राज ठाकरे यांना सोबत घेण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमधले मतभेद उघड

13 फेब्रुवारीच्या संध्याकाळी दोन अशा नेत्यांची भेट झाली, ज्यांनी तोवर एकमेकांवर फक्त टीकाच केली होती. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार. ही भेट गुपचूप झाली.

पण भेटीची कुणकुण माध्यमांना लागताच अजित पवारांनी भेट झाल्याचं कबूल केलं. ते म्हणाले होते, "राज ठाकरे यांचा केंद्रातल्या सरकारला विरोध आहे, म्हणून आम्ही भेटून चर्चा केली."

त्यानंतर त्यांनी मनसेला आघाडीत घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठवला. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपवर टीका करताना राज ठाकरेंनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राहुल गांधींची स्तुती केली होती. त्यामुळे काँग्रेस मनसेला अनुकूल असेल, अशी शक्यता होती.

त्यात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाऊन हिंदीत भाषणही केलं होतं. ज्या उत्तर भारतीयांना इतकी वर्षं मनसेने बडलवं होतं, त्यांच्यासमोर भाषण करून राज ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न केला होता. एक म्हणजे स्वतःची प्रतिमा मवाळ करण्याचा. आणि दुसरं म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी 'सुटेबल' मित्रपक्ष होण्याचा.

पण एवढं सगळं करूनही अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आता जाहीर केलं आहे की मनसेला आघाडीत स्थान मिळू शकत नाही.

काँग्रेसला विरोध करत स्थापन झालेल्या तेलुगू देसमसोबत काँग्रेसने तेलंगणाची निवडणूक लढवली होती, पण मनसेसोबत जाणं कदापि शक्य नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

'मनसे गुंडांचा पक्ष'

बीबीसी मराठीशी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले, "मनसे आणि आमची विचारधारा वेगवेगळी आहे. आघाडी समविचारी पक्षांसोबत करायची असते. मनसे तर गुंड प्रवृत्तीच्या आणि घटनेवर विश्वास नसलेल्या लोकांचा पक्ष आहे. ते भाषा आणि प्रांतवादाचं राजकारण करतात."

पण जर राष्ट्रवादीने आपल्या वाट्यातून मनसेसाठी जागा सोडल्या तर काँग्रेस काय करेल?

"आम्हाला विशास आहे की राष्ट्रवादी असं काही करणार नाही," असं संजय निरुपम म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतं की निरुपम यांच्या कडक विरोधामुळेच काँग्रेस मनसेला नाकारत आहे. पण मनसेला सोबत घेतल्याशिवाय मुंबईत आघाडीला बळ मिळणार नाही, असं राष्ट्रवादीला वाटतं.

काँग्रेसने प्रस्ताव धुडकवल्यानंतरही राष्ट्रवादी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. "मनसेला आघाडीत घेणं फायदेशीर आहे, असं आम्हाला वाटतं. त्यांना सोबत घ्यायला हवं. काँग्रेसला नेमकी काय अडचण आहे ती आम्ही समजून घेऊन आणि त्यांच्यासोबत या विषयावर पुन्हा चर्चा करू," असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक बीबीसी मराठीला म्हणाले.

मग राष्ट्रवादी स्वतःच्या वाटच्या जागांमधून मनसेला जागा सोडणार का?

"तिथपर्यंत अजून चर्चा पोहोचली नाहीये," असं सूचक उत्तर नवाब मलिक यांनी दिलं.

'...इतकी वाईट वेळ मनसेवर आली नाही'

काँग्रेसने आघाडीचा प्रस्ताव नाकारला, यावर आम्ही मनसेची प्रतिक्रिया जाणून घेतली.

"पहिली गोष्ट तर संजय निरुपमकडून संविधान शिकण्याची गरज आम्हाला नाही. संविधान हे एका मराठी माणसानं लिहिलं आहे. निरुपमने आम्हाला संविधान शिकवावं, इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. दुसरी गोष्ट आम्ही काँग्रेसकडे आम्हाला आघाडीत घ्या असं म्हणायला गेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही बोलावं एवढी निरुपम यांची लायकीच नाही," असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

मग राष्ट्रवादीबरोबर तुम्ही जाणार आहात का, असं विचारल्यावर ते म्हणाले, "राष्ट्रवादीबरोर आघाडी होईल किंवा नाही याचा निर्णय राज ठाकरे स्वतः घेतील."

राज ठाकरे यांच्या कार्टूनमध्ये राहुल गांधी यांची स्तुती अनेकदा करण्यात आली आहे. पण तरीही काँग्रेसने नकार दिल, याकडे लक्ष वेधलं असता संदीप देशपांडे थेट भाष्य करणं टाळलं. "आमचा लढा मोदींविरोधात आहे. राज साहेबांनी मोदीमुक्त भारताची घोषणा दिली होती. या लढाईत ज्यांना सहभागी व्हायचं आहे, त्यांनी व्हावं," असं ते म्हणाले.

राज ठाकरेंनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या व्यंगचित्रांमधून मोदींवर टीका करताना राहुल गांधींना हिरो म्हणून दाखवलं होतं. ती व्यंगचित्रं तुम्ही या बातमीत पाहू शकता: राहुल गांधींना हिरो दाखवून राज ठाकरे काँग्रेसच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहेत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)