You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना-भाजप युतीची आज घोषणा, संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री सेनेचाच
या बातमीचे ताजे अपडेट्स तुम्ही इथे वाचू शकता -शिवसेना-भाजप युतीची घोषणा LIVE UPDATES
'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशा स्थितीत साडेचार वर्षांहून अधिक काळ काढल्यानंतर शिवसेना-भाजपा युतीचे भविष्य आज स्पष्ट होणार आहे. संध्याकाळी साडे 6 वाजता मुंबईत युतीची घोषणा होणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत.
संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर वरळीत पत्रकार परिषदेत युतीची आणि जागावाटपाची घोषणा केली जाईल.
याआधी पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल. त्यामुळे लोकसभेसोबत विधानसभेच्याही युतीबद्दल आज घोषणा होण्याची शक्यता आहे. जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असल्याचंही राऊत म्हणाले. याविषयी भाजप नेते आशिष शेलार यांनी बोलण्याचं टाळलं. दोन्ही पक्षांचे प्रमुख मिळूनच घोषणा करतील, असं शेलार म्हणाले.
2014 लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 22 जागा, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. 2019 साली युतीचा कोणता फॉर्म्युला जाहीर होणार तसेच दोघांपैकी मोठा भाऊ कोण होणार आणि लहान भाऊ कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
'शिवसेना चोरावर मोर'
युतीची घोषणा होणार, असे संकेत मिळताच विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की "उद्धव ठाकरे म्हणतात चौकीदार चोर है. तर युती करणारी शिवसेना चोरावर मोर आहे. भाजप सैनिकांच्या टाळूवरचं लोणी खाते असं शिवसेना म्हणते, मग 14 तारखेला मुख्यमंत्र्यांशी जागावाटपाची चर्चा करताना शिवसेना कुणाच्या टाळूवरचं लोणी खात होती?" असा सवाल मलिक यांनी केला.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की "भ्रष्टाचारी आणि लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती तथाकथित अफजल खान आणि उंदीर जाहीर करतील. पहारेकरी चोर आहे ही बोंब केवळ चोरीतील वाट्याकरिता होती."
शिवसेनेचं ऐतिहासिक घूमजाव
शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष केंद्र आणि महाराष्ट्र राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत असले तरी या कार्यकाळामध्ये भाजपावर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेने सोडली नाही.
त्याचप्रमाणे अधूनमधून स्वबळाच्या घोषणाही होत राहिल्या. त्यामुळेच युतीचे भविष्य येत्या निवडणुकीत काय असेल याची चर्चा सुरू झाली.
2014च्या विधानसभा निवडणुकीत 25 वर्षांची युती तोडून दोन्ही पक्षांनी विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राष्ट्रवादीने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर भाजपानं सरकारही स्थापन केलं होतं.
काही काळ विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतर शिवसेनेने भाजपाबरोबर पुन्हा युती करत सत्तेत भागीदार होण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन्ही पक्षांचे संबंध पूर्ववत राहिले नाहीत. मुंबई महापालिका आणि पालघर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत युतीमधील मतभेद पुन्हा उफाळून आले आणि या पक्षांनी वेगवेगळे उमेदवार रिंगणात आणले होते.
14 फेब्रुवारी रोजी विदर्भ दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत येत 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांनी युतीवर चर्चा केल्यामुळे लवकरच युतीच्या जागावाटपाचा निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता दिसत होती. या चर्चेमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही सहभाग घेतला होता.
स्वबळाचा नारा आणि पाच वर्षांमधील टीकास्त्र
केंद्र सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला तरी शिवसेनेने सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. भारतीय जनता पार्टीनेही त्यास उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
गेल्या वर्षी 23 जानेवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा करण्यात आली होती.
तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 25 खासदार आणि 150 पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये युती न राहाता दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील अशी स्थिती तयार झाली होती.
2014 साली विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारावेळेस उद्धव ठाकरे यांनी भाजपाची तुलना थेट अफजलखानाच्या फौजेशी केली होती.
"रफालच्या कथित गैरव्यवहाराबाबतही शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली. शस्त्रखरेदीत सरकार घोटाळा करतं, सरकार पाप करतं," अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात टीका केली होती.
चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्यानंतर 'चार राज्यांत भाजपामुक्त, जास्त उडणारे कोसळले' अशा मथळ्याखाली शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केलं होतं.
2015 साली देशात कधी कसली लाट येईल आणि त्या लाटेत कोण वाहून जाईल ते सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणातील हिरोंनी प्रत्येक पाऊल जपून टाकावं, अशी बोचरी टीका करत 'सामना'तून करण्यात आली होती.
पुलवामा जिल्ह्यातील कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात गेल्या 4 दिवसात 44 जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशभरात संताप आणि आक्रोश पाहायला मिळतोय. यानंतरही पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सभा देशभरात होत आहेत. याचा शिवसेनेनं सामनातून समाचार घेतला.
काश्मीरमध्ये हल्ला झाल्यानंतर जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भाजपाला मत द्या, असं म्हणणं म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचं लोणी खाण्यासारखं आहे अशा भाषेत 'सामना'मधून शिवसेनेने टीका केली आहे.
सलग साडे चार वर्षं टीका केल्यानंतर आता उद्धव ठाकरे अमित शहांसोबत एकाच मंचावरून युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)