भाजप नेत्यांनी पुलवामा हल्ल्याचा कट रचला होता? - फॅक्ट चेक

अमेरिकेत राहणारे भारतीय उद्योजक अवि डांडिया यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात त्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनेच पुलवामात CRPFच्या तुकडीवर हल्ला घडवून आणल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.

व्हायरल व्हीडिओत अवि डांडिया आपल्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवतात. ज्यात भाजप अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं एका अज्ञात महिलेशी बातचित सुरू आहे. ज्यात हल्ल्याचा उल्लेख आहे.

हे भ्रामक कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर असं वाटू शकतं की पुलवामा हल्ल्याचा कट भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी रचला होता. मात्र बीबीसीने केलेल्या पडताळणीत हे कॉल रेकॉर्डिंग बनावट असल्याचं समोर आलं आहे.

1 मार्चला अवि डांडिया यांनी फेसबुक पेजवर लाईव्ह करत ही ऑडिओ क्लीप लोकांना ऐकवली होती.

त्यापुढे त्यांनी लिहिलं होतं की, "जर तुम्हाला विश्वास नसेल तर हे ऐका आणि देशाच्या जनतेत दम असेल तर त्यांनी हा आवाज ज्यांचा आहे, त्यांना जाब विचारावा. जे लष्कराचे झाले नाहीत, ते आपल्या देशाच्या जनतेचे काय होणार?"

सध्या अवि डांडिया यांच्या फेसबुक पेजवर हा व्हीडिओ उपलब्ध नाहीए. मात्र इंटरनेट अकाईव्हमुळे हे लक्षात येतं की हा व्हीडिओ हटवण्यापूर्वी तब्बल 23 लाख जणांनी पाहिला आहे. तर 1 लाख जणांनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.

'डेली कॅपिटल' आणि 'सियासत डॉट पीके' सारख्या पाकिस्तानातल्या छोट्या वेबसाईट्सनीही अवि डांडिया यांच्या व्हीडिओच्या आधारावर भाजपविरोधात बातम्या दिल्या आहेत.

याशिवाय शेकडो लोकांनी हा व्हीडिओ फेसबुकवरून डाऊनलोड केला आहे. तसंच व्हॉट्सअपवरही शेअर केला आहे. बीबीसीच्या अनेक वाचकांनीही व्हॉट्सअपवर आम्हाला हा व्हीडिओ पाठवून याच्या सत्यतेविषयी विचारणा केली.

ऑडिओची सत्यता...

पेशाने हिऱ्याचे व्यापारी असलेले अवि डांडिया यांनी 2015मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शाहरुख खानवरही तिखट प्रतिक्रिया व्यक्त करुन प्रसिद्धी मिळवली होती.

मात्र यावेळी फेसबुकवर लाईव्ह व्हीडिओ करताना अवि डांडियांनी जो ऑडिओ ऐकवला आहे, तो अमित शाह आणि राजनाथ सिंग यांच्या इतर वक्तव्यांची मोडतोड करून बनवल्याचं समोर आलं आहे.

या ऑडिओ क्लीपमध्ये एका अज्ञात महिलेचा आवाज आहे. ही महिला अमित शाह आणि राजनाथ यांना प्रश्न विचारत असल्याचं ऐकायला येतं. आणि त्याला चुकीचे संदर्भही दिले आहेत.

व्हायरल ऑडिओत राजनाथ सिंह म्हणतात की, "जवानांबद्दल आपला देश प्रचंड संवेदनशील आहे." अर्थात हे वक्तव्य राजनाथ यांनी पुलवामा हल्ल्याआधी एक आठवडा (22 फेब्रुवारी) इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

पुलवामा हल्ल्यानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या मुद्द्यावर राजकारण होऊ नये, असं म्हटलं होतं.

हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट पार्कात सफारी करत होते, असा आरोप काँग्रेसनं केला होता. त्याला राजनाथ यांनी उत्तर दिलं होतं.

व्हायरल ऑडिओमध्ये राजनाथ यांची हीच मुलाखत तीन ते चार वेळा चुकीच्या पद्धतीनं एडिट करून वापरण्यात आली आहे.

तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गेल्या वर्षी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीचा भाग मोडतोड करून या ऑडिओ क्लीपमध्ये वापरण्यात आला आहे.

व्हायरल ऑडिओत अमित शाह म्हणतात की, "देशाच्या जनतेची दिशाभूल केली जाऊ शकते. आणि निवडणुकीसाठी युद्धाची गरज आहे." हे वक्तव्य गेल्या वर्षीच्या अमित शाह यांच्या मुलाखतीचा भाग आहे.

पण त्यांच्या वक्तव्यातून काही शब्द हटवण्यात आले आहेत. तसंच एक-दोन वेगवेगळी वक्तव्य जोडून एक वेगळंच वक्तव्य बनवलं गेलं आहे.

पूर्ण मुलाखतीत कुठेही अमित शाह असं म्हणताना दिसत नाही की, "देशाच्या जनतेची दिशाभूल केली जाऊ शकते आणि निवडणुकीसाठी युद्धाची गरज आहे."

या कथित ऑडिओतील काही भागातील राजनाथ आणि अमित शाह यांचा आवाज नेमका कुठून उचलण्यात आला आहे, हे अजूनही स्पष्ट होत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)