राहुल गांधींना हिरो दाखवून राज ठाकरे काँग्रेसच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहेत का?

राज ठाकरेंनी कर्नाटक विधानसभेच्या निकालांवर नवं कार्टून प्रसिद्ध केलं आणि ते पाहता पाहता हजारोंनी शेअर केलं. भाजपकडून राहुल गांधींनी विजयश्री खेचून आणली, असं व्यंगचित्र काढताना त्यांनी राहुल गांधींना सकारात्मक आणि अमित शहांना नकारात्मक उजेडात दाखवलं आहे.

काँग्रेसविरोधी राजकारण करणाऱ्या शिवसेनेत राज ठाकरे लहानाचे मोठे झाले. एके काळी नरेंद्र मोदींचं गुणगान करणारे राज आता राहुल गांधींना हिरोच्या भूमिकेत दाखवत आहेत. हा त्यांनी घेतलेला यूटर्न आहे का?

"कर्नाटकच्या निवडणुकीनंतर राहुल गांधींची इमेज जायंट किलर ठरली आहे. ज्या पद्धतीनं कुमारस्वामी यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यावरून हे दिसतं की प्रादेशिक पक्ष हे अमित शाह आणि नरेंद्र मोदींबाबत काय विचार करतात. चंद्राबाबूंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनाच शहा-मोदींच्या राजकारणाचा प्रत्यय आला आहे. त्यामुळेच छोट्या पक्षांना आता राहुल गांधी जवळचे वाटत आहेत," असं सकाळ टाइम्सचे संपादक रोहित चंदावरकर म्हणतात.

2014 सालच्या निवडणुकीत भाजपला दणदणीत बहुमत मिळालं आणि त्यानंतर भाजपच्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. तेव्हापासून राज ठाकरेंनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली.

गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पहिल्यांदा राहुल गांधींना मोदी-शाहांपेक्षा मोठं दाखवलं. काँग्रेसचा पराभव झाला असला तरी राहुल गांधींचा विजय झाला आहे, अशा आशयाचं व्यंगचित्र त्यांनी काढलं.

पण राहुल गांधींची व्यंगचित्रातून स्तुती केली म्हणजे मनसे ताबडतोब काँग्रेसच्या जवळ जाईल, असा अर्थ काढता येणार नाही.

मनसे नेत्या शालिनी ठाकरे म्हणतात, "विषय राहुल गांधींना हिरो बनवण्याचा नाहीये, राज ठाकरे यांनी मोदीमुक्त भारताचं आवाहन केलं आहे, तर त्यासाठी समोर पक्ष कुठला आहे तर तो काँग्रेस आहे. आजच्या घडीला मनसे कोणाबरोबच नाही. मोदीमुक्त भारतसाठी सगळे पक्ष एकत्र येण्यासाठी तयार असतील आम्ही त्या आघाडीत जाऊ, पण आमचे नेते राज ठाकरेच आहेत."

मनसे मित्राच्या शोधात?

आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. लोकसभेला अनामत जप्त होण्याची नामुष्की मनसे उमेदवारांवर ओढावली. तर विधानसभेला कसाबसा एक आमदार जुन्नरमधून शरद सोनावणेंच्या रूपाने निवडून आला.

राज यांना मित्रपक्षाची गरज लागेल हे नक्की, त्यामुळे काँग्रेस त्यांचा वापर करू शकेल, अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली होती.

"राज यांचं हे भाष्य हे भेदक आणि मार्मिक आहे. मात्र ते तात्कालिक आहे. त्यावरून ते काँग्रेसच्या जवळ जात आहेत, असं म्हणता येणार नाही. शिवाय, हे व्यंगचित्र म्हणजे त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असंही मानता येणार नाही."

पण मनसे भाजप-विरोधी आघाडीत सामील होण्यासाठी तयार असली, तरी काँग्रेसला मनसे सोबत आलेली चालणार आहे का?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणतात, "काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत अजिबात जाणार नाही. कारण मनसे हा पक्ष भारताच्या संविधानावर विश्वास ठेवत नाही. २०१४मध्ये हेच मोदी-मोदी करत होते. पण आज पक्ष संपत आल्यावर ते काँग्रेसशी जवळीक करू पाहत आहेत. हा पक्ष केवळ द्वेष पसरवणारा पक्ष आहे. यांना जर आमचे नेते राहुल गांधी यांचं कौतुक करायचं असेल, तर ते त्यांनी खुशाल करावं. आमची काहीच हरकत नाही. पण त्यांच्याशी युती कधीच होणार नाही."

इंदिरा आणि राहुल

व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी म्हणतात की राज यांच्या व्यंगचित्रांवर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे. "बाळसाहेब ठाकरे यांना व्यंगचित्र काढताना आणि राजकारण करताना राज यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्यांना व्यंगचित्रांचं 'बाळ'कडू मिळालं आहे."

विशेष म्हणजे बाळ ठाकरेंचे 'फटकारे' नेहमी इंदिरा गांधींवर टीका करायचे. आणि आता बाळ ठाकरेंचे पुतणे इंदिरा गांधींच्या नातवाची स्तुती करणारी व्यंगचित्र काढत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)