IAF कारवाई : मोदी पुन्हा निवडून यावेत ही पाकिस्तानी लष्कराची इच्छा- क्रिस्टीन फायर

व

भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधल्या बालाकोट इथं हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त झाला, असं भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितलं. या हल्ल्यात 'अनेक अतिरेकी मारले गेले' असंही ते म्हणाले.

या हल्ल्याच्या परिणामांबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. पुलवामा इथं CRPF च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या या कारवाईचं विश्लेषण दक्षिण आशियासंबंधीच्या सुरक्षा विशेषज्ञ प्रोफेसर क्रिस्टीन फेअर यांनीही केलं आहे.

क्रिस्टीन फायर यांच्या मते या हल्ल्याचा थेट संबंध हा निवडणुकांशी आहे. या कारवाईनंतर मोदी पुन्हा निवडून आले तर त्याचा फायदा पाकिस्तानला होईल, असं मतही क्रिस्टीन यांनी व्यक्त केलं आहे.

line

क्रिस्टीन फायर यांचं विश्लेषण सविस्तर वाचा.

मी सातत्यानं हे सांगत आहे, की हल्ल्यांचा संबंध भारतामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांशी आहे. भारतात हल्ले होतच असतात. पुलवामा इथला हल्ला वेगळा होता. अतिशय नियोजनबद्धपणे हल्ल्याची आखणी करण्यात आली होती.

पुलवामा हल्ल्यात जवानांना लक्ष्य करण्यात आलं होतं. ही गोष्ट लोकांना प्रक्षोभित करणारी होती. कारण भारतीय लोक आपलं लष्कर आणि जवानांबद्दल खूप भावूक असतात.

पुलवामा हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकन लोकांचा स्वभाव याच्या एकदम विरूद्ध आहे. अमेरिकेत जेव्हा सामान्य लोकांना प्राण गमवावे लागतात, तेव्हा नागरिकांचा संताप होतो. जेव्हा सैनिक मृत्यूमुखी पडतात, तेव्हा भारतीय संतप्त होतात.

पुलवामामध्ये CRPFच्या जवानांना लक्ष्य करण्यात आलं होतं. हे भारताचं निमलष्करी दल आहे. अतिशय कमी निधीमध्ये चालविल्या जाणाऱ्या सुरक्षा दलांमध्ये CRPF चा समावेश होतो. या जवानांवर झालेला हल्ला निश्चितच निषेधार्ह होता.

जैश-ए-मोहम्मदनं 2000 नंतर कोणताही आत्मघातकी हल्ला केला नव्हता. 19 वर्षांनंतर हा हल्ला करण्यात आला असून त्याचा उद्देशच जनभावना भडकवण्याचा होता. हल्ल्याची वेळही खूप विचारपूर्वक निवडण्यात आली होती. यामुळेच हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रियांचा ओघ पहायला मिळाला.

मोदींच्या विजयाचा पाकिस्तानला फायदा

खरंतर भारतातील निवडणुकांमध्ये मोदींचा विजय झाल्यानं सर्वाधिक फायदा हा पाकिस्तानी 'डीप स्टेट'ला होणार आहे. भारतीयांना ही गोष्ट रुचणारी नसेल.

पण या गोष्टीत तथ्य आहे. पाकिस्तानमध्ये सध्या अनेक अंतर्गत दबाव आहेत. सर्वांत मोठी समस्या ही पश्तून आंदोलनाची आहे. पाकिस्तानच्या एकात्मतेसाठी हे आंदोलन धोकादायक आहे. मजबूत, एकसंध भारताकडून असलेल्या धोक्याचा बागुलबुवा पाकिस्तानला बांधून ठेवतो.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर काही कट्टरपंथीय मारले गेल्यानं त्यांच्या लष्करी अजेंड्यावर काहीच परिणाम होत नाही. मात्र भारतामध्ये नरेंद्र मोदींचा विजय सुनिश्चित करण्यासाठी हल्ला करणं पाकिस्तानच्या गरजांशी अगदीच सुसंगत आहे.

भाजपच्या विजयानंतर 'हिंदू अंध-राष्ट्रवादी भारतामध्ये मुसलमान धोक्यात आहेत' ही भीती निर्माण करणं पाकिस्तानला शक्य आहे. अशी भीती काँग्रेसच्या विजयानंतर निर्माण होऊ शकत नाही.

हल्ल्याची वेळ आणि पद्धत ही लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींचा विजय सुनिश्चित व्हावा यासाठी अनुकूल होती. ही गोष्ट मी वारंवार जोर देऊन सांगत आहे. या हल्ल्यापूर्वी लोकसभा निवडणुकांचा निकाल काय असेल याचं चित्र बदललं होतं. मात्र आता मोदींचं जिंकणं जवळपास निश्चित आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचीही हीच इच्छा आहे.

पाकिस्तानला धास्ती वाटेल असा मजबूत भारत हा पाकिस्तानी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतो आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या पाठिशी उभं रहायला भाग पाडतो. पाकिस्तानी लष्कर भलेही पश्तून आंदोलकांना मारण्यासारखी अतिशय निंदनीय कृत्य करत असली, तरी अशावेळी त्याचा विसर पडतो.

मोदी यांच्या विजयानं पाकिस्तानी 'डीप स्टेट'ला फायदा होईल, या वाक्याचा गैरअर्थही मुळीच लावला जाऊ नये. या हल्ल्याशी मोदी यांचा संबंध होता, असं या विधानातून अजिबात म्हणायचं नाहीये. मोदींचा विजय ही पाकिस्तानी सैन्याची गरज आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. कारण त्यामुळे पाकिस्तानी लष्कर पश्तून आणि बलुचींवर केलेल्या अत्याचारांवर पांघरूण घालू शकतं.

पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देणार का?

हवाई हल्ल्यानंतर भारतानं आपल्या हद्दीत प्रवेश केल्याचं पाकिस्ताननं मान्य केलं आहे. मात्र हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याचं वृत्त पाकिस्ताननं नाकारलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

भारताच्या हल्ल्याला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जाईल, असं पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व तसंच लष्करानं म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्करावर भारताविरुद्ध कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे. मात्र प्रत्यक्षात पाकिस्तान भारताविरूद्ध कोणताही हल्ला करू शकतो का, हा खरा प्रश्न आहे.

पाकिस्तान कारवाई करू शकणार नाही

आम्ही भारताच्या हल्ल्याला ताबतोब उत्तर दिलं आणि भारतीय विमानांना हुसकावून लावलं, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. पळ काढताना भारतीय विमानांनी स्फोटकं टाकली, असंही पाकिस्तानकडून सांगण्यात आलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

जेवढा धाडसी हल्ला केल्याचा दावा भारत करत आहे, तेवढं धाडसी उत्तर भारताला देण्याची गरज नाहीये, असं पाकिस्तानच्या विधानांचा अर्थ असा लावता येईल.

भारतानं स्पष्टपणे सांगितलं आहे, की 12 मिराज विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बॉम्ब हल्ला केला. हा खरंच खूप धाडसी हल्ला होता आणि पाकिस्तानी वायुसेनेकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये. हीच त्यांची मुख्य समस्या आहे.

पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव

पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल कारवाई केली, तर त्यांना फायदा होऊ शकतो. मात्र माझ्या मते पाकिस्तान वातावरण थंड होऊ देईल. कारण पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावही अधिक आहे.

भारतानं काय केलं आणि काय नाही केलं, याबद्दल आमच्याकडे पूर्ण माहिती नाहीये. मात्र पाकिस्तान भारतानं जे काही केलं, त्याची तीव्रता कमी करून सांगत आहे. पाकिस्ताननं असं करणं हा सकारात्मक संकेत आहे.

युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देश पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल कारवाई न करण्यासाठी दबाव टाकत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानचे कान टोचले आहेत. पाकिस्ताननं सध्या कोणत्याही युद्धात गुंतू नये, अशी चीनची देखील इच्छा आहे.

पाकिस्तानी सैन्याचे जवान

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, LOC जवळ तैनात असलेले पाकिस्तानी सैन्याचे जवान

अशापरिस्थितीत पाकिस्तान कोणतीही मोठी कारवाई करेल, असं मला अजिबात वाटत नाही. मात्र याबाबत खात्रीलायकदृष्ट्या काही सांगता येत नाही. कारण सर्व घटनाक्रमाला आता कुठे सुरूवात झाली आहे.

पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा नियंत्रण रेषेजवळ केलेला हल्ला नाही, तर नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात जाऊन केलेला हल्ला आहे. अशापरिस्थितीत प्रत्युत्तर देणं आवश्यक वाटलं तर पाकिस्तान नियंत्रण रेषेच्या आसपास काश्मिरमध्ये कारवाई करू शकतं. काही वर्षांपूर्वी उत्तर आंतरराष्ट्रीय सीमा रेषेजवळ पाकिस्ताननं स्फोट घडवला होता.

जेव्हा बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेनं कारवाई केली होती, तेव्हा अनेक हेलिकॉप्टर पाकिस्तानी क्षेत्रात घुसली होती. तेव्हा पाकिस्तानी वायुसेनेनं कोणतीही कारवाई केली नव्हती. म्हणजेच जे झालं, ते आपण यापूर्वीही पाहिलं आहे.

इथे ज्या समस्या आहेत, त्यावरून लोकांमध्ये अनेकदा गैरसमजही पसरवले जातात. भारताकडे मोठं सैन्य आहे. मात्र लढाई कुठे लढली जात आहे, यावरही भारतीय लष्कराच्या क्षमता अवलंबून आहेत. म्हणजेच युद्ध नियंत्रण रेषेवरही होऊ शकतं किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरही होऊ शकतं.

संख्याबळाचा विचार करता दोन्ही देशांच्या क्षमतांमध्ये फरक दिसतो. मात्र भारत आणि पाकिस्तानचं सैन्य जेव्हा नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर उभं ठाकतं, तेव्हा त्यांच्या क्षमतांमध्ये फारसा फरक नसतो.

भारतीय जवान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय जवान

दीर्घकालीन युद्ध झाल्यास भारत पूर्ण क्षमतेनुसार आपल्या सैन्याचा वापर करू शकतो. देशातील वेगवेगळ्या भागात सीमारेषेवर सैन्य तैनात केलं जाऊ शकतं. माझं तरी हेच आकलन आहे. मला वाटतं, की अनेक अमेरिकन विश्लेषकंही असाच विचार करत असतील. एखादं छोटं युद्ध झाल्यास पाकिस्तान किंवा भारताकडे निर्णायक विजय मिळवण्याची क्षमता नाहीये.

भारतानं आपल्या सैन्याचं मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. भारताकडे मोठं सैन्य आहे. पण पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा भारतीय सैन्याच्या तुकड्यांच्या हालचालींची माहिती मिळू शकते.

माझं म्हणणं आहे, की छोट्या युद्धामध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांवर निर्णायक विजय मिळवू शकणार नाहीत. आणि आंतरराष्ट्रीय समुदाय या दोन्ही देशांमध्ये दीर्घकालिन युद्ध होऊ देणार नाही. कारण दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. त्यांच्यात दीर्घकालिन युद्ध होणं निश्चितच परवडणारं नाही.

(प्राध्यापक क्रिस्टीन फायर यांच्याशी बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी संवाद साधला)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)