणतायत, त्यांना आम्ही 1999 साली म्हटलं होतं की मसूद अझहरला सोडू नका. आम्ही तेव्हाही अझहरच्या सुटकेविरोधात होतो आणि आजही आहोत."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








