You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IAF MIG 21 : पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना 1 भारतीय वैमानिक बेपत्ता – भारतीय परराष्ट्र मंत्रालय
पाकिस्तानच्या हवाई आक्रमणाला प्रत्युत्तर देताना भारताचं एक विमान गमावलं आहे. भारताचा एक वैमानिक बेपत्ता आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एअर व्हाइस मार्शल आरजी के कपूर उपस्थित होते.
रवीश कुमार म्हणाले, "दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून आम्ही पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने बुधवारी सकाळी हवाई आक्रमण केलं. भारतीय हवाई दल सज्ज असल्याने पाकिस्तानची दोन विमानं भारताच्या हवाई क्षेत्रात आल्याचं आम्ही टिपलं. भारताच्या मिग21 विमानाने पाकिस्तानचं एक लढाऊ विमान पाडलं. दुसरं विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची माहिती आहे. या हवाई धुमश्चक्रीत भारताने एक विमान गायब झालं आहे. तसंच भारतीय वायुसेनेचा एक पायलट बेपत्ता आहे."
दरम्यान हा वैमानिक आमच्या ताब्यात आहे असा दावा पाकिस्तानने केला आहे. Abhinandan : विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा पाकिस्तानचा दावा
यासंदर्भात कोणतेही प्रश्न मात्र रविश कुमार यांनी घेतले नाहीत.
दरम्यान, अमेरिका पाकिस्तानात प्रवेश करून ओसामा बिन लादेनला मारू शकते तर काहीही शक्य होऊ शकतं. देशातील जनतेचा आम्हाला ठाम पाठिंबा आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते, असं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय.
अमेरिकेचे नौदल सैनिक अबोटाबादमध्ये जाऊन अल कायदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेनला ठार मारू शकतात. तर आजच्या परिस्थितीत काहीही शक्य होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं.
लष्कराच्या शौर्याचं राजकारण नको - राहुल गांधी
या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी लष्कराच्या शौर्याचं भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ल्याचा सर्वपक्षीय बैठकीत निषेध करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय लष्कराने दिलेलं प्रत्युत्तर अतुलनीय शौर्याचं प्रतीक आहे. बुधवारी पाकिस्तानच्या आक्रमणाला उत्तर देताना आपला एक वैमानिक बेपत्ता झाला आहे. आपला वैमानिक सुखरुप परतेल अशी खात्री आहे. या अवघड काळात भारतीय लष्कराच्या आम्ही भक्कमपणे पाठिशी आहोत. पुलवामा हल्ल्यात आपल्या सैनिकांनी जीव गमावले. त्यांच्या शौर्याचा, बलिदानाचा राजकारणासाठी उपयोग करून घेणं दुर्देवी आहे. त्याप्रती बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भारतीय वायू सेनेनं दाखवलेलं धाडस सर्वोच्च दर्जाचं आहे."
इम्रान खान यांचा चर्चेचा प्रस्ताव
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात भारता समोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.
ते म्हणाले "आज मी भारताशी बोलणार आहे. आता आपण विचार करून कृती करायला हवी. पहिलं महायुद्ध काही महिन्यांत संपेल असं वाटलं होतं, पण ते अनेक वर्षं चाललं. अमेरिकेला वाटलं नव्हतं की दहशतवादाविरोधातला लढा 17 वर्षं चालेल. मी भारताला म्हणतो की वेळेची अशी गणितं चुकली तर आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल. युद्ध सुरू झालं तर ते थांबवणं माझ्या हातात नसेल आणि मोदींच्याही हातात नसेल. पुलवामानंतर जर भारताला दहशतवादावर चर्चा करायची असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)