आनंद तेलतुंबडेंच्या सुटकेतून 'पुणे पोलिसांची घाई आणि पूर्वग्रह दिसून येतो'

डॉ. आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असून त्यांना तातडीने मुक्त करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. तेलतुंबडे यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली होती. आजच्या निर्णयाचा मला आनंद आहे, पण शुक्रवारपासून मी जो अपमान भोगला आहे तो वर्णन करता येण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया तेलतुंबडे यांनी दिली.

आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांचे वकील रोहन नाहर यांनी तेलतुंबडे यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा बचाव सादर केला. पोलिसांच्या वतीने अॅड. उज्ज्वला पवार यांनी तेलतुंबडे यांना करण्यात आलेली अटक ही कायदेशीर प्रक्रियेनुसार असल्याचं सांगितलं. उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांचा जामीन फेटाळला आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेलं संरक्षण हे जमीन मिळवण्यासाठी होता, असं त्या म्हणाल्या.

न्यायालयाने नाहर यांनी मांडलेला बचाव ग्राह्य मानून तेलतुंबडे यांना तातडीने मुक्त करण्याचे आदेश दिले. तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन घेण्यासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत अवधी आहे. या कालावधीत ते दाद मागू शकतात, असा आदेश सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी दिला आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांची कृती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करणारी आणि अवमान करणारी आहे, असं निरीक्षण वडणे यांनी नोंदवलं आहे. हा निकालाची माहिती सुप्रीम कोर्टाला दिली जावी, असंही त्यांनी आदेशात म्हटलं आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गुन्हे रद्द करण्यात यावेत, या मागणीची तेलतुंबडे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. त्यांना अटकपूर्व जामिनासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत अवधी देण्यात आला होता. शुक्रवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान पोलिसांच्या कृतीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. प्रकाश आंबेडकर न्यायालयात उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून डॉ. आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे."

आंबेडकर म्हणाले, "एल्गार परिषदेच्या विरोधात तेलतुंबडे यांनी लिहिलं होतं. अशा परिषदा घेऊ नयेत अशी त्यांची भूमिका होती. तेलतुंबडे यांना झालेली अटक हा सरकार विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. "

दरम्यान, आनंद तेलतुंबडे तसंच इतर कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात किंवा अटकेच्या अनिश्चिततेच्या निषेधार्थ दिल्लीत 'किस किस को कैद करोगे...' ही पत्रकार परिषद सुरू आहे. या परिषदेला दलित नेता जिग्नेश मेवानी, निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील , द वायर चे संपादक सिद्धार्थ वरदराजन उपस्थित आहेत.

पुणे न्यायालयाच्या आजच्या निर्णयानं हे सिद्ध केलंय की आनंद यांच्याविरोधात अनधिकृत छळ (illegal harrassment) सुरू आहे, आम्ही निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया द वायरचे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

'पोलिसांचा पूर्वग्रह'

या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांच्याशी संवाद साधला.

ते म्हणाले, "या अटकेतून पोलिसांची घाई आणि पूर्वग्रह दिसतो. असे खोटे पुरावे सादर करून पोलीस कुणाचे आदेश पाळत आहेत? एवढ्या ग्राउंडवर सुद्धा कोर्टने हा खटला रद्द करायला हवा, पण कोर्ट काही करेल, असं वाटत नाही. ही (आजच्या सुटकेची) तात्पुरती ऑर्डर आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)