मुंबईच्या तरुणाचा आईवडिलांवर खटला: ‘तुम्ही माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?’

फोटो स्रोत, Nihilanand
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
परवानगी न घेता जन्माला का घातलं म्हणून मुंबईचा रफाएल सॅम्युएल (27) हा स्वत:च्या आई वडिलांविरुद्ध खटला भरणार आहे. जन्माला आल्यावर आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. त्यामुळे मुलांना जन्म देणंच चुकीचं आहे, असं रफाएल सॅम्युएलनं बीबीसीला सांगितलं.
जन्माच्याआधी परवानगी घेणं शक्य नाही, याविषयी मात्र सॅम्युएल सहमत आहे पण जन्माला येणं हा त्याचा निर्णय नक्कीच नव्हता, असा त्यांनं दावा केला आहे.
जन्माला यायचं की नाही याबाबत मुलाला विचारलं जात नाही. म्हणून आपल्याला आई वडिलांकडून आयुष्यभर भत्ता मिळायला पाहिजे, असंही तो सागंतो.
सॅम्युएल याचा विचार हा 'मानव जन्मजात विरोधी' (Anti-natalism) तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. त्याच्या मते आयुष्यात खूप दु:ख आहे. त्यामुळे मानव जातीने नवीन मुलांना जन्माला घालणं थांबवायला पाहिजे. आपण असं केलं तर, एक दिवस मानव जात पृथ्वीवरून नष्ट होईल आणि हे जग सुखी होईल.
"जगात माणुसकी उरलेली नाही. त्यामुळे अनेक लोकांना दुख: सहन करावं लागत आहे. जर मानवजात नष्ट झाली तर प्राणी, पक्षी आणि पृथ्वी सुखी होईल. तसंच मानवाचं दुख:ही संपून जाईल. मानवजातीला काही अर्थच राहिला नाही," असा सॅम्युएलचा दावा आहे.

फोटो स्रोत, NIHILANAND
2018मध्ये त्यांनं Nihilanand या नावानं एक फेसबुक पेज सुरू केलं आहे. त्याठिकाणी तो खोटी दाढी लावून काढलेले स्वत:चे फोटो आणि त्यावर मानव जात विरोधी पोस्टर्स पोस्ट करत आहे.
"मुलाला जन्म घालणं, त्याला नोकरी करायला भाग पाडणं हे गुलामी किंवा अपहरण करण्यासारखं नाही का? त्याऐवजी आई-वडिलांनी खेळणी किंवा कुत्रा पाळला असता तर? शेवटी तुम्ही त्यांचं खेळणं असता ना?" असे संदेश तो फेसबुकवर पोस्ट करत असतो.
सॅम्युएल हा 5 वर्षांचा असताना त्यांना पहिल्यांदा 'मानव जातविरोधी' विचार आला होता.

फोटो स्रोत, Nihilanand
"मी एक सामान्य मुलगा होतो. एके दिवशी मला खूप वैताग आला. त्यादिवशी मला शाळेत जावसं वाटलं नाही. पण माझ्या बाबांनी मला जबरदस्तीनं शाळेत पाठवलं. त्यावेळी मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला का जन्माला घातलं? त्यावेळी बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यावेळी जर का त्यांनी मला उत्तर दिलं असतं तर आज मला हा प्रश्न पडला नसता," असं सॅम्युएल सांगतो.
तो विचार सॅम्युएल यांच्या मनात घर करून बसला आणि एके दिवशी हा सगळा विचार त्यांच्या आई-वडिलांसमोर मांडायचा असा त्यांनी निर्धार केला.
सॅम्युएल सांगतो की, आई वडिलांशी माझं'प्रेमळ नातं' आहे. आई वडिलांना हा विचार सांगितला त्यावेळी ते खूष झाले. आईने ही 'चांगली गोष्ट' आहे, असं म्हटलं तर बाबांचीही याविषयी उत्सुकता वाढली आहे.
"जन्माआधी माझ्यासोबत (सॅम्युएलसोबत) भेट व्हायला पाहिजे होती, असं आई मला म्हणाली. तसं घडलं असतं तर मी तुला नक्कीच जन्माला घातलं नसतं,"असं ते हसत हसत सांगतात." असं सॅम्युएलनं सांगितलं.
"ती मला भेटली तेव्हा तीचं खूप कमी वय होतं. तिच्याकडं दुसरा पर्याय (मुल जन्माला न घालण्याचा) होता, याची तिला कल्पनाच नव्हती. पण मीही तेच सांगतोय की सगळ्याकडं पर्याय आहेत."
"त्याच्या विचारांच्या काही गोष्टींवरच लक्षं देणं चुकीचं ठरेल," असं सॅम्युएल यांची आई कविता कर्नाड सॅम्युएल यांनी एका परिपत्रकात म्हटलं आहे.
"तो मानव जात जन्माविरोधाच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवत आहे. फालतू मानवी जीवनामुळे ते पृथ्वीवर ओझं झालं आहेत. लहानाचं मोठं होत असताना अनेक गोष्टीला सामना करावा लागतो. या त्याच्या विचाराकडे कुणी लक्ष दिलं नाही. माझा मुलगा न घाबरता, स्वतंत्रपणे विचार करत आहे. याबद्दल मी आनंदी आहे. मला आशा आहे की त्याला त्याच्या सुखाचा मार्ग भेटेल," असंही त्यांच्या आईने लिहिलं आहे.
आई-वडिलांना कोर्टात खेचण्याचा निर्णय हा केवळ त्यांच्या तत्त्वावर आधारित आहे, असं सॅम्युएल सांगतो. मानवांशिवाय हे जग फार सुखी राहील असा त्यांचा दावा आहे.
जन्माला आल्यामुळे तुम्ही दु:खी आहात का? असं त्यांना विचारलं तर ते 'नाही,' असं उत्तर देतात. "मी जन्माला आलो नसतो तर बरं झालं असतं पण मी जीवनाबद्दल दु:खी नाही. माझं जीवन चांगलं चाललं आहे. पण मी इथं नसायला पाहिजे होतं. तुम्ही एका चांगल्या खोलीत आहात, पण तुम्हाला तिथं नको झालं आहे," असं सॅम्युएलला वाटतं.
"मला माहित आहे की कोणताही वकील माझी केस धुडकावून लावेल पण मला ही तक्रार दाखल करायची आहे. कारण मला हा विचार मांडायचा आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








