You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Abhinandan : IAF विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा पाकिस्तानचा दावा, भारतानं सांगितलं पायलट बेपत्ता
पाकिस्तानने आणखी एक व्हीडिओ जारी केला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला आहे की हा व्हीडिओ एका अभिनंदन नावाच्या भारतीय वैमानिकाचा आहे. या वैमानिकाला सीमेलगत अटक करण्यात आली आहे.
या व्हीडिओत अभिनंदन चहा पिताना दिसत आहेत. तसंच त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून काही प्रश्न विचारले जात आहेत.
ते नेमके कुठले आहेत, त्यांच लग्न झालं आहे का, कुठलं विमान ते चालवत होते, तसंच तुमचं लक्ष्य काय होतं असे प्रश्न त्यांना या व्हीडिओमध्ये विचारले जात आहेत.
पाकिस्तानी लष्कराने आधी दोन भारतीय वैमानिकांना अटक केल्याचा दावा केला होता, पण आता मात्र त्यांच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करून फक्त एकच भारतीय पायलट त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना एक भारतीय वैमानिक बेपत्ता झाल्याचं सांगितलं आहे. पण त्याची अधिक माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.
पण परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक जारी करून पाकिस्ताननं अटक केलेल्या भारतीय वैमानिकाला जिवंत आणि लवकरात लवकर परत पाठवण्याची मागणी केली आहे.
या संदसर्भात आज सकाळपासून काय घडतंय हे पाहाण्यासाठी इथं क्लिक करा
पाकिस्ताननं आधी जारी केलेल्या व्हीडिओत ती व्यक्ती स्वत:ला विंग कमांडर म्हणवत आहे. त्या व्यक्तीने आपलं नावही सांगितलं. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती.
या व्यक्तीने वायुसेनेचा गणवेश घातला आहे. त्यावर इंग्रजीत त्याचं नाव लिहिलं आहे. ही व्यक्ती आपला सर्व्हिस नंबरही सांगत आहे.
वरच्या फोटोत दिसत असलेलं ट्विट पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून टाकण्यात आलं होतं. काही मिनिटांतच ते काढून टाकण्यात आलं.
मात्र पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दोन वैमानिकांना अटक केल्याचा दावा केला आणि त्याचे फोटोही दिले. मात्र आता पुन्हा ते ट्वीट डिलिट करण्यात आलं आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दुसऱ्या भारतीय वैमानिकाने सेंट्रल मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितलं आहे.
लष्कराच्या शौर्याचं राजकारण नको - राहुल गांधी
या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी लष्कराच्या शौर्याचं भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ल्याचा सर्वपक्षीय बैठकीत निषेध करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय लष्कराने दिलेलं प्रत्युत्तर अतुलनीय शौर्याचं प्रतीक आहे. बुधवारी पाकिस्तानच्या आक्रमणाला उत्तर देताना आपला एक वैमानिक बेपत्ता झाला आहे. आपला वैमानिक सुखरुप परतेल अशी खात्री आहे. या अवघड काळात भारतीय लष्कराच्या आम्ही भक्कमपणे पाठिशी आहोत. पुलवामा हल्ल्यात आपल्या सैनिकांनी जीव गमावले. त्यांच्या शौर्याचा, बलिदानाचा राजकारणासाठी उपयोग करून घेणं दुर्देवी आहे. त्याप्रती बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भारतीय वायू सेनेनं दाखवलेलं धाडस सर्वोच्च दर्जाचं आहे."
इम्रान खान यांचा चर्चेचा प्रस्ताव
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात भारता समोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.
ते म्हणाले "आज मी भारताशी बोलणार आहे. आता आपण विचार करून कृती करायला हवी. पहिलं महायुद्ध काही महिन्यांत संपेल असं वाटलं होतं, पण ते अनेक वर्षं चाललं. अमेरिकेला वाटलं नव्हतं की दहशतवादाविरोधातला लढा 17 वर्षं चालेल. मी भारताला म्हणतो की वेळेची अशी गणितं चुकली तर आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल. युद्ध सुरू झालं तर ते थांबवणं माझ्या हातात नसेल आणि मोदींच्याही हातात नसेल. पुलवामानंतर जर भारताला दहशतवादावर चर्चा करायची असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत."
