You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
योगी आदित्यनाथ कुंभ मेळ्यात स्नान करणारे पहिले मुख्यमंत्री ?
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया ग्रुप्सवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यादरम्यान गंगेत स्नान करतानाचे फोटो शेअर केले जात आहेत. कुंभमेळ्यादरम्यान गंगेत स्नान करणारे योगी उत्तर प्रदेशचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत अशा दाव्यासह हे फोटो शेअर होत आहेत.
आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने असं स्नान केलेलं नाही. त्यामुळे अनेक लोकांनी योगी आदित्यनाथ यांचं वर्णन 'हिंदूंची शान' असं केलं आहे.
फेसबुकवरच्या अनेक ग्रुप्समध्येही आदित्यनाथ यांचे फोटो या दाव्यासह शेकडोवेळा शेअर केले जात आहेत.
मंगळवारी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील मंत्रिमंडळ सदस्यांसह पवित्र समजल्या जाणाऱ्या संगम तटावर स्नान केलं. त्यानंतर काही संतांसह त्यांनी गंगेची आरतीही केली.
योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत ट्वीटनुसार, मंगळवारी त्यांनी संगमावर स्थित किल्यावरील अक्षयवटाचंही दर्शन घेतलं.
हे सगळे करणारे योगी पहिलेच मुख्यमंत्री आहेत असा दावा योगीसमर्थक मंडळी करत आहेत. पण हे सत्य नाही.
..पण मग सत्य काय आहे?
2007साली समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी कुंभमेळ्यादरम्यान गंगेत स्नान केल्याचं आमच्या पडताळणीत स्पष्ट झालं आहे.
मुलायम सिंह त्यावेळी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. आणि 20 जानेवारी 2007 ला अर्धकुंभमेळ्यादरम्यान त्यांनी गंगेत स्नान केलं होतं.
काही जुन्या बातम्यांनुसार मुलायमसिंह यादव विशेष विमानाने अलाहाबादला अर्थात आताच्या प्रयागराजला पोहोचले होते.
अर्धकुंभाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुलायम सिंह यांचा दौरा आखण्यात आला होता.
या दौऱ्यादरम्यान मुलायम सिंहांनी 13 आखाड्यांचं समन्वयन करणाऱ्या समिती आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञान दास यांची भेट घेतली होती.
यानंतर गंगा, यमुना आणि सरस्वती नदीवरच्या व्हीआयपी घाटावर मुलायम सिंहांनी स्नान केलं होतं.
नेत्यांच्या कुंभस्नानाचा ट्रेंड नवा नाही
प्रयागराजशी (अलाहाबाद) संलग्न काही वरिष्ठ पत्रकारांच्या मते 2001 मध्ये उत्तर प्रदेशचे तत्काकीन मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांनीही महाकुंभमेळ्यादरम्यान गंगेत स्नान केलं होतं.
त्यावेळी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा एवढा प्रभाव नव्हता. त्यामुळे इंटरनेवर राजनाथ यांच्या गंगेत स्नानासंदर्भातील बातम्याही उपलब्ध नाहीत.
ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी यांच्या मते, प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी स्नान करणं नवीन ट्रेंड नाही.
''स्वतंत्र उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी महाकुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेलेले असताना गंगेत स्नान केलं होतं. याचं व्हीडिओ अकार्इव्ह उपलब्ध आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या गंगा स्नानाचा राजकीय प्रचार जोरात आहे'', असं त्रिपाठी यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याआधी रविवारी 27 जानेवारीला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कुंभमेळ्यादरम्यान स्नान केलं आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कुंभमेळ्यादरम्यान स्नान केल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीही 4 फेब्रुवारीला गंगेत स्नान करणार आहेत.
हे वाचलंत का?
('बीबीसी विश्व' हे आमचं बातमीपत्र तुम्ही संध्याकाळी 7 नंतर Jio TV Appवर पाहू शकता. बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)