लोकसभा 2019 : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल-सोनिया यांचा समावेश

राहुल आणि सोनिया

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 15 जणांची नावं आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे आपल्या पारंपारिक मतदारसंघातून म्हणजेच अमेठी आणि रायबरेलीतून लढणार आहेत.

गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या उमेदवारांची नावे या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. गुजरातच्या अहमदाबाद पश्चिम मतदारसंघातून राजू परमार, आनंद मतदारसंघातून भारतसिंह सोळंकी, वडोदरा मतदारसंघातून प्रशांत पटेल, छोटा उदयपूर येथून रणजित, मोहनसिंह राठवा हे लोक उभे राहतील असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून इम्रान मसूद, बदाऊन येथून सलीम इकबाल शेरवानी, धौराहरा येथून जितिन प्रसाद, उन्ना येथून अनु टंडन फारूकाबाद येथून सलमान खुर्शीद, अकबरपूर येथून राजाराम पाल, जलाउन येथून ब्रिज लाल खबरी, फैजाबाद येथून निर्मल खत्री आणि खुशी नगर येथून RPN सिंह यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेस

फोटो स्रोत, InC

प्रियंका गांधी मैदानात नाहीत?

खरंतर अखिलेश यादव आणि मायावतींच्या महाआघाडीनं रायबरेली आणि अमेठी या दोन जागांवर उमेदवार देणार नसल्याचं घोषित केलं आहे. त्यानंतर काँग्रेसनं पूर्वांचली जबाबदारी प्रियंका गांधींच्या खांद्यावर सोपवली. त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या जागी प्रियंका रायबरेलीतून लढतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र सध्या तरी पहिल्या यादीत त्यांचं नाव नाहीए. सोनिया गांधी परंपरेप्रमाणे रायबरेलीतून लढणार आहेत. तर प्रियंका नेहमीप्रमाणे पडद्याआडून सूत्रं हलवणार असल्याचं दिसतंय.

सलमान खुर्शीद लढणार

माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद हे निवडणूक लढणार आहेत. या यादीमध्ये युपीएच्या काळात मंत्रीपद भूषवलेल्या चार जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सलमान खुर्शीद, भरतसिंह सोळंकी, जितिन प्रसाद आणि RPN सिंह यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी काँग्रेसनं दिली आहे.

2014 मध्ये काँग्रेसनं बदायूँची जागा लढवली नव्हती. उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि खुशीनगर या दोन जागांवर 2014 साली काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. आज जाहीर केलेल्या इतर 8 जागांवर काँग्रेसला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.

टीम राहुल गांधी

राहुल गांधी यांच्या पसंतीचे उमेदवार पहिल्या यादीत झळकले आहेत. भारतसिंह सोळंकी हे अहमदाबाद येथून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेस नेते माधवसिंह सोळंकी यांचे ते पुत्र आहेत.

जितीन प्रसाद हे तरुण उमेदवार या यादीत आहेत. त्यांचं वय 45 आहे. 2009 मध्ये ते धौरारा मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. ते यावेळीही धौरारामधून निवडणूक लढवणार आहेत.

बडोदा लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी प्रशांत पटेल यांना रिंगणात उतरवलं आहे. गुजरात काँग्रेसमधील तरूण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 2014ला स्वत: नरेंद्र मोदी यांनी बडोद्यातून निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांनी वाराणसीची जागा कायम ठेऊन बडोद्याची जागा सरेंडर केली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)