शांततेचा प्रस्ताव
"आज आम्ही स्वसंरक्षणात हल्ले केले आहेत. जर आमच्यावर युद्ध लादलं गेलं तर तो आमचा नाइलाज असेल," असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका पत्रकार परिषदेत म्हणत भारतपुढे शांततेचा प्रस्ताव मांडला आहे.
"जंग मे किसी की जीत नही होती किसी की हार नही होती सिर्फ इंसानियत की हार होती है. आम्हाला युद्ध नकोय. दोन्हीकडच्या लोकांना शांततेत जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांच्या वतीने शांततेने चर्चेचा प्रस्ताव भारतापुढे मांडत आहोत. युद्ध झालं तर फक्त दोन देशच नाही तर या संपूर्ण भागात आणि जगभरात परिणाम होतील. त्यावर ते कसा विचार करतात यावर पुढची वाटचाल अवलंबून आहे," असं त्यांनी संगितलं.
'...तर भारताला मोठी किंमत मोजावी लागेल' - तालिबान
भारत-पाकिस्तानमधल्या वाढत्या संघर्षाची मोठी किंमत भारताला मोजावी लागू शकते, असा इशारा तालिबानच्या प्रवक्त्यांनी दिला आहे.
"भारताने पाकिस्तानात हिंसाचार वाढवला तर त्यामुळे अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि एकंदरच या भागातील शांतता धोक्यात येऊ शकते. असा संघर्ष रेटून धरण्याची मोठी किंमत भारताला मोजावी लागू शकते," असं तालिबानचे प्रवक्ते झबिउल्लाह मुजाहिद यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
अफगाणिस्तानात 17 वर्षं चाललेलं युद्ध संपुष्टात आणण्यासाठी सध्या आम्ही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर शांतता चर्चा करत आहोत, असंही तालिबानने म्हटलं आहे.
पाकिस्ताननेही केली विमानतळं बंद
दरम्यान, पाकिस्ताननेही लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद विमानतळांवरची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत.
दरम्यान, एअर विस्तारा आपल्या श्रीनगर, लेह आणि जम्मूला जाणाऱ्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत तर गो एअरने काही काळासाठी उड्डाणं स्थगित केली आहेत..
भारताने केली काही विमानतळं बंद
मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात झालेल्या अपघातानंतर श्रीनगर, लेह आणि जम्मूसह पाच विमानतळांवरून प्रवासी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या श्रीनगरस्थित एका अधिकाऱ्याने PTI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पण ही आपत्कालीन परिस्थिती नेमकी काय, हे त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही. पण बडगाम जिल्ह्यातील अपघातानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
श्रीनगर, लेह आणि जम्मू विमानतळांवरील काही विमानं त्यांच्या उड्डाणाच्या ठिकाणी वळवण्यात आली आहे, असंही या अधिकाऱ्यांनी सागितलं.
याशिवाय, चंदिगड आणि अमृतसर विमानतळंसुद्धा बंद करण्यात आल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. पण चंदिगढ विमानतळावर "सध्या तरी वाहतूक सुरळीत" असल्याची माहिती बीबीसी पंजाबीला मिळाली आहे.
भारतीय विमानाला मध्य काश्मीरमध्ये अपघात
दरम्यान, मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात एका भारतीय विमानाचा आपघात झालेला आहे. यात दोन पायलट्सचा मृत्यू झाला आहे.
गारेंड कलान गावात सकाळी 10.05 वाजता हा अपघात झाल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
या लढाऊ जेटचे दोन तुकडे झाले आणि त्याने पेट घेतला, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
'पाकिस्तानने पाडली दोन भारतीय विमानं'
"पाकिस्तानी एअर फोर्सने आज सकाळी केलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषेचं (LoC) उल्लंघन केलं. पाकिस्तानी वायुदलाने पाकिस्तानी हवाईक्षेत्रात दोन भारतीय लढाऊ विमानं पाडली आहेत.
"त्यातलं एक विमान आझाद जम्मू-काश्मीरमध्ये (पाकिस्तान प्रशासित काश्मीर) पडलं तर दुसरं भारतीय काश्मीरमध्ये पडलं. एका भारतीय पायलटला अटक करण्यात आली आहे," असं पाकिस्तानी सुरक्षा दलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)