You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आनंद तेलतुंबडेंचा जामीन अर्ज फेटाळल्यावर अटक, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून पुणे पोलिसांनी त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे.
डॉ. तेलतुंबडे यांच्यावरील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गुन्हे रद्द करण्यास सर्वोच्च न्यायायलयाने नकार दिला होता. त्यानंतर त्यांना जामिनासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत अवधी देण्यात आला होता.
शुक्रवारी (1 फेब्रुवारीला) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्यांना अटक करण्याचं ठरवलं, असं पुणे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं.
त्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली.
आधी मुंबई पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि नंतर त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. "चौकशीनंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली," अशी माहिती पुणे पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.
याआधी डॉ. तेलतुंबडे यांच्या पत्नीला या अटकेविषयी पुणे पोलिसांनी सूचना दिली होती. पण पोलिसांनी याविषयी आणखी काहीही माहिती दिली नाही, असं तेलतुंबडे यांचे वकील रोहन नाहर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
"ही अटक बेकायदेशीर आहे आणि सु्प्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे. आम्ही आज (शनिवारी) या विरोधात पुणे सत्र न्यायालयात आव्हान देणार आहोत," असंही नाहर यांनी सांगितलं.
तेलतुंबडेंवर नक्की कोणते आरोप?
31 डिसेंबर 2017ला झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात काही विचारवंतांना, लेखकांना 28 ऑगस्ट 2018 ला अटक करण्यात आली होती. हे अटकसत्र सुरू असताना आनंद तेलतुंबडे यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली होती.
आनंद तेलतुंबडेंच्या मते पोलिसांनी कोणताही वॉरंट नसताना त्यांच्या अनुपस्थितीत घराची झडती घेतली. घराचे चित्रीकरण केलं आणि घर पुन्हा बंद केलं. तेव्हा तेलतुंबडे मुंबईत होते. हा सगळा प्रकार समजल्यावर त्यांची पत्नी गोव्याला गेली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
सोशल मीडियावर पडसाद
या अटकेची त्यांना भीती होती, म्हणून डॉ. तेलतुंबडे यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून एकूणच प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देत अटक टाळण्यासाठी मदतीचं आवाहनही केलं होतं.
त्यावेळी लेखिका अरुंधती रॉय यांनीही तेलतुंबडे यांना अटक झाली तर भारताच्या इतिहासातला काळा दिवस असेल, असं म्हटलं होतं.
शनिवारी सकाळी ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी ट्वीट केलं आहे, "डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मध्यरात्री 3.30 वाजता अटक करण्यात आली. ही अटक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. सुप्रीम कोर्टानं आनंद तेलतुंबडे यांना 11 फेब्रुवारी पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं. हा न्यायालयाचा अवमान आहे."
"सुप्रीम कोर्टानं 11 फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिली होती तरी भीम कोरेगाव हिंसेच्या आरोपांवरून लेखक आणि कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली," असं ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्वीट केलं आहे.
"मध्यरात्री 3.30 वाजता आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं त्यांना आणखी 4 आठवड्यांची मुदत दिली होती. मध्यरात्रीच्या या घटनेनंतर भारत फॅसिझमपुढं झुकला आहे हे यातून दिसून येतं," असं कम्युनिस्ट (मार्क्सवादी-लेनिनिस्ट) पक्षाच्या नेत्या कविता क्रिश्नन यांनी म्हटलं आहे.
दलित नेते आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनीही एका ट्वीटमध्ये म्हटलं, "आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेबरोबर आतापर्यंत भीमा कोरेगाव प्रकरणात 10 लोकांना खोट्या आरोपांमुळे तुरुंगात डांबण्यात आलं आहे. आणखी लोक आत जातील. महाराष्ट्र पोलिसांच्या या कटामुळे मानवी हक्कांचं उल्ल्ंघन होत आहे. आम्ही या सर्व 10 लोकांच्या सुटकेची मागणी करतो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)