शेतकरी मागण्यांसाठी या मुलींनी पुणतांब्यात असं उभं केलं अन्नत्याग आंदोलन

    • Author, हलिमा कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी नगरहून

पाहा व्हीडिओ

"उपोषणामुळे आम्ही कोमातदेखील जाऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तरीही आम्हाला मागचा-पुढचा विचार करायचा नव्हता," शुभांगी जाधव खंबीरपणे सांगत होती.

नगर जिल्ह्यातील पुणतांब्यामधील शुभांगी, निकिता आणि पूनम जाधव या शेतकऱ्यांच्या मुली. आपल्या पालकांची आणि राज्यातील इतर शेतकऱ्यांची व्यथा शासनदरबारी मांडण्यासाठी 4 फेब्रुवारीपासून त्यांनी सहा दिवस अन्नत्याग आंदोलन केलं.

'मुलींसाठी हे सरकार तत्पर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींच्या उपोषणाने तरी ते जागे होतील,' असं या मुलींना वाटलं होतं.

"उपोषणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खूप त्रास झाला. भुकेने पोट दुखायचं, पण आमच्या डोळ्यासमोर आमचे शेतकरी मायबाप, त्यांचे कष्ट यायचे तेव्हा आम्ही सारं विसरून जायचो," पूनम जाधव सांगत होती. "आम्ही शेतकरी मायबापावर अवलंबून आहोत. त्यांच्यासाठी आम्ही उपोषण केलं. पुढे याच मार्गावर यायचंय, त्यामुळे सवय लावून घेतोय," ती निर्धारानं सांगत होती.

19 वर्षांची पूनम आणि शुभांगी या B.Sc.च्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहेत तर निकिता पुण्यात कायद्याचं शिक्षण घेतेय. पण या वयातही त्या त्यांच्या मागण्यांसाठी खंबीरपणे उभ्या होत्या. शेतकऱ्याला हमीभाव, मोफत वीज, 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेंशन, शेती अवजारांवर सबसिडी, दुधाला 50 रुपये लीटर भाव मिळावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

शेतकऱ्यांच्या मुलींनी आपल्या बापासाठी लढायला पुढे यावं, असं आवाहनही या मुलींनी केलं.

राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंचं उपोषण सुरू असतानाच या मुलींचंही अन्नत्याग आंदोलन पुणतांब्यात सुरू झालं. अण्णांनी लोकपालची नियुक्ती, शेतकऱ्यांना हमीभाव या मुद्द्यांसाठी आंदोलन केलं होतं.

पण त्यातही या मुलींच्या आंदोलनाची राज्यभर चर्चाही झाली. पण उपोषणाला आठवडा होत आला तरी काहीही ठोस निर्णय आला नाही. त्यातच त्यांची तब्येत बिघडल्यानं पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं.

मग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काही आश्वासनं दिली आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर या मुलींनी उपोषण सोडलं.

दरम्यान, उपोषण संपवण्यासाठी या मुलींना जबरदस्तीने नगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं होतं, असेही आरोप झाले. सरबत घेतल्यानंतर तिथून त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर अजून तरी कुणी येऊन भेटलं नसल्याचं त्या सांगतात.

शेतकरी आंदोलनाचं उगमस्थान - पुणतांबा

2017 मधील शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात पुणतांब्यातून झाली. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील पुणतांबा चर्चेत आलं. शहराकडे जाणारा भाजीपाला आणि दूध यांचा पुरवठा शेतकऱ्यांनी बंद केला होता.

स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावा, ही मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली होती. मात्र अजूनही ही मागणी मान्य करण्यात आली नाहीये.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे या मुलींच्या आंदोलनामुळे सरकारचं लक्ष वेधल गेलंय आणि शासन त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत असल्याचं नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले.

"पुणतांबा येथून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी आंदोलनाची दखल घेत सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. याशिवाय, बोंडअळीमुळे झालेली नुकसानभरपाई देखील देण्यात आली आणि जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे," असं शिंदे म्हणाले.

