You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आत्महत्या : 'वडिलांनी जीव दिला पण आईला शेती करू देणार नाही'
- Author, प्रियंका दुबे
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
राज्यातील बीड जिल्ह्यात यावर्षीही मान्सून उशिराच दाखल झाला. काळ्या मातीच्या शेतांना मागे टाकत आम्ही इथल्या बालाघाटच्या डोंगरांमध्ये वसलेल्या थलसेरा गावात पोहोचलो.
इथे एका शेतात उभारलेल्या खोलीवजा घरात 65वर्षांच्या लक्ष्मीबाई राहतात. त्यांच्याकडे एक शेळी आणि दोन कोंबड्यां आहेत. या भागात गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू आहे आणि त्यातच लक्ष्मीबाईंच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली.
या जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवलं आहे. लक्ष्मीबाईंच्या नवऱ्याने कर्जामुळे मृत्यूला कवटाळले. कर्जाने पिचलेल्या त्यांच्या नवऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाईंचा मुलगा शिवाजी शेतात मजुरी करू लागला. पण त्याचाही अपघातामध्ये मृत्यू झाला. शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांची सून नंदा एकेदिवशी अचानक आपल्या तिन्ही मुलांना सोडून निघून गेली.
मात्र ही कथा लक्ष्मी, त्यांचे पती किंवा मुलाची नाही.
शांतीवन - आशेचा किरण
ही कहाणी आहे स्वतःच्या घराची अशी राखरांगोळी होताना बघितलेल्या नंदाच्या तीन मुलांची. तसंच ही कहाणी आहे मराठवाड्यात शेतीकर्ज फेडता आले नाही म्हणून आत्महत्या केलेल्या कुटुंबातील मुलांची.
लक्ष्मीबाईंचा 14 वर्षांचा नातू सूरज आपल्या दोन छोट्या जुळ्या बहिणींसोबत बीडमधील अरवी गावातील याच शाळेत शिकतो.
आई गेल्यानंतर भावाच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या सूरजच्या आत्या जीजाबाई सांगतात, "आत्महत्येच्या दुष्टचक्रात अडकलेल्या कुटुंबांसाठी 'शांतीवन' आशेचा किरण आहे."
"सुरुवातीला मुलं खूप रडायची. त्यांच्या आजोबांनी आत्महत्या केली होती. वडील अपघातात दगावले होते. आई सोडून गेली होती. मात्र हे सर्व कळायला ते खूप लहान होते. सूरज सात वर्षांचा होता आणि त्याच्या बहिणी तर चार वर्षांच्या होत्या. ही मुलं गावभर फिरत आपल्या आई-वडिलांना शोधायचे. दारोदारी जाऊन विचारायचे, माझी आई कुठे आहे? काय करावं, काहीच कळत नव्हतं. तेव्हा आम्हाला शांतीवन या निवासी शाळेबद्दल कळलं आणि आम्ही तात्काळ मुलांना तिथे शिकायला पाठवून दिलं," जीजाबाई सांगतात.
सूरजला भेटण्यासाठी आम्ही थलसेरा गावापासून 45 किलोमीटर दूर असलेल्या अरवी गावातील शांतीवन शाळेत गेलो. इथे नवव्या वर्गात शिकणाऱ्या सूरजसोबतच आम्हाला शांतीवनचे संस्थापक आणि शाळेचे मुख्याध्यापक दीपक नागरगोजेसुद्धा भेटले.
बाबा आमटेंकडून प्रेरणा घेऊन दीपक नागरगोजे यांनी 18 वर्षांपूर्वी आपल्या साडेसात एकर जमिनीवर ही शाळा सुरू केली.
ते सांगतात, "मी 18 वर्षांचा होतो जेव्हा मी बाबा आमटेचं कार्य बघितलं. त्यानंतर मला वाटलं स्वतःसाठी तर प्रत्येक जणच जगतो. आनंद तर दुसऱ्यांसाठी जगण्यात आहे. मी बीडच्या बालाघाट भागातला आहे. आमच्याकडची जमीन खडकाळ आहे आणि शेतीत केवळ एकच पीक होऊ शकतं."
