लोकसभा निवडणूक: व्हॉट्सअॅपची पक्षांना तंबी, 'अॅपचा राजकीय गैरवापर बंद करा, अन्यथा...'

व्हॉट्सअॅप

फोटो स्रोत, Getty Images

राजकीय हेतूचे संदेश व्हॉट्सअॅपवरून पसरवणं बंद करा, अशी तंबी व्हॉट्सअॅपने भारतातल्या राजकीय पक्षांना दिली आहे.

सार्वत्रिक निवडणुकांच्या उंबरठ्यावर देशात अनेक राजकीय संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत या मेसेजिंग कंपनीने म्हटलं आहे की राजकीय पक्ष व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग करत आहेत. "आम्ही वैयक्तिक मेसेजिंगसाठी व्हॉट्सअॅप तयार केलं होतं. त्यामुळे सार्वजनिक संदेश पसरवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करू नका," असं या कंपनीचे संपर्क प्रमुख कार्ल वूग यांनी म्हटल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलं आहे.

एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी वाढीस लागलेल्या अशा राजकीय मेसेजेस आणि जोक्सचा तुमच्या मतांवर परिणाम होतो, असं अनेक संशोधनांमधून पुढे आलं आहे.

"असे मेसेजेस पाठवून राजकीय पक्ष आमच्या सेवेचा दुरुपयोग करत आहेत. आम्ही काही लोकांच्या हाती भोंगा देऊ इच्छित नाही. लोकांनी एकमेकांना मेसेज करावा, एवढाच या अॅपचा हेतू आहे," असं वूग यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अशा प्रकारे शेकडो मेसेजेस एकत्र पाठवणाऱ्या युजर्सवर आम्ही 'मशीन लर्निंग' तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवून आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

"आम्ही अनेक पक्षांशी चर्चा करून त्यांना सांगितलंय की अशा प्रकारे व्हॉट्सअॅपवर भरमसाठ मेसेजेस ब्रॉडकास्ट करू नका. निवडणुकांपूर्वी आम्ही सर्व पक्षांना बजावून सांगतोय की व्हॉट्सअॅपचा असा गैरवापर सुरूच राहिला तर त्यांच्या दोषी अकाउंट्सवर बंदी घालू," असं वूग म्हणाल्याचं 'टेक सर्कल' या तंत्रज्ञान वेबसाईटने म्हटलं आहे.

भाजप IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना व्हॉट्सअॅपच्या अधिकाऱ्यांबरोबर कुठलीही चर्चा झाल्याची गोष्ट नाकारली. तर काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या दिव्या स्पंदना यांनी दावा केला की त्यांचा पक्ष कुठल्याही प्रकारे व्हॉट्सअॅपचा गैरवापर करत नाही.

यासंदर्भात बीबीसीने भाजप तसंच काँग्रेसच्या या प्रवक्त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलले नाहीत.

फेक न्यूज

फोटो स्रोत, Getty Images

फेसबुकची उपकंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपचे जगभरात 150 कोटी युजर्स आहेत, ज्यापैकी 20 कोटीहून जास्त युजर्स भारतात आहेत. व्हॉट्सअॅपसाठी भारत ही जगातली सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या कंपनीसाठी भारत व्यावसायिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे.

पण गेल्या काही वर्षांमध्ये फेक न्यूज आणि चुकीच्या मेसेजेसचा प्रसार वाढल्याने या कंपनीवर बरीच टीका झाली आहे. देशभरात चुकीची माहिती आणि अफवांमुळे लोकांमध्ये दहशत पसरत आहे, ज्यामुळे काही लोकांचा नाहक बळी जातोय, अशाही अनेक घटना घडत आहे. यामुळे व्हॉट्सअॅप वर टीकेची झोड उठली आहे.

"त्यामुळेच व्हॉट्सअॅपने तातडीने पावलं उचलंत मेसेजेस फॉर्वर्ड करण्यावर मर्यादा आणली आहे. यामुळे एक मेसेज एका वेळी केवळ पाचच लोकांना पाठवला जाऊ शकतो. हा प्रयोग आधी भारतात करण्यात आला आणि काही आठवड्यांपूर्वी ही मर्यादा जगभरात लागू करण्यात आली," असं व्हॉट्सअॅपचे एक अधिकारी मॅट जोन्स यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

मोबाईल

काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅपने End-to-end encryption नावाचं एक फीचर आणलं, ज्यामुळे फक्त मेसेज पाठवणारा आणि ज्याला पाठवलाय त्यालाच तो मेसेज वाचता येऊ शकतो. यामुळे एक अडचण हीसुद्धा झालीये की चुकीचा किंवा खोटा मेसेज नेमका पहिल्यांदा कुणी पाठवला, त्याचं स्रोत काय, हे कळतच नाही.

त्यामुळे सरकारने आता काही नवे नियम प्रस्तावित केले आहेत, ज्याअंतर्गत कंपनीला आता मेसेजचा स्रोत ओळखणं बंधनकारक होऊ शकतं. पण वूग म्हणाले की "प्रस्तावित नियमांपैकी मेसेजेसचा स्रोत आणि प्रसार शोधण्याचा नियम आम्हाला अडचणीचा ठरू शकतो. आम्ही युजर्सच्या प्रायव्हसीबद्दल कटिबद्ध आहोत, कारण युजर्सनाच तेवढी गोपनीयता हवी आहे," असं वुग म्हणाल्याचं IANS वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

त्यामुळे जर तसे काही बंधनकारक नियम अमलात आले तर आम्हाला आमच्या अॅपचा पूर्णतः नव्याने विचार करावा लागेल. त्यामुळे व्हॉट्सअॅप सध्या ज्या रूपात आहे, कदाचित तसं राहणार नाही, असंही वूग यावेळी म्हणाले.

सोशल मीडियावरील फेक न्यूजशी लढा देण्यासाठी बीबीसीने काही महिन्यांपूर्वी #BeyondFakeNews ही मोहीम हाती घेतली होती. त्याअंतर्गत करण्यात आलेल्या एका सखोल संशोधनात असं लक्षात आलं होतं की भारतात खोट्या बातम्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या राजकीय घडामोडी यांच्यात काही वेळा परस्परसंबंध आहे.

डाव्या विचारसरणीचे आणि फेक न्यूज पसरवणारी मंडळी यांच्यात फारसं तारतम्य नाही. मात्र उजव्या विचारसरणीचे लोक एकमेकांशी घट्ट बांधलेले दिसले. याचा दृश्य परिणाम म्हणजे उजव्या विचारधारांशी संबंधित फेक न्यूज डाव्या विचारांपेक्षा अधिक वेगाने पसरतात, असं या संशोधनातून पुढे आलं होतं.

हे वाचलंत का?

हे पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करण्याआधी काय काळजी घ्याल?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)