शिवसेना भाजप जागावाटपात जालन्याचा खोडा, अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंसाठी जागा सोडणार?

युतीच्या घोषणेनंतर गळाभेट घेताना उद्धव ठाकरे आणि अमित शाह, शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter / Devendra Fadnavis

फोटो कॅप्शन, युतीच्या घोषणेनंतर गळाभेट घेताना उद्धव ठाकरे आणि अमित शाह, शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

होईल की नाही असं म्हणता म्हणता भाजपा-शिवसेना युती झाली. युतीच्या पारड्यात मत टाकून बसलेल्या दोन्ही पक्षांतल्या अनेक खासदार आणि इच्छुकांना हायसं वाटलं.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहूनही एकमेकांशी भांडत बसलेल्या या दोन मित्रांमधलं भांडण आता तरी संपलं असं अनेकांना वाटलं. पण खरं युद्ध निवडणुकीअगोदर जागावाटपासाठी असणार आहे.

काही जागा अशा आहेत की ज्यासाठी दोन्ही पक्ष बाह्या सरसावून बसले आहेत आणि जरी त्या कोणा एकाच्या वाट्याला गेल्या तरीही दुसऱ्या मित्राकडूनच पाडापाडी होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळेच ही युद्धापूर्वीची शांतता आहे.

त्यातल्या एक जागा आहे जालना, त्याबाबतचा तिढा सोडवण्यासाठी अर्जून खोतकर आज मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. याबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडेच सर्वांच्या नजरा आहेत.

1) जालना : दानवे विरुद्ध खोतकर

मराठवाड्यातली जालन्याची जागा ही एक अशी लोकसभेची जागा आहे जी सेना-भाजपा युतीसाठी डोकेदुखी बनणार आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातलं वैर.

रावसाहेब दानवे इथून खासदार आहेत आणि ते केंद्रात मंत्रीही होते. पण खोतकरांनी युती होण्यागोदरच जाहीर करून टाकलं होतं की ते यंदाची लोकसभेची निवडणूक जालन्यातून लढवणार आणि दानवेंना पाडणार.

युती झाली तरीही खोतकरांनी आपला निर्णय बदलला नाही आणि प्रसंगी शिवसेना सोडून कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याचा इरादाही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून दाखवल्याची चर्चा आहे.

दानवेंमुळं भाजपासाठी जालन्याची जागा एवढी प्रतिष्ठेची आहे की मुख्यमंत्री फडणवीसांनी सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मध्यस्थी करण्यासाठी पाठवलं. तीनही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पण खोतकर माघार घेण्यास तयार नाहीत. दानवे आणि खोतकरांमधून विस्तवही जात नाही.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

'बीबीसी मराठी'शी बोलतांनाही खोतकरांनी आपला हा निर्णय स्पष्टपणे सांगितला. "जालन्याची जागा सेनेला सोडावी अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि मी निवडणूक लढवायला तयार आहे. जरी युतीत ही जागा भाजपाकडे असली तर मग मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी आमची मागणी आहे. मी उद्धव साहेबांसमोर हे सगळं मांडलं आहे. ते अंतिम निर्णय घेतील," खोतकर म्हणाले.

ही लढाई केवळ एका मतदारसंघातल्या वर्चस्वाची नाही आहे. तर मराठवाड्यावरच्या वर्चस्वाचीही आहे. युती तुटल्यानंतर झालेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सेना आणि भाजपा वेगळे वेगळे लढले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद एकमेकांच्या बालेकिल्ल्यांमध्ये वाढली आहे. सेनेइतकाच भाजपाही मराठवाड्यात वाढला आहे. परिणामी लोकसभेच्या जागांची लढाई ही एकतर आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याची किंवा दुसऱ्याच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याची संधी आहे आणि हे सेना-भाजपा दोघेही ओळखून आहेत.

2) पालघर : युतीच्या पुनर्जन्माची जागा

शिवसेनेकडून युतीच्या चर्चेची मुळात अटच होती ती पालघर लोकसभा मतदारसंघ सेनेला सोडण्याची. २०१४ मध्ये ही जागा भाजपानं लढवली आणि चिंतामण वनगा खासदार झाले.

पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सेना-भाजपामध्ये वितुष्ट आलं. युती तुटली. शिवसेना राज्य सरकारमध्ये उशीरा सहभागी झाली, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पोटनिवडणुकांमध्ये शिवसेना अणि भाजपातलं शत्रुत्व टोकाला जात राहिलं. म्हणूनच जेव्हा चिंतामण वनगांचं अचानक निधन झालं तेव्हा शिवसेनेनं ती निवडणूक लढवायची ठरवली.

शिवसेना भाजपातलं हे वैर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या वैयक्तिक पातळीपर्यंत पोहोचलं जेव्हा शिवसेनेनं चिंतामण वनगांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी दिली.

