You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना-भाजप युतीत वाद: अडीच वर्षं मुख्यमंत्री सेनेचा, नाहीतर युती तुटणार - रामदास कदम
- Author, अमृता कदम, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
युती जाहीर होऊन दोन दिवसही उलटत नाही तर युती तोडण्याची भाषा शिवसेनेने केली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे की शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद नाही मिळालं तर शिवसेना युती तोडू शकते.
भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर टीका करताना ते बोलत होते. 'ज्याचे आमदार जास्त, त्याचा मुख्यमंत्री,' अशा आशयाचं चंद्रकांत पाटील यांचं विधान प्रसिद्ध झाल्यानंतर कदम बोलत होते.
कदम म्हणाले, "यापूर्वी पाडापाडीचे प्रयत्न झाले आहेत. एकदुसऱ्याचे आमदार कमी करण्याचं काम झालं आहे. युतीमध्ये पवित्रता ठेवायची असेल, तर सत्तेमध्ये अडीच अडीच वर्षं देऊन समान वाटपाचं हे सूत्र ठेवावं, असं उद्धव साहेब म्हणाले. हे शाह साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं असताना देखील चंद्रकांत पाटील वेगळी विधानं करत आहेत. त्यांना युती मान्य नसेल तर युती तोडायला शिवसेना तयार आहे. आम्हाला कुठली अडचण नाही. उद्धवजींनी जो प्रस्ताव मांडला आणि जे ठरलंय त्यावर ते कायम असले तरच आमची तयारी आहे."
पुढे ते म्हणाले की "गोष्टी ठरल्यानंतर 18 तासांनी रिव्हर्स घ्यायचं हे योग्य नाही. चंद्रकांत दादांनी मुख्यमंत्री आणि शाह साहेबांसोबत बोलावं आणि पुन्हा स्टेटमेंट करावं."
या प्रकरणी बीबीसी मराठीने चंद्रकांत पाटलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. कॅबिनेटच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं.
आम्ही भाजप नेते आशिष शेलार यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. या विषयावर चंद्रकांत पाटीलच बोलू शकतील, असं ते म्हणाले.
उद्धव यांचा व्हीडिओ व्हायरल
मंगळवारी शिवसेना कार्यकर्त्यांशी अनौपचारिक संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासंबंधी वक्तव्यं केलं. "लोकसभेसाठी गेल्या वेळेस आपण २२ जागा लढवल्या होत्या. यावेळेस एक जागा जास्त मिळाली आहे. मुख्यमंत्री समान अधिकार आणि जबाबदारीबद्दलही बोलले. याचा अर्थ काय? 25 वर्षांपासून ज्याच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री असंच सूत्र होतं. यावेळेस मी हे मान्य केलेलं नाही. म्हणजेच मुख्यमंत्रिपदाचं जे आपलं स्वप्न आहे, ते आपण पूर्ण करू शकतो," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'द इंडियन एक्सप्रेस' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचं पारडं हे शिवसेनेच्या बाजूनं जड असल्याचं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, हा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. या मुलाखतीत राऊत यांनी म्हटलं, "2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 123 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेनं 63. मात्र तरीही भाजपनं शिवसेनेला समान जागा देण्याचं मान्य केलं. त्याखेरीज शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याबद्दलही भाजप सकारात्मक आहे."
युतीचं सरकार आल्यास सेना पूर्ण टर्म स्वतःकडेच मुख्यमंत्रिपद ठेवणार का, या प्रश्नावर उत्तर देताना "ते आम्ही पाहू. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे मी सांगू शकतो" असं विधान केलं.
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला
भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती असल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
अभय देशपांडे म्हणाले, "ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र युतीमध्ये आजतागायत पाळलं गेलंय. 2009ला सत्ता आली नसली, तरी भाजपच्या जागा वाढल्या होत्या. तेव्हा विरोधी पक्षनेतेपद हे भाजपला देण्यात आलं होतं. यावेळेस मात्र मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला वापरला जाईल. ज्यांच्या जागा जास्त येतील, त्यांना मुख्यमंत्रिपदाचा मान पहिल्यांदा मिळेल, असंही बैठकीत ठरल्याची माहिती मिळत आहे."
पण मुख्यमंत्रिपदाबद्दल भूमिका शिवसेना-भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली नाही. तसंच भाजपला हा फॉर्म्युला मान्य आहे, असं भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे म्हटलं नाहीये.
जर संयुक्त पत्रकार परिषदेत हा विषय टाळला तर त्यानंतर शिवसेना एकटीच या विषयावर का बोलत आहे? यावर अभय देशपांडे म्हणतात, "भाजपवर एवढी टीका केल्यानंतर आपण का आणि कशासाठी तडजोड केली याचं कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. तसंच समान जागावाटप या सूत्रामुळे भाजपच्या मतदारसंघातही शिवसेनेच्या उत्सुक उमेदवारांची संख्या वाढू शकते. अशा वेळी कोणी नाराज होऊ नये म्हणून आपल्याला कोणता मोठा लाभ होणार आहे, याची कल्पना कार्यकर्त्यांना देणं पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना आवश्यक वाटू शकतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)