"दुधाला 50 रुपये भाव ही मागणी व्यावहारिक आणि संयुक्तिक देखील नाही. जागतिक बाजारात दूध पावडरचे भाव कोसळल्याने दुधाच्या भावावर परिणाम झालेला आहे.

"याआधी देखील अनेक लोकप्रिय मागण्या होत्या, पण आधीच्या सरकारने कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही, भूमिका घेतली नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकारने ठोस भूमिका घेतली, घोषणा केली, अंमलबजावणी केली," असंही शिंदे म्हणाले.

कशी झाली उपोषणाची तयारी?

"आईवडिलांचे कष्ट आम्ही पाहतोय. शेतात खूप राबूनही त्यांच्या कष्टाला मोल मिळत नाही. म्हणून आम्ही तिघींनी मिळून उपोषणाचा निर्णय घेतल्याचं शुभांगी आणि पूनम यांनी सांगितलं.

"कॉलेजमध्ये शिक्षक फी मागतात तेव्हा सर्वांसमोर ओशाळल्यासारखं वाटतं. पण घरी तरी कसे पैसे मागणार?" हा पूनमचा प्रश्न विचार करायला भाग पाडतो.

पूनम उत्तम पेंटिंग करते. तिला फार्मसी करायचं होतं तर शुभांगीला सिव्हिल इंजिनिअरींग. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्या बाहेर पडू शकल्या नाहीत.

"आम्ही उपोषणाचा निर्णय बोलून दाखवल्यानंतर आईवडील आमच्याशी बोलत नव्हते. आमच्याजवळ येऊन ते रडायचेही. आम्ही उपोषण करावं, असं त्यांना वाटत नव्हतं. मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो," पूनम सांगत होती.

यावेळी आम्ही निकिताशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता युरीन इंफेक्शनमुळे ती रुग्णालयात असल्याचं कळलं.

'शेतकऱ्यांचे प्रश्न नव्यानं मांडले'

कृषी कन्यांनी आंदोलन केल्याची ही महाराष्ट्रातली पहिली घटना असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. "या मुलींनी घेतलेला उपोषणाचा निर्णय स्वागतार्ह आहे. पुणतांबा गावात वारंवार आंदोलनाची ठिणगी पडते. मात्र त्याचं वणव्यात रूपांतर करण्यात शेतकरी नेत्यांना अपयश आलं आहे," असंही भालेराव यांनी म्हटलं.

शेतीविषयाचे अभ्यासक असलेले भालेराव यांच्या मते, या मुलींनी शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा सर्वांसमोर आणले आणि मांडले यातच त्यांचं यश आहे.

तर एवढ्या लहान वयात या मुली पुढे येऊन शेतकरी आई-वडिलांसाठी आंदोलन करतात, हे कौतुकास्पद असल्याचं अमर हबीब यांना वाटतं. अमर हबीब यांनी महाराष्ट्रात 'किसानपुत्र आंदोलन' उभं केलंय.

"शेतकरी जेवढं पिकवतो, कष्ट घेतो त्या तुलनेत पिकांना कवडीमोल भाव मिळतो. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरी बापाच्या कष्टाला मोल देण्यासाठी लढायला पाहिजे," अशी प्रतिक्रिया त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.

या मुली राजकारणात येणार का?

शेतकऱ्यांच्या ज्या मुली शिकताहेत त्यांनाही प्रोफेशनल कोर्सेस करायचे आहेत. पण शेतकऱ्यांना उत्पन्न नसल्यानं त्याची झळ मुलांनाही बसते. त्यामुळे मुलींनी उपोषणाचा निर्णय घेणं हे नक्कीच आगळंवेगळं उदाहरण असल्याचं डॉ. बुधाजी मुळीक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

आंदोलन, उपोषणाच्या मार्गे अनेक जण राजकारणात गेले आहेत. या मुलींचाही तसाच काही विचार आहे का, या प्रश्नावर या मुलींनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, "आम्हाला राजकारणात यायचं नाहीये. जे सरकार येईल ते शेतकऱ्यांचा विचार करणार असावं, एवढंच," असं त्या म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)