Masood Azhar: ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहर कंदाहर हायजॅकनंतर कसा सुटला

मसूद अझर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी न्यूज

29 जानेवारी 1994 रोजी मसूद अझहर पहिल्यांदा एका बांगलादेशी विमानामधून ढाक्यातून दिल्लीला आला होता. त्याच्याजवळ पोर्तुगालचा पासपोर्ट होता.

इंदिरा गांधी विमानतळावर उतरल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याला विचारलं, "तुम्ही तर पोर्तुगाली दिसत नाही?"

मसूद म्हणाला, "मी मूळचा गुजराती आहे."

हे ऐकल्यावर त्या अधिकाऱ्यानं त्याच्याकडे न पाहता त्याच्या पासपोर्टवर शिक्का मारला.

त्यानंतर काही दिवसांमध्येच मसूद श्रीनगरच्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसू लागला. भावना भडकावणारी भाषणं द्यायची आणि फुटीरतावादी समूहांमधील मतभेदांमध्ये मध्यस्थी करायची, हे त्याचं वैशिष्ट्य होतं. काश्मिरी तरुणांना कट्टरतावादाकडे आकृष्ट करणं, त्यासाठी प्रेरणा देणं, हे त्याचं आणखी एक काम.

एके दिवशी अनंतनागमध्ये सज्जाद अफगाणीबरोबर एका ऑटोमधून जात असताना त्याला अटक करण्यात आली. लष्कराच्या जवानांनी त्यांना थांबवलं, तेव्हा त्या ऑटोमधले दोघंही उतरून पळू लागले. मग जवानांनी त्यांना पकडलं.

"भारत सरकार फार काळ मला कारागृहातमध्ये ठेवू शकणार नाही," अशी तो शेखी मिरवायचा.

मसूदला अटक झाली आणि त्यानंतर 10 दिवसांनी कट्टरतावाद्यांनी दिल्लीमध्ये काही परदेशी नागरिकांचं अपहरण केलं. त्या नागरिकांची सुखरूप सुटका हवी असेल तर मसूदला सोडा, अशी मागणी करण्यात आली.

पण दिल्ली पोलिसांनीच या ओलीस ठेवलेल्या परदेशी नागरिकांची सुटका केली आणि जहालवाद्यांची मोहीम फसली.

लठ्ठपणामुळे अडकला भुयारात

त्यानंतर वर्षभरात हरकत-अल-अंसारने काही परदेशी नागरिकांचं अपहरण करून पुन्हा त्याला सोडवण्याची मागणी केली. मात्र हा प्रयत्नही अयशस्वी ठरला.

1999मध्ये त्या जम्मूच्या कोट भवताल कारागृहातून त्याला काढण्यासाठी एक भुयार काढण्यात आलं. पण जाडजूड मसूद अजहर त्यात अडकला आणि पकडला गेला.

आणि मग काही महिन्यांनंतर कंदाहारचा एक कट रचण्यात आला.

24 डिसंबर 1999 रोजी 'इंडियन एअरलाइन्स'च्या IC814 विमानाचं अपहरण करून कंदाहरला घेऊन गेले. विमानातल्या 180 लोकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने तीन जहालवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी मसूद अझहर एक होता.

पण मुश्ताक अहमद जरगर आणि मसूद अझहरला सोडण्यासाठी फारूख अब्दुल्ला आजिबात तयार नव्हते. त्यांची समजूत काढण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'चे प्रमुख अमरजित सिंह दुलत यांना पाठवण्यात आलं. दुलत यांना फार प्रयत्न करावे लागले.

रॉच्या गल्फस्ट्रीम विमानाने दिल्लीला आणले

मुश्ताक जरगरला श्रीनगर जेल आणि मसूद अझरला जम्मूच्या कोट भलवाल जेलमधूनन श्रीनगरमध्ये आणलं गेलं. दुलत यांनी त्यांना 'रॉ'च्या एका लहान गल्फस्ट्रीम विमानात बसवलं.

