जैशचं प्रशिक्षण केंद्र चालवणारा युसुफ अझर आहे तरी कोण?

फोटो स्रोत, AFP
युसुफ अझरविषयी माहिती सार्वजनिकपणे सहज उपलब्ध नाही. मात्र एका घटनेसंदर्भात युसुफ अझरविषयी स्पष्ट उल्लेख आहे.
कट्टरतावादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा युसुफ हा मेव्हणा. युसुफ अझर उर्फ उस्ताद घोरी हा पाकिस्तानमधल्या खैबर पख्तनुवा प्रांतातील बालाकोटमध्ये जैशचं सगळ्यांत मोठं प्रशिक्षण केंद्र चालवत होता.
डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स एअरबस IC-814 या काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं अपहरण करण्यात आलं. काठमांडूहून निघालेलं हे विमान भारतीय हवाई क्षेत्रात आल्यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं. अनेक ठिकाणी हे विमान नेण्यात आलं आणि शेवटी अफगाणिस्तानमधल्या कंदाहारमध्ये नेण्यात आलं.
मौलाना युसुफ अझर हा विमान अपहरण करणाऱ्यांपैकी एक होता. कट्टरतावाद्यांनी भारत सरकारवर मसूद अझर आणि अन्य दोन दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी दबाव आणला. सात दिवसांच्या वाटाघाटीनंतर भारत सरकारनं मसूद अझर आणि अन्य दोन कट्टरतावाद्यांची सुटका केली.
कंदाहार विमान अपहरणप्रकरणी भारतीय न्यायालयाने सात फरारी आरोपींना गुन्हेगार ठरवलं होतं. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. अगरवाल यांनी याप्रकरणातील इब्राहिम अख्तर, शकील, अबुल रौफ, युसुफ अझर, सनी अहमद काझी, जाहूर इब्राहिम मिस्त्री आणि शाहीद सय्यद अख्तर यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं. सुनावणीवेळी अबुल लतीफ, युसुफ आणि दलीप भुजल न्यायालयात उपस्थित होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
2000 साली भारत सरकारने पाच अपहरणकर्त्यांच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानकडे औपचारिक विनंती केली होती. याच वर्षी इंटरपोलने युसुफविरोधात नोटीस जारी केली होती.
युसुफचा जन्म कराचीमध्ये झाला आहे. युसुफला उर्दू आणि हिंदी या भाषा येतात. मसूदच्या साथीने युसुफ हे एकत्रपणे जैशचं काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"जैश-ए-मोहम्मद ही संघटना देशभरात आत्मघातकी हल्ले करणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे ही कारवाई करणं आवश्यक होतं," असं भारतीय परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणालेत. "ही कारवाई लष्करी स्वरूपाची नव्हती तर प्रतिबंध स्वरूपाची होती," असं ते म्हणाले.
हा तळ एका उंच टेकडीवर होता. तसेच या कारवाईत कोणीही सामान्य नागरिक मारले गेलेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.
"14 फेब्रुवारीला पुलवामात झालेला हल्ला जैश ए मोहम्मदने घडवला होता, तसंच 2001मध्ये संसदेवर झालेला हल्ला आणि पठाणकोट इथल्या हवाई तळावर 2016ला झालेला यातही जैशचा हात होता. ही माहिती वारंवार पाकिस्तानला देऊन जैश ए मोहम्मदवर कारवाई करावी, असं बजावलं होतं. पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने भारताने ही कारवाई केली," असं त्यांनी सांगितलं.
"पाकिस्तानात जैशचे तळ कुठं आहेत, ही माहितीही दिली होती. पण पाकिस्तानने त्यांच्या देशातील 'दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर' संपवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. भारताला जैश ए मोहम्मद भारतात आणखी जिहादी हल्ले करणार असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली होती," असं ते म्हणाले.
बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ला केला तेव्हा युसुफ अझर तिथं नव्हता असं जैश ए मोहम्मदच्या सूत्रांनी सांगितलं.
40वर्षीय अझरचं लग्न जैशचा संस्थापक मौलाना मसूद अझरच्या छोट्या बहिणीशी झालं आहे. मसूद अझरप्रमाणे युसुफही पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूरचा आहे.
युसुफ अझर हे त्याचं कोड नेम म्हणजेच कामासाठी निवडलेलं नाव आहे. या नावाने त्याचे आणि मसूदचे घट्ट संबंध प्रस्थापित होतात. त्याचं खरं मूळ नाव माहिती नाही.
युसुफ सुरक्षित असल्याचा दावा जैशच्या सूत्रांनी केला आहे. याच सूत्रांच्या मते भारतीय वायू सेनेने केलेल्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा एकही कट्टरतावादी मारला गेलेला नाही. याच सूत्रांच्या मते, या भागात कोणतंही प्रशिक्षण केंद्र सुरू नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








