राष्ट्रवादाच्या नावाखाली होत आहे फेकन्यूजचा प्रसार – बीबीसी रिसर्च

फेक न्यूज़

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीनं भारतात केलेल्या रिसर्च नुसार,'राष्ट्र उभारणी'च्या हेतूने राष्ट्रवादासंदर्भातील बातम्या शेअर होतात. बातमी किंवा मजकुराची तथ्यांशी पडताळणी करण्यापेक्षा सामुदायिक राष्ट्रीय ओळख या मुद्द्याला भारतीय प्राधान्य देताना दिसतात.

फेक न्यूजचा प्रचार कसा होतो यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या वर्तनाचा अभ्यास करून प्रसिद्ध झालेल्या पहिल्या संशोधनपर अहवालात हे स्पष्ट झालं आहे.

या रिसर्चसंदर्भातील संपूर्ण माहिती आणि तपशिलवार विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून लोक कोणत्या गोष्टी शेअर करतात हे समजून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप अकाउंट्सचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला. या संशोधनाकरता लोकांनी आपल्या फोनचा अॅक्सेस बीबीसीला दिला होता. तसंच ट्विटरवर बातम्या कशा शेअर होतात याचासुद्धा सविस्तर अभ्यास करण्यात आला.

हे संशोधन बीबीसीच्या 'बियाँड फेक न्यूज' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत करण्यात आलं. खोट्या माहितीच्या विरोधात हा प्रकल्प आम्ही जगभर राबवत आहोत.

याविषयावर चर्चा करण्यासाठी आणि फेकन्यूजच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी बीबीसी मराठीनं आज पुण्यात परिषद आयोजित केली आहे. तिथं सहभागी होण्यासाठी या ठिकाणी माहिती उपलब्ध आहे.

तसंच बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही दिवसभर लाईव्ह पाहू शकता.

line

या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • हिंसा भडकेल अशा स्वरूपाचे संदेश पाठवण्यास भारतीय नागरिक तयार नसतात. परंतु राष्ट्रवादासंदर्भातील संदेश शेअर करणं, फॉरवर्ड करणं त्यांना त्यांचं कर्तव्य वाटतं. भारताची प्रगती, हिंदूशक्ती, हिंदू गतवैभवाला झळाळी अशा विषयांबद्दलची प्रसंगी खोटी माहितीही शहानिशा न करता सरसकट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते. असे संदेश पाठवून राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपण योगदान देत आहोत, अशी भावना लोकांच्या मनात असते.
  • केनिया आणि नायजेरियात फेक न्यूज म्हणून गणल्या जाणाऱ्या बातम्या किंवा मजकूर पाठवताना कर्तव्याची भावना असते. मात्र या दोन देशांमध्ये ही भावना राष्ट्रवादाशी संलग्न नसते. ब्रेकिंग न्यूज खरी असेल तर संबंधित व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करणारी असू शकते या भावनेतून बातमी किंवा मजकूर पाठवला जातो. माहितीची उपलब्धता सगळ्यांना लोकशाही पद्धतीने मिळावी असं लोकांना वाटतं, असंही इथे दिसून आलं.
ट्विटर

फोटो स्रोत, Reuters

  • भारतात खोट्या बातम्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या राजकीय घडामोडी यांच्यात काही वेळा परस्परसंबंध असल्याचं संशोधनातून पुढे आलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून प्रचंड अशा माहितीचं सखोल विश्लेषण करण्यात आलं. डाव्या विचारसरणीचे आणि फेक न्यूज पसरवणारी मंडळी एकमेकांशी विस्कळीत पद्धतीने जोडलेली आहेत. मात्र उजव्या विचारसरणीचे लोक एकमेकांशी घट्ट बांधलेले दिसले. याचा दृश्य परिणाम म्हणजे उजव्या विचारधारांशी संबंधित फेक न्यूज डाव्या विचारांपेक्षा अधिक वेगाने पसरतात.
  • भारत, केनिया तसंच नायजेरियातले लोक नकळत फेक न्यूज या अपक्षेनेही पाठवतात की ती बातमी खरी आहे की नाही हे कोणीतरी तपासून पाहील आणि त्यांना सांगेल.
  • भारतात फेक न्यूजच्या प्रसारामागे राष्ट्रवाद हे प्रमुख सूत्र आहे. मात्र केनिया आणि नायजेरियात फेक न्यूजच्या प्रसारामागची कारणं वेगळी आहेत. केनियात राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न, राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे विषय तसंच पैशांच्या आणि तंत्रज्ञानाच्या अफरातफरीची प्रकरणं याबाबतच्या फेक न्यूज व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वाधिक शेअर केल्या जातात. दहशतवाद तसंच लष्कराविषयीच्या बातम्या नायजेरियात व्हॉट्सअपवरून मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात.
फ़ेक न्यूज़

