नवज्योत सिंग सिद्धू यांना पुलवामा हल्ल्यावरील वक्तव्य भोवलं, 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर वादाचा विषय ठरलं आहे. आणि वाद एवढा झालाय की सिद्धू यांची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त आहे.

आधी भारतीय टीममध्ये क्रिकेटर, मग टीव्ही समालोचक, लाफ्टर शोचे परीक्षक आणि राजकारणी, अशा विविध भूमिकांसाठी नवज्योत सिंग सिद्धू ओळखले जातात. सध्या ते काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत, तसंच सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये त्यांची विशेष उपस्थिती असते.

पुलवामा हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले, "हिंसा निंदनीय आहेच आणि मी या हिंसाचाराचा निषेध करतो. दहशतवादाला धर्म नसतो. प्रत्येक देशात दहशतवादी असतात. जे वाईट असतात, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण काही दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या घटनेसाठी पूर्ण देशाला जबाबदार धरता येणार नाही."

त्यांचं विधान मंत्रिमंडळातल्या नेत्यांना देखील आवडलं नसल्याची चर्चा सुरू झाली. शिवाय, या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर सिद्धू यांच्याविरुद्ध #boycottsidhu , #boycottkapilsharmashow आणि #BoycottSonyTV असे हॅशटॅग्स ट्रेंड होऊ लागले.

"जर सिद्धू परत तुमच्या शोमध्ये दिसले तर आम्ही सोनी टीव्हीवर पूर्णपणे बहिष्कार टाकू," असं ट्वीट जसप्रीत सिंग मान यांनी केलं आहे.

दुसरे एक ट्विटर युजर हितेश व्यास यांनी म्हटलं की "सिद्धू यांना द कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्यात यावे. त्यांना या शोमधून काढून टाकणं ही मृत सैनिकांना श्रद्धांजली ठरेल."

त्यानंतर सोनी टीव्हीनं त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

दरम्यान, आपण आजही आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत. माझ्या वक्तव्याचे काही भाग दाखवून त्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असं त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

"काही दहशतवाद्यांमुळे आपण दोन्ही देशांमधले संबंध कायमचे धोक्यात आणू शकत नाही. करतारपूर साहीब कॉरिडॉरवर या काही लोकांमुळे का प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं," असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मीर प्रश्नावर आणि या हिंसाचारावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा, असंच मी म्हणालो होतो.

गत नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वारात जाण्यासाठी भारतीय भाविकांसाठी कॉरिडॉरचं भूमिपूजन झालं होतं. शीख समुदायासाठी महत्त्वाचं ठिकाण असलेलं कर्तारपूर साहिब भारत-पाकिस्तान सीमेपासून 100 मीटर अंतरावर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे.

दरम्यान, 'द कपिल शर्मा शो'साठी सिद्धू यांच्या जागी अर्चना पुरण सिंह यांना घेण्यात आलं आहे, अशी माहिती सोनी टीव्हीच्या एका प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

अर्चना पुरण सिंह यांनीही आपण या शोचे दोन एपिसोड शूट केल्याचं ANI वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे, मात्र त्यांनाी हेही सांगितलं की तेव्हा त्यांना हे माहिती नव्हतं की सिद्धू यांची कायमची रवानगी करण्यात आली आहे.

अर्चना पुरण सिंह यांनी ANIशी बोलताना स्पष्ट केलं की 9 आणि 13 तारखेला त्यांनी दोन एपिसोड शूट केले आहेत, पण त्यावेळी सिद्धू काही कारणास्तव उपलब्ध नसल्यामुळे असं करण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, पुलवामा हल्ला 14 तारखेला झाला, ज्यावेळी त्यांचे हे दोन्ही एपिसोड शूट झाले होते.

गेल्या वर्षी माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शपथविधीसाठी नवज्योत सिंग सिद्धू हजर होते. तेव्हा त्यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मिठी मारली होती, त्यावरून देखील वाद निर्माण झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)