पूजा शकून पांडेय : महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या महिलेला अटक

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांना पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांचे पती अशोक पांडेय यांना देखील यूपी पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून नोएडामध्ये प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

महात्मा गाधीजींच्या 71व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अलीगढमध्ये 12 लोकांवरोधत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे, अमर रहे....'अशा घोषणा देत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी महात्मा गाधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

युवराज मोहिते यांनी हा व्हीडिओ शेयर करत म्हटलं होतं की, "हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा पांडेय यांनी गाधीजींच्या ७१ व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून विकृती साजरी केली आहे. अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती कुठे आहेत?"

याला प्रत्युत्तर म्हणून वरुण पालकर यांनी म्हटलंय की, "देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतींना तेवढंच काम आहे का, की त्यांनी गल्लीबोळात काय घडतंय ते बघत फिरावं?"

रश्मी उज्वला रमेश यांनी हा व्हीडिओ शेयर करत म्हटलं आहे की, "या पूजा पांडेय पहिल्या स्वयंघोषित हिंदू कोर्टाच्या महिला जज आहेत. मागे यांनीच मी जर नथूराम गोडसेच्या आधी जन्मले असते तर गांधीना मारलं असतं. आमच्या तमाम हिंदुत्ववादी संघटना नथूराम गोडसेची पूजा करतात याचा अभिमान आहे, असं म्हटलं होतं."

अंबादास दंतुलवार यांनी लिहिलंय की, "विरोध करावा .पण अशा प्रकाराने करणे योग्य नाही. यातून काय सिध्द होणार? बंदुकीची भाषा योग्य नाही. राग व्यक्त करायला एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये."

"ज्यांना गांधीजींचे विचार समजले नाहीत त्यांना महात्मा गांधी काय कळणार?," असा प्रश्न संतोष हिर्लेकर यांनी विचारला आहे.

"होय, गांधी हे राष्ट्रपिताच होते पण पाकिस्तानचे. कारण हिंदुस्थान आधीच होता ना. पाकिस्तान मात्र त्यांनी निर्माण केला," अशी प्रतिक्रिया सागर गजारे यांनी दिलीय.

या कृत्याच्या समर्थनार्थ प्रथमेश हडकर यांनी अखिल भारत हिंदू महासभेचा विजय असो, असं म्हटलं आहे.

"अतिशय शोकांतिका आहे, यांना अटक करुन मोक्का लावला का नाही?," असं श्रीकांत हावरे यांनी म्हटलं आहे.

पूजा पांडेय आणि वाद

ऑगस्ट 2018मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेने उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये देशातील पहिले हिंदू न्यायालय स्थापन केलं आहे.

पुजा पांडेय यांनी स्वत:ला या न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून घोषित केलं आहे.

"तिहेरी तलाक आणि निकाह हलाला प्रथेच्या बळी ठरलेल्या मुस्लिम महिलांनी हिंदू धर्मात प्रवेश करावा," असं आवाहन केल्यानंतर पूजा पांडेय चर्चेत आल्या होत्या.

"मुस्लिमांमधल्या शरीया कोर्टाच्या धर्तीवर आणखी हिंदू न्यायालये स्थापन होतील," असं त्या म्हणाल्या होत्या.

"नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली नसती तर ते काम मी केलं असतं," असं पांडे यांनी यापूर्वी म्हटलं होतं. "नथुराम गोडसेंची पूजा करण्याचा मला आणि अखिल भारत हिंदू महासभेला सार्थ अभिमान आहे," अशी त्यांची भूमिका आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)