एक पोटनिवडणूक ही संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकांएवढी महत्त्वाची बनली. भाजपानं ही निवडणूक जिंकली आणि सेनेचा झालेला हा पराभव मित्रत्वाच्या कायमचा मुळावर येणार असं चित्रं तयार झालं. त्यामुळे जेव्हा भाजपा नेतृत्वाकडून युतीसाठी 'मातोश्री' भेटी सुरु झाल्या तेव्हा पालघरची जागा सेनेला सोडा अशी अट पहिल्यांदा ठेवली गेली.

युतीची घोषणा

युतीसाठी आग्रही असणाऱ्या भाजपाला सेनेनं जणू खिंडीत गाठलं आणि अखेरीस ज्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी आपलं वजन खर्ची घातलं ती जागा सेनेला सोडण्याचा निर्णय झाला.

त्यामुळे शिवसेना आता २३ जागा लोकसभेसाठी लढवेल. प्रत्यक्ष जागावाटप अद्याप जाहीर झालं नसलं आणि उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं असलं की '२३वी जागा कोणती हे मुख्यमंत्री जाहीर करतील', तरी ती पालघरची असेल हे सरळ आहे.

पण पालघरचा हा निर्णय भाजपा कार्यकर्त्यांच्या सहज पचनी पडेल अशी स्थिती नाही. दोनदा जिंकलेली जागा सेनेच्या हाती सोपवून मोकळी करण्यासाठी भाजपाअंतर्गत विरोध आहे. स्थानिक पातळीवर लगेचच भाजपात धुसफूस सुरु झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तालुका पातळीवरच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामेही पाठवले आहेत.

कॉंग्रेसमधून भाजपात येऊन पोटनिवडणूक जिंकणारे सध्याचे खासदार राजेंद्र गावित हेसुद्धा या निर्णयामुळे व्यथित आहेत. सध्याच्या या स्थितीत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नका, असं त्यांना सांगण्यात आलं आहे.

"मी अधिक काही यावर बोलणं उचित नाही. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. ही जागा भाजपाकडेच रहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," एवढी मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी 'बीबीसी मराठी'शी बोलतांना दिली.

युतीचा मार्ग जरी सुरळीत करण्यात पालघरच्या जागेनं महत्त्वाची भूमिका निभावली असली तरीही जागावाटपाच्या कलहात ती एक निमित्तही ठरू शकते.

3) ईशान्य मुंबई : भाजपा चालेल, पण सोमैय्या नको

लोकसभेची ही जागा शिवसेनेसाठी बदला घेण्याची जागा झाली आहे. त्याचं कारण, भाजपाचे किरीट सोमैय्या इथून खासदार आहेत. युती तुटल्यानंतर सेना-भाजपा जे वैर सुरु झालं, त्याचा चेहरा किरीट सोमैय्या बनले. आशिष शेलार आणि सोमैय्या यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर नजर ठेवत शिवसेनेला लक्ष केलं.

सोमैय्यांनी सेनेच्या ताब्यातल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करत घोटाळ्याचे आरोप केले आणि थेट 'मातोश्री'कडे बोट दाखवलं.

सोमैय्या तेव्हापासून शिवसेनेचे भाजपातले शत्रू क्रमांक एक बनले. उद्धव ठाकरेंनाही ते नकोसे झाले. ते इतके की, जेव्हा अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जेव्हा 'युती'ची घोषणा करण्यात आली तेव्हा भाजपाच्या इतर मंत्री आणि नेत्यांसोबत सोमैय्याही पत्रकार परिषदेत येऊन पोहोचले.

पण कथितरित्या ठाकरे-शाह पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचण्याच्या काही मिनीटं अगोदर सोमैय्यांना तिथं न थांबण्याच्या निरोप देण्यात आला आणि सोमैय्यांनीही काढता पाय घेतला. त्यामुळे सोमैय्यांसाठी ईशान्य मुंबईतले शिवसैनिक काम करायला तयार नाहीत. या भागात शिवसेनेची ताकद आहे आणि जर सोमैय्या उभे जरी राहिले तरी त्यांना पाडण्यासाठी काम होऊ शकतं.

पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शिवाजी महाराज, बाळ ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा

"युती तर झाली आहे आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार सगळे शिवसैनिक काम करतील. पण ईशान्य मुंबईबद्दल शिवसैनिकांच्या भावना वेगळ्या आहेत. त्या तशा का आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला कोणी काहीही बोललं तरी काही नाही. पण 'मातोश्री'हे आमचं श्रद्धास्थान आहे. त्याच्याबद्दल कोणी अपशब्द काढले हे मराठी माणसालाही रुचलेलं नाही. त्यामुळे भाजपाच्या इथल्या खासदाराबद्दल प्रचंड संताप आहे. आणि हा केवळ शिवसेनेचा आणि मराठी माणसांचाच नाही तर भाजपाच्या नगरसेवकांचा सुद्धा संताप आहे, असं शिवसेनेचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख राजा राऊत यांनी सांगितलं आहे.

"आम्ही काय हा मतदारसंघ आम्हाला सोडा असं म्हणत नाही आहोत आणि तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. पण जरी तो भाजपाकडेच राहणार असेल तर उमेदवार बदलून द्या अशी आमची मागणी आहे. जर तरीही भाजपाने हाच उमेदवार लादला तर त्यांनी परिणामांचीही तयारी ठेवावी. लक्षात ठेवा, इतिहास असा आहे की ईशान्य मुंबई एकाच खासदाराला दुसऱ्यांदा निवडून देत नाही," राजा राऊत पुढे सांगतात. त्यामुळे ईशान्य मुंबई युतीची मोठी डोकेदुखी बनणार आहे.

4) मावळ : स्थानिक पातळीवरची ताकद

भौगोलिक दृष्ट्या अतिशय आव्हानात्मक असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात शिसेना विरुद्ध भाजपा अशी अगोदरच जुंपली आहे. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आला. एकदा गजानन बाबर आणि नंतर श्रीरंग बारणे असे दोघे सेनेचे खासदार इथून झाले. पण यंदा भाजपाच्या या मतदारसंघातल्या नेत्यांनी सेनेविरुद्ध बंड पुकारले आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार असणाऱ्या आणि भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या बाळा भेगडेंनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून ही जागा भाजपाला देण्याची मागणी केली आहे. अन्यथा शिवसेनेसाठी काम न करण्याची भूमिकाही घेतली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या लक्ष्मण जगताप यांच्यासाठी भाजपा कार्यकर्ते यंदा आग्रही आहेत.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस, अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस, अमित शाह

लोकसभा अपक्ष म्हणून लढवल्यानंतर जगताप 'भाजपा'त आले आणि सध्या ते चिंचवडचे आमदार आहेत. चर्चा अशीही आहे की पालघरच्या बदल्यात भाजपाने शिवसेनेकडे मावळ लोकसभा मतदारसंघ मागितला आहे, पण सेना तो सोडायला तयार नाही.

या भागातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचं वर्चस्व असल्यानं निवडणुकीत भाजपाची साथ नसणं हे सेनेसाठी त्रासदायक आहे. जागा पडण्याइतपत धोका शिवसेनेला असेल.

"ठाण्याची लोकसभेची जागा एकेकाळी 'भाजपा'कडे होती. राम कापसे तिथून निवडणूक लढवायचे. नंतर स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद वाढली आणि ती लोकसभेची जागा कायमची सेनेकडे गेली. आमची मावळ लोकसभा मतदारसंघाची मागणी याच मुद्द्यावर आहे," असं मत मावळचे भाजपा आमदार आणि पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे 'बीबीसी मराठी'शी बोलतांना व्यक्त केलं आहे.

"मावळमध्ये सगळ्या ठिकाणी भाजपाचं वर्चस्व आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत ८० टक्के नगरसेवक आमचे आहेत. पनवेलमध्ये आमचे ५१ नगरसेवक आहेत आणि सेनेचा एकही नाही. तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदा आमच्याकडे आहेत. मावळ पंचायत समितीही आमची आहे. सहापैकी ३ आमदार भाजपाचे आहेत. असं असतांना आम्ही हा मतदारसंघ शिवसेनेला का द्यावा हा आमचा सवाल आहे," असं भेगडे म्हणाले.

5) सातारा : भाजपाला का लढायचंय?

भाजपा-सेना युतीमध्ये लोकसभेच्या जागांच्या अदलाबदलीबाबत आणखी एका जागेची चर्चा सुरु आहे ती म्हणजे साताऱ्याची. उदयनराजे भोसलेंच्या मुख्यमंत्र्यांसोबत तयार झालेल्या जवळीकीमुळे अनेक प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या.

पण त्या प्रत्यक्षात येत नसल्यामुळे अनेक नावांची चर्चा भाजपातर्फे आहे आणि भाजपा शिवसेनेकडे हा मतदारसंघ मागण्याच्या तयारीत आहे, असं म्हटलं जातं आहे.

युतीत सातारा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे, पण गेल्या निवडणुकीत तो मित्रपक्ष म्हणून आरपीआय (आठवले गट)ला देण्यात आला होता. यंदा भाजपाचा ही जागा लढवण्याचा मानस आहे.

त्यासाठी मूळचे 'राष्ट्रवादी'चे असलेले नरेंद्र पाटील आणि मूळचे कॉंग्रेसचे असलेले मदन भोसले यांची नावं भाजपकडून चर्चेत आहेत. पण साताऱ्याबाबत शिवसेनेने अद्याप भूमिका घेतलेली नाहीये आणि जर भाजपानं ही जागा मागितली तर सेनेला बदल्यात कोणती मिळणार हे गुलदस्त्यात आहे.

वाचा बीबीसीची विश्लेषणं -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)