"दर दुसऱ्या वर्षी दुष्काळही पडतो. म्हणूनच इथली शेती कायमच संकटात असते. कर्जात बुडालेले शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या मुलांचं काय होत असेल? हा प्रश्न मला सतावत होता. घरातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे या मुलांचं संगोपन आणि शिक्षण ठप्प होत होते."
यातून निर्माण होणारी गरिबी आणि बेरोजगारी पुन्हा आत्महत्यांचं कारण बनते. कर्जाच्या या दुष्टचक्राला ओळखून दीपक यांनी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली.
ते सांगतात, "आज शांतीवनात एकूण 800 मुलं शिकतात. यातील 300 मुलं शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहतात. या 300 मुलांपैकी 200 मुलं अशी आहेत ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. या मुलांच्या राहण्याखाण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था शाळेच्या परिसरातच केली जाते."
नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण देणारी ही शाळा सरकारी मदतीविना सुरू आहे. दीपक यांच्या शेतीत होणारं धान्य, भाज्या आणि खाजगी देणगीच्या आधारावर ही शाळा सुरू आहे.
दुपारच्या जेवणासाठी शाळेतील मेसकडे जाणारा सूरज त्याच्या थलसेरा गावातील परिस्थितीपासून अनभिज्ञ एक आनंदी मुलगा वाटतो. मात्र गाव आणि आजीविषयी विचारताच त्याचे डोळे पाणावतात.
"कधी कधी घराची आठवण येते. पण मी इथे आनंदी आहे. शाळेत आम्ही इतिहास, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, गणित आणि भूगोलसारखे सर्व विषय शिकतो. इथे माझे चांगले मित्रही बनलेत. मला शिकून डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचं आहे."
स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे: पूजा
सूरजप्रमाणेच शांतीवनमध्ये मोठी झालेली बीडच्या गेवराई तालुक्यातील पूजा किसन आवटे सध्या संगणक शास्त्रात पदवीचं शिक्षण घेत आहे. पिढ्यानपिढ्या कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी कुटुंबांसाठी पूजा एक आदर्श ठरू शकते.
काळी जीन्स आणि लाल रंगाचा टॉप घालून माझ्या समोर उभी असलेली 20 वर्षांची पूजा पहिल्या भेटीतच तिच्यातील चैतन्याने तुम्हाला प्रभावित करते. आनंदी वृत्ती आणि सळसळत्या उत्साहामागे दुःखाचा डोंगर लपविणाऱ्या पूजाला तिच्या भागातील शेतकऱ्यांचं आयुष्य समृद्ध करायचं आहे.
कुटुंब आणि शिक्षणाबद्दल बोलताना ती सांगते, "माझ्या वडिलांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. ते हे कर्ज फेडू शकत नाही. आमच्याकडे खूप कमी जमीन होती. ज्यावर माझे वडील त्यांच्या मोठ्या भावासोबत शेती करायचे. पण माझे काका सगळा पैसा स्वतःच ठेवायचे आणि कर्ज माझ्या वडिलांच्या माथी असायचं. त्यांनी जमीन ठेक्यावर घेऊनही शेती केली. मात्र कर्ज फेडता आलं नाही. कर्ज वसुलीसाठी देणेकरी घरी यायचे. त्या त्यांना कर्ज परत करतो असं सांगायचे पण आतल्या आत ते पार कोलमडले होते."
पूजा दहावीत होती. तेव्हा एक दिवस अचानक तिच्या वडिलांनी स्वतःचे हातपाय बांधून घेत घराजवळच्या विहिरीत उडी घेतली.
डबडबलेल्या निरागस डोळ्यांनी पूजा सांगते, "त्यांना पोहता यायचं. त्यांना वाटलं असेल ते पोहून वर येऊ शकतील. म्हणून त्यांनी हातपाय बांधून घेत विहिरीत उडी घेतली. माझ्या घरात आता फक्त माझी आई आहे. ती मोलमजुरी करून गुजराण करते."
मात्र आपल्या या दुःखाला विसरून नवी सुरुवात करणाऱ्या पूजाला पदवीनंतरही अजून शिक्षण घ्यायचं आहे. "मी पुढे मास्टर करायचं आहे. त्यानंतर चांगल्या कंपनीत नोकरीसुद्धा करेन. नोकरी लागल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या आईला गावाहून इकडे घेवून येईल. मी तिला नेहमी माझ्यासोबतच ठेवीन आणि तिला कधीच शेती करू देणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)