ममता बॅनर्जी विरुद्ध CBI : राजीव कुमार नेमके आहेत तरी कोण?

रविवारी रात्री पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय यांच्यातील टोकाच्या वादाचा नाट्यमय अंदाज पाहायला मिळाला.

केंद्र सरकार 'राजकीय सूडबुद्धीनं' कारवाई करत असल्याचा आरोप करत काल रात्रीपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणं आंदोलन सुरु केलंय.

रविवारी रात्री सीबीआयटी एक टीम शारदा चिटफंड आणि रोजव्हॅली प्रकरणात चौकशी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली.

मात्र कोलकाता पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांकडे कुठलंही समन्स नसल्याचं सांगितलं. आणि सीबीआय अधिकाऱ्यांनाच शेक्सपिअर सारणी पोलीस स्टेशनमध्ये नेलं.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचल्या. आणि त्यांनी सीबीआयची चौकशी म्हणजे केंद्रानं राज्य सरकारवर केलेला हल्ला असल्याची टीका केली.

कोण आहेत राजीव कुमार?

पण ज्या राजीव कुमार यांच्यासाठी ममता बॅनर्जी सगळी प्रतिष्ठा पणाला लावून मैदानात उतरल्या आहेत, ते राजीव कुमार आहेत तरी कोण?

1989 च्या पश्चिम बंगाल केडरचे आयपीएस अधिकारी असलेले राजीव कुमार सध्या कोलकात्याचे पोलीस आयुक्त आहेत.

राजीव कुमार यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यात झाला, त्यांनी आयआयटी कानपूरमधून कंम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं आहे.

आपल्या तांत्रिक ज्ञानाचा त्यांनी पोलीस खात्यात उत्तम उपयोग केला. सर्विलन्सचा वापर करुन गुन्हेगारांना तातडीनं गजाआड करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं.

90च्या दशकात बीरभूम जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असताना त्यांनी कोळसा माफियांविरोधात मोहीम उघडली आणि राजीव कुमार चर्चेत आले

ज्यावेळी राजीव कुमार यांनी कोळसा माफियांना गजाआड केलं, तेव्हा कोळसा माफियांविरोधात कारवाई करण्याचं धाडस कुठलाही अधिकारी करत नसायचा.

आपल्या सूज्ञपणाच्या जोरावर राजीव कुमार सरकारच्या अत्यंत निकट गेले. विरोधी पक्षात असतानाच आपला फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप ममतांनी राजीव यांच्यावर केला होता.

पण पश्चिम बंगालमध्ये सत्ताबदल होताच राजीव कुमारांनी ममता बॅनर्जींचा विश्वास संपादन केला. ते ममतांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.

2016 साली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीव कुमार यांची कोलकात्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

राजीव कुमार यांनी बिधाननगरचे पोलीस आयुक्त म्हणून काम केलं आहे, शिवाय कोलकाता पोलिसांच्या अंतर्गत स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय.

2013 मध्ये शारदा चिटफंड आणि रोज व्हॅली चिटफंड घोटाळ्याचा पर्दाफाश झाला, त्यानंतर सरकारने एसआयटी नियुक्त केली, ज्याचे प्रमुख राजीव कुमार होते.

2014 मध्ये ही दोन्ही प्रकरणं सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवली. पण या प्रकरणाशी संबंधित अनेक कागदपत्रं, लॅपटॉप, पेनड्राईव्ह राजीव कुमार यांनी सीबीआयला दिले नसल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी अनेक समन्स पाठवूनही राजीव कुमार सीबीआयच्या चौकशीला सामोरे गेले नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

रविवारी याच प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम राजीव कुमार यांच्या सरकारी निवासस्थानी गेली होती, असा सीबीआयचा दावा आहे.

काय आहे शारदा चिटफंड प्रकरण?

शारदा चिटफंडची सुरूवात जुलै 2008 मध्ये झाली होती.

बघता बघता ही कंपनी हजारो कोटींची झाली. सामान्य लोकांकडून पैसा गुंतवून घेणाऱ्या शारदा चिटफंडनं लोकांना दाखवलेली स्वप्नं मात्र खोटी ठरली.

या कंपनीचे मालक सुदिप्तो सेन यांनी 'राजकीय प्रतिष्ठा आणि ताकद' मिळवण्यासाठी मीडिया आणि राजकीय नेत्यांवर प्रचंड पैसा खर्च केला.

तीन वर्षात सुदिप्तो सेन अरबपती झाले. शारदा चिटफंडविरोधात पहिला खटला 16 एप्रिल 2013 मध्ये दाखल झाला.

यानंतर शारदा चिटफंडचे प्रमुख सुदिप्तो सेन फरार झाले, पोलिसांनी त्यांना काश्मिरातून अटक केली. आणि त्यानंतर शारदा चिटफंडचा कारभार ठप्प झाला.

2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवण्याचा निर्णय घेतला. अर्थात पश्चिम बंगाल सरकारने या निर्णयाचाही विरोध केला होता.

रविवारी रात्रीपासून आतापर्यंत काय घडलं?

सीबीआयचे अंतरीम प्रमुख एम नागेश्वर राव यांच्यामते सीबीआय या प्रकरणात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.

रविवारी रात्री सीबीआय अधिकाऱ्यांची एक टीम राजीव कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचली. शारदा चिटफंड प्रकरणात त्यांना राजीव कुमार यांची चौकशी करायची होती.

कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या पथकाला राजीव कुमार यांच्या घरात घुसू दिलं नाही, उलट त्यांना शेक्सपियर सारणी पोलिस ठाण्यात नेलं.

कोलकाता पोलिसांच्या दाव्यानुसार सीबीआयची टीम कुठल्याही समन्सशिवाय राजीव कुमार यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घटनेची माहिती मिळताच त्या स्वत: राजीव कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचल्या.

अधिकाऱ्यांशी बातचित केल्यानंतर ममता बॅनर्जींनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकार राज्याच्या अधिकारांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला.

यानंतर ममता बॅनर्जींनी कोलकात्याच्या धर्मतल्ला परिसरात धरणं आंदोलन सुरु केलं. रात्रीत धरणं आंदोलनासाठी व्यासपीठही तयार कऱण्यात आलं.

तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने धरणं आंदोलनस्थळी पोहोचले.

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आणि इतर अधिकारीही साध्या वेशात धरणं आंदोलनस्थळी पोहोचले.

यानंतर केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान कोलकात्याच्या सीबीआय मुख्यालयात तैनात करण्यात आले.

सीबीआयचे अंतरीम प्रमुख एम.नागेश्वर राव यांनी मते राजीव कुमार चौकशीत सहकार्य करत नसल्याचं म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)