फोटो स्रोत, Getty Images

  • केनिया आणि नायजेरियातील युझर्स माहितीसाठी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमं आणि फेक न्यूज देणारी व्यासपीठं याचा समान प्रमाणात उपयोग करतात. मात्र बातमीचा किंवा मजकुराचा स्रोत जाणून घेण्याची इच्छा भारताच्या तुलनेत या दोन देशांमध्ये अधिक प्रमाणात जाणवते. चालू घडामोडींविषयी आपण सतत अपडेट आहोत ना याविषयी जागरुकता आणि आग्रह अफ्रिकन देशांत दिसतो. विविध गोष्टींविषयी माहिती असणाऱ्या व्यक्तीला समाजात सहज मान्यता मिळते. या सगळ्या गोष्टींमुळे, माहितीचा स्रोत विश्वासार्ह आहे की नाही हे जाणून घेण्याची इच्छा असतानाही, खाजगी वितरणातून फेक न्यूजचा प्रसार होतो.
line

डॉ. शंतनू चक्रवर्ती, हेड ऑफ ऑडियन्स रिसर्च, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

फेक न्यूजच्या प्रसाराविषयी काळजी वाटत असतानाही सर्वसामान्य माणसं फेक न्यूज का शेअर करतात हे तपासणं या संशोधनामागचं मुख्य उद्दिष्ट होतं. या अहवालात भारत, नायजेरिया आणि केनिया या तीन देशांमधील व्यक्तींचा संख्यात्मक तसंच विविध सामाजिक पातळ्यांनुसार अभ्यास करण्यात आला. फेक न्यूजचा अभ्यास करण्यासाठी डिजिटल नेटवर्क विश्लेषण आणि बिग डेटा तंत्राची मदत घेण्यात आली.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सावधान ! तुम्हाला फेसबुकवर दिसत असलेली माहिती खरी आहे का?

तंत्रज्ञानाभिमुख सामाजिक घडामोड म्हणून फेक न्यूज ही संकल्पना समजून घेण्यासाठी या देशांमध्ये हाती घेण्यात आलेला हा पहिलाच अशा स्वरूपाचा संशोधन प्रकल्प आहे. फेक न्यूजविषयीच्या चर्चेवर या संशोधनामुळे सखोल चिंतन होईल, याची खात्री वाटते. या विषयावर काम करणारे संशोधक, विश्लेषक तसंच पत्रकारांना या संशोधनाच्या निष्कर्षांचा पुढील अभ्यासासाठी उपयोग होईल.

line

जेमी अँगस, डायरेक्टर बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ग्रुप

पश्चिमेकडील देशांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये फेक न्यूजविषयी चर्चा सतत होत असते, पण या संशोधनामुळे दिसून येतं की ऊर्वरित जगात फेक न्यूज हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे.

सोशल मीडियावर बातमी किंवा मजकूर शेअर करताना राष्ट्र उभारणीचा संदर्भ आल्यास लोक पडताळणी करणं टाळत असल्याचं दिसत आहे. चुकीच्या माहितीचं वितरण रोखण्याप्रश्नी बीबीसीचा बियाँड फेक न्यूज हा उपक्रम गुणात्मक हातभार लावेल याची खात्री वाटते.

line

अन्य महत्त्वपूर्ण तपशील

फेसबुकचा वापर

नायजेरिया आणि केनियात फेसबुक युझर्स फेक आणि सामान्य अशा दोन्ही स्वरूपाच्या बातम्या वाचतात, पाहतात. पण बातमी किंवा मजकूर कुठून आला आहे याविषयी ते फारसे चिंतित नसतात.

भारतात स्थिती वेगळी आहे. फेसबुक वापणाऱ्यांचं ध्रुवीकरण झाल्याचं दिसत आहे. दोन्ही बाजूचे युझर्स विश्वासार्ह स्रोत आणि खोटे स्रोत यांच्या बातम्या वाचत आणि शेअर करत आहेत. फेक न्यूजचे ठाऊक असलेले स्रोत फॉलो करणारी मंडळी ही राजकारण आणि राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक स्वारस्य असलेली माणसं आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, फेकन्यूजमुळे राजस्थानातल्या शांतादेवी मारल्या गेल्या

पिढीगणिक पडणारा फरक

केनिया आणि नायजेरियामधील तरुण मंडळींना, वृद्धांच्या तुलनेत धार्मिक तसंच आदिवासी समाजाविषयीच्या मजकुरात, बातम्यांमध्ये कमी रस आहे. साहजिकच धार्मिक किंवा आदिवासी समाजाचे प्रतिनिधी म्हणून ओळख त्यांना भावणारी नाही.

भारतात मात्र राष्ट्रवादाची अस्मिता तरुणांसाठी कळीचा मुद्दा आहे. त्यांचं वर्तनही त्यानुसारच होतं किंवा बदलतं. आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत त्यांची राष्ट्रवादी विचारांची ओढ अधिक आहे.

फ़ेक न्यूज़

फोटो स्रोत, PA Wire

शब्दांपेक्षा चिन्हं, चित्रं प्रभावी

मोठ्या प्रमाणावर शेअर झालेल्या फेक न्यूज, लिखित मजकुरापेक्षा चित्र तसंच मीम्स स्वरूपात आहेत असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावरच्या विविध प्लॅटफॉर्म्सचं सखोल स्वरूपही या संशोधनाद्वारे उलगडून दाखवण्यात आलं आहे.

ऑनलाईन पातळीवर प्रचंड प्रमाणावर माहिती उपलब्ध होत असल्याने त्याची वैधता निरखण्यात सामान्य व्यक्तींना येणारी आव्हानंही या संशोधनात मांडण्यात आली आहेत. या कारणांमुळे ऑडिओ व्हिज्युअल अर्थात दृक्श्राव्य माध्यमांतून फेक न्यूजचा प्रसार होतो.

फेसबुक, गुगल आणि ट्विटर ही विविध माध्यमं एकत्र येऊन फेक न्यूजच्या परिणामांविषयी चर्चा करणार आहेत. बीबीसीच्या 'बियाँड फेक न्यूज' या दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात ही चर्चा होईल. याच वेळी हा कार्यक्रम मराठीतून पुण्यातही होत आहे.

रिसर्चमधील महत्त्वाचे मुद्दे

फेक न्यूजचा प्रसार आणि प्रचार नेमका कसा होतो हे जाणून घेण्यासाठी विविध पद्धतींचा आधार घेण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत गुणात्मक आणि सामाजिक अभ्यासासाठी थर्ड आय (भारत), फ्लेमिंगो (आफ्रिकन मार्केट्स) यांचे साहाय्य लाभले. बिग डेटा तसंच नेटवर्क अनॅलिसिससाठी सिथेंसिसने सहकार्य केले.

  • बिग डेटा/मशीन लर्निंग: गेल्या दोन वर्षांतल्या फेक न्यूजसंदर्भातील इंग्रजी तसंच स्थानिक भाषांमध्ये छापून आलेल्या/प्रसारित झालेल्या बातम्यांचे तपासण्यात आल्या. भारतात ही संख्या 47,000 तर आफ्रिकन मार्केट्समध्ये 8,000 इतकी आहे.
  • ऑटो एथनोग्राफी: सात दिवसांच्या कालावधीत संशोधन प्रक्रियेत सहभागी झालेल्या व्यक्तींनी शेअर केलेले मेसेज.
  • सेमियॉटिक अनॅलिसिस: फेक न्यूजच्या प्रचार आणि प्रसारादरम्यान वापरली जाणारी चिन्हं, चित्रं, प्रतीकं, आराखडे हे समजून घेऊन त्यांचं जतनीकरण.
  • गुणात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अभ्यास: भारतात दहा शहरांमधील 40 व्यक्तींच्या 120 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी घेतलेल्या मुलाखती. नायजेरियातल्या तीन शहरांमध्ये आणि केनियामध्ये दोन शहरांमध्ये 100 तासांपेक्षा अधिक चाललेल्या 40 लोकांच्या मुलाखती.
  • नेटवर्क अनॅलिसिस: भारतात 16,000 ट्विटर प्रोफाइल्स (370,999 रिलेशनशिप्स), 3200 फेसबुक पेजेस यांचा आढावा घेण्यात आला. आफ्रिकेतील देशांमध्ये 3,000 देशांमध्ये फेसबुक पेजेस पाहण्यात आली.
line

तंत्रज्ञान क्षेत्रातील धुरिणांचं चर्चासत्र बीबीसी वर्ल्ड न्यूजवर 16.30 GMT या वेळेवर पाहता येईल. या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण शनिवार-रविवारी करण्यात येईल.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ग्रुपतर्फे जगभरात इंग्रजी तसंच अन्य 41 भाषांमध्ये रेडिओ, टीव्ही, डिजिटल अशा विविध माध्यमांतून बातम्या आणि कार्यक्रम प्रसारित केले जातात. या बातम्या आणि कार्यक्रम आठवडाभरात 269 दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचा भाग असलेलं 'बीबीसी लर्निंग इंग्लिश'च्या माध्यमातून जगभरातल्या प्रेक्षकांना इंग्रजी भाषेबद्दल ज्ञान दिलं जातं.

बीबीसी का ब्रिटेन स्थित दफ़्तर

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, बीबीसी वर्ल्ड न्यूज टेलिव्हिजन, bbc.com/news यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील 346 दशलक्ष प्रेक्षक वीकेंडच्या दिवशी बीबीसीच्या बातम्या आणि कार्यक्रम पाहतात.

बीबीसी वर्ल्ड न्यूज आणि बीबीसी डॉट कॉम ही बीबीसीची व्यावसायिक व्यासपीठं असून ती बीबीसी ग्लोबल न्यूजच्या मालकीची आहेत.

बीबीसी वर्ल्ड न्यूज टेलिव्हिजन हे दोनशे देश तसंच प्रदेशांमध्ये उपलब्ध असून, 454 दशलक्ष घरं आणि 3 दशलक्ष हॉटेल रुम्समध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)