दुलत सांगतात, "दोघांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. मी विमानात चढण्याच्या आधीच त्यांना विमानाच्या मागच्या भागात बसविण्यात आलं होतं. विमानाच्या मध्ये एक पडदा लावण्यात आला होता. पडद्याच्या एका बाजूला मी होतो तर दुसऱ्या बाजूला जरगर आणि मसूद अझहर होते."

तालिबान विमान

फोटो स्रोत, Getty Images

"ताबडतोब दिल्लीला पोहोचा, असा संदेश आम्हाला टेकऑफच्या काही क्षणांपूर्वीच मिळाला होता," दुलत पुढे सांगतात. "तिथे पोहोचल्यावर पाहिलं की विमानतळावर परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह आमची वाट पाहात होते."

कंदाहरला जाण्यासाठी एक विमान तयार होतं. दिल्लीला उतरल्यावर जरगर आणि अझहर यांना जसवंत सिंह यांच्या विमानात घेऊन जाण्यात आलं. त्या विमानात तिसरा जहालवादी ओमर शेख आधीपासूनच बसलेला होता.

जसवंत सिंह कंदाहरला का गेले?

या कैद्यांबरोबर भारतातर्फे कोण जाईल, असा पेच निर्माण झाला होता.

कंदाहरला अशा व्यक्तीला पाठवलं पाहिजे, जो गरज पडली तर मोठे निर्णय घेऊ शकेल, कारण प्रत्येक निर्णयासाठी तिथून दिल्लीकडे डोळे लावून बसणं व्यवहार्य होणार नाही, असं परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव विवेक काटजू, इंटेलिजन्स ब्युरोचे अजित डोवाल, 'रॉ'चे C.D. सहाय यांनी एकस्वरात सांगितलं.

जेव्हा जसवंत सिंह यांच्या विमान कंदाहरच्या विमानतळावर उतरलं, तेव्हा बराच वेळ तालिबानकडून त्यांना भेटायला कुणीच आलं नाही.

विमानात बसूनच जसवंतसिंह त्यांची वाट पाहू लागले. जसवंत सिंह त्यांच्या "A Call to Honour - In Service of Emerging India" आत्मचरित्रामध्ये लिहितातः "बऱ्याच वेळानंतर वॉकीटॉकीवर आवाज आला. त्रस्त झालेले विवेक काटजू माझ्याकडे आले आणि या जहालवाद्यांना सोडायचं की नाही, हे ठरवा असं म्हणाले. ते मान्य करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.

"जसे हे तिघे खाली उतरले, तेव्हा त्यांचं एकदम जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ते उतरल्यावर आम्ही उतरू नये, म्हणून आमच्या विमानाचा जिना काढून घेण्यात आला. खाली असणारे लोक आनंदाने ओरडत होते."

"ISIवाले लोक या तिन्ही जहालवाद्यांच्या नातेवाईकांना पाकिस्तानातून कंदाहरला घेऊन आले होते. आम्ही खऱ्या लोकांना सोडलंय की नाही, हे पाहाण्यासाठी त्यांना घेऊन आले होते. जेव्हा ते खरे असल्याचं लक्षात आलं, तेव्हा विमानाला पुन्हा जिना लावण्यात आला. तोपर्यंत अंधार पडला होता आणि थंडीही वाढू लागली होती," ते लिहितात.

दुर्बिण दिली भेट

संध्याकाळी 5च्या सुमारास अजित डोवाल अपहृत विमानातल्या प्रवाशांना भेटायला गेले. ते विमानातून बाहेर पडू लागले, तेव्हा बर्गर आणि सँडी या अपहरणकर्त्यांनी त्यांना एक लहानशी दुर्बिण भेट दिली.

भारतातर्फे जसवंत सिंह कंदाहारला गेले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातर्फे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह कंदाहारला गेले

या घटनेबद्दल अजित डोवाल यांनी एका पुस्तकात सांगितलंय: "या दुर्बिणीमधूनच ते (अपहरणकर्ते) बाहेरच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते, असं त्यांनी मला सांगितलं. नंतर मी कंदाहरमधून दिल्लीला येताना जसवंत सिंह यांना ती दुर्बिण भेट म्हणून दिली आणि म्हणालो, 'ही दुर्बिण आपल्याला कंदाहरच्या वाईट अनुभवाची आठवण आहे'."

घाणेरडा वास, चिकन आणि हाडं

अपहृत प्रवासी, परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह आणि भारतीय अधिकारी त्याच दिवशी परतले. मात्र भारतीय विमानात इंधन भरून ते परत घेऊन येण्यासाठी भारताचे इस्लामाबादेतील उच्चायुक्तालयात काम करणारे A. R. घनश्याम यांना कंदाहरमध्येच ठेवण्यात आलं.

'इंडियन एअरलाइन्स'च्या क्रूमधील 14 सदस्यही कंदाहरमध्ये मागे थांबले. नंतर घनश्याम यांनी आपल्या अहवालात लिहिलं, "जेव्हा मी त्या विमानात गेलो तेव्हा सहन करता येणार नाही, अशा घाणीचा भपकारा, कॉकपिट पॅनलपर्यंत चिकनची हाडं आणि संत्र्याची सालं पडली होती. विमानातील शौचालयंही भरली होती आणि ती कुणीही वापरू शकत नव्हतं."

'ती' लाल सूटकेस

रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास कमांडर कॅप्टन सुरी हे घनश्याम यांच्याजवळ आले आणि म्हणाले, "तालिबानवाले हे IC 814चं उड्डाण करू देण्यास मनाई करत आहेत. त्यामध्ये इंधन भरण्यास टाळाटाळ करत आहेत. विमानात असलेली अपहरणकर्त्यांची एक लाल बॅग दिल्यावरच ते विमान टेकऑफ करू देतील, असं ते म्हणत आहेत."

तालीबान विमान

फोटो स्रोत, Getty Images

11 वाजेपर्यंत कॅप्टन सुरी विमानातच राहिले. घनश्याम आपल्या अहवालात लिहितात, "एक लाल रंगाची पजेरो (गाडी) विमानाच्या होल्डमध्ये समोरच लावण्यात आली होती आणि तिचे लाईटही सुरू ठेवण्यात आले होते. कॅप्टन राव यांनी विमानाचं इंजिन सुरू केलं होतं आणि काही मजूर विमानात काम करत होते.

"कॅप्टन राव यांनी नंतर मला सांगितलं की मजुरांनी विमानातील होल्डमध्ये ठेवलेल्या सर्व लाल बॅगा पजेरोमध्ये बसलेल्या लोकांना दाखवल्या. माझ्यामते त्या सूटकेसची ओळख पटवण्यासाठी तिथे एक किंवा एकापेक्षा अधिक अपहरणकर्ते बसले होते. अखेर त्यांना ती लाल सूटकेस मिळाली. या सूटकेसमध्ये 5 ग्रेनेड ठेवण्यात आले होते. शेवटी कॅप्टन राव परत आले आणि आम्ही रात्रभर विमानतळाच्या लाऊंजमध्येच थांबलो."

बदाम, बेदाणे आणि नेल कटर

दुसऱ्या दिवशी विमानात इंधन भरलं गेलं. अफगाणी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजून 43 मिनिटांनी विमानानं दिल्लीच्या दिशेनं झेप घेतली.

यानंतर तालिबानचा एकही अधिकारी कंदाहर विमानतळावर दिसला नाही, असं घनश्याम सांगतात. काही वेळाने कंट्रोल टॉवरच्या एका अधिकाऱ्याने घनश्याम यांना एक पॅकेट दिलं. पाकिट उघडून पाहिल्यावर त्यात बदाम, बेदाणे, एक लहान कंगवा आणि एक नेल कटर असल्याचं त्यांना दिसलं.

तालिबानच्या नागरी उड्डाणमंत्र्यांनी भेट म्हणून हे पाकीट पाठवलं होतं. कंदाहर विमानतळावर राहिल्यामुळं घनश्याम यांना एकदाही शहरात जाण्याची संधी मिळाली नव्हती, हे त्यांना माहिती होतं.

घनश्याम यांनी 12 वाजता संयुक्त राष्ट्राच्या एका विमानातून प्रवास सुरू केला आणि 3 वाजता ते इस्लामाबादला पोहोचले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)