शरद पवार यांनी या वयात निवडणूक लढवू नये, पराभव करू - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वेगवेगळ्या वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. शरद पवारांनी या वयात निवडणूक लढवू नये - चंद्रकांत पाटील

"मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, पण या बाबत विचार करून सांगू," असं शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये. माढा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास, भाजप त्यांचा पराभव करेल."

ई-टीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

"शरद पवार छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचा विचार करतात. एक लोकसभा म्हणजे जवळजवळ 600 गावं मतदारसंघात येतात. एवढ्या मोठ्या परिसरात त्यांनी या वयात फिरणं अवघड आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा न लढवलेलीच बरी. पण त्यांनी लोकसभा लढवलीच तर त्यांचा भाजप पराभव करेल," असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

2. विधानसभा बरखास्त होणार नाही - मुख्यमंत्री

"पायाखालची जमीन सरकल्यानं विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचं वक्तव्य विरोधक करत आहेत. मात्र सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राज्य सरकार बरखास्त करून लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं होतं.

"अशोक चव्हाणांचे विधान चुकीचं असून त्यांना भविष्य वर्तवण्याची सवय लागली आहे," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

3. राम मुस्लिमांचेही पूर्वज - बाबा रामदेव

"अयोध्येत राममंदिराची उभारणी देशाच्या सन्मानाशी जोडलेली आहे आमि प्रभू राम हे केवळ हिंदूंचे नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज होते," असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद येथे पत्रकारांबरोबर बोलताना, राममंदिराचा मुद्दा मतपेटीच्या राजकारणाशी जोडलेला नसल्याचा त्यांनी म्हटलं.

"अयोध्येतच राममंदिर बांधावयास हवं, अयोध्येत नाही तर कोठे बांधणार? अयोध्या हीच प्रभू रामांची जन्मभूमी असल्याची वस्तुस्थिती वादातीत आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

4. 8 दिवसांत शिक्षक भरतीची जाहिरात काढणार - विनोद तावडे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील 8 दिवसांत 15 जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीची पहिली जाहिरात काढली जाईल, अशी घोषणा केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

विनोद तावडे यांनी सांगितलं की, "सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांची जाहिरात काढली जाणार आहे. जाहिरातीनंतरच्या 15 दिवसांत सर्व भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसंच या भरतीदरम्यान संस्थाचालक घेत असलेल्या प्रत्येक मुलाखतीचे व्हीडिओ रेकॉर्डिंगदेखील केलं जाईल."

भरती प्रक्रिया का रखडली, या प्रश्नावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, "संस्था चालकांमुळे भरती प्रक्रिया इतके दिवस रखडली होती. संस्था चालकांनी याचिका दाखल केल्यामुळे अनेक अडथळे निर्माण झाले होते. भरती प्रक्रियेत आम्ही केलेल्या नव्या बदलांमुळे संस्थाचालकाला शिक्षक भरतीदरम्यान एकही रुपया घेता येणार नाही."

5. महाराष्ट्रातल्या अनाथालयांत सर्वाधिक बालमृत्यू

एप्रिल 2014 ते जानेवारी 2019 या 5 वर्षांमध्ये अनाथालयातील 1,265 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारनं संसदेत दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. 0 ते 6 वयोगटातील बालकांचा यामध्ये समावेश आहे.

महिला आणि बालविकास राज्य मंत्री वीरेंद्र कुमार यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रातल्या अनाथालयांमध्ये झाले. हा आकडा 172 इतका आहे. याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 170 तर बिहारमध्ये 134 बालकांचा मृत